इस्लामपूर : प्रतिनिधी : भाजप महायुती सरकारने प्रत्येकाच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा केला आहे. ६५ ते ७० हजार रुपयांचे कर्ज राज्यातील प्रत्येक व्यक्तीवर आहे. नियोजनशून्य कारभारामुळे राज्य अडचणीत आणण्याचे पाप महायुतीने केले, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथील जाहीर सभेत ते बोलत होते. आमदार जयंत पाटील म्हणाले, ‘विरोधकांना माझ्या विरोधात बोलण्यास काहीच जागा नसल्याने ते ऊस दराचा अपप्रचार करून शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. मात्र सूज्ञ व जागरूक शेतकरी अपप्रचारास बळी पडणार नाही. राज्यात जे काही चांगले साखर कारखाने चालले आहेत, त्यामध्ये आपला कारखाना आहे. स्वर्गीय बापूंनी आपणास जो आदर्श घालून दिला आहे, त्याप्रमाणे आपण काटकसर व पारदर्शी कारभार करीत सामान्य माणूस व शेतकऱ्यांचे हित साधत आहे. सध्या राज्यावर पावणेआठ लाख कोटींचे कर्ज आहे. या सरकारने सवंग लोकप्रियतेसाठी ज्या घोषणा केल्या, त्यामुळे राज्याची तिजोरी खाली झाली आहे. सध्याच्या सरकारने सव्वा लाख कोटींच्या कर्जाची मागणी रिझर्व्ह बँकेकडे केली आहे.
म्हणजेच राज्यातील प्रत्येक माणसावर ६५-७० हजार रुपयांचे कर्ज केलेले आहे. सुस्मिता जाधव म्हणाल्या, ‘लोकसभेच्या दणक्यानंतर राज्यातील महिला लाडक्या बहिणी झाल्या, मात्र महिलांच्या सुरक्षिततेचे काय? आ. जयंत पाटील यांनी महिलांना रोजगार आणि विविध पदांवर काम करण्याची संधी दिली आहे.’ सुनीता देशमाने यांनी आ. जयंत पाटील यांनी गेल्या ३५ वर्षांत तालुक्याचा शाश्वत विकास केला आहे, असे सांगितले. पं. स.चे माजी सदस्य सुरेश पंडित पवार, निवृत्त प्राचार्य बी. एन. पवार, डॉ. जयकर शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ नेते बी. डी. पवार, दिलीपराव मोरे, ‘राजारामबापू’चे संचालक दादासो मोरे, ‘कृष्णा’चे संचालक जे. डी. मोरे, माजी संचालक सुजित मोरे, अविनाश मोरे, माजी जि.प. सदस्य धनाजी बिरमुळे, सरपंच शुभांगी बिरमुळे, युवक कार्याध्यक्ष देवराज देशमुख आदी उपस्थित होते.