क्वालालंपूर : भारतीय संघाने गुरुवारी एकोणीस वर्षांखालील महिला टी-२० वर्ल्ड कपच्या साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात श्रीलंकेवर ६० धावांनी मात केली. भारताचा हा स्पर्धेतील सलग तिसरा विजय असून ‘ग्रुप ए’मध्ये भारतीय संघ अपराजित आहे. (Srilanka)
या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. सलामी फलंदाज गोंगाडी त्रिशाच्या खेळीमुळे भारताने २० षटकांत ९ बाद ११८ धावा केल्या. त्रिशाने ४४ चेंडूंमध्ये ५ चौकार व एका षटकारासह ४९ धावांची खेळी केली. मिथिला विनोदने १६, तर व्हीजे जोशिताने १४ धावा केल्या. भारताच्या धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेला २० षटकांमध्ये ९ बाद ५८ धावांपर्यंतच मजल मारता आली. रश्मिका सेवांदी वगळता श्रीलंकेच्या एकाही खेळाडूला वैयक्तिक दहा धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. भारतातर्फे शबनम शकील, व्हीजे जोशिता आणि परुणिका सिसोदिया यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. त्रिशा सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली. (Srilanka)
सलग तीन विजयांमुळे भारत गुणतक्त्यात ६ गुणांसह अव्वलस्थानी राहिला. सुपर सिक्स गटामध्ये भारताचा पहिला सामना २६ जानेवारी रोजी बांगलादेशशी होईल. दरम्यान, गुरुवारी झालेल्या अन्य सामन्यामध्ये वेस्ट इंडिजने यजमान मलेशियाला ५३ धावांनी नमवले. विंडीजने केलेल्या ७ बाद ११२ धावांच्या प्रत्युत्तरादाखल मलेशियाचा डाव ५९ धावांत संपुष्टात आला. (Srilanka)
संक्षिप्त धावफलक : भारत – २० षटकांत ९ बाद ११८ (गोंगाडी त्रिशा ४९, मिथिला विनोद १६, व्हीजे जोशिता १४, प्रमुदी मेथसारा २-१०, लिमान्सा तिलकरत्ना २-१४) विजयी विरुद्ध श्रीलंका – २० षटकांत ९ बाद ५८ (रश्मिका सेवांदी १५, शबनम शकील २-९, परुणिका सिसोदिया २-७, व्हीजे जोशिता २-१७).
हेही वाचा :
भारताकडून मलेशियाचा धुव्वा