मुंबई : सौराष्ट्र संघाचे माजी कर्णधार सितांशू कोटक यांची भारतीय क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. २२ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या भारत-इंग्लंड टी-२० क्रिकेट मालिकेपासून कोटक हे फलंदाजी प्रशिक्षकपदाचा कार्यभार स्वीकारतील. (Sitanshu Kotak)
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे कोटक हे पाचवे सहायक आहेत. आतापर्यंत गंभीर यांच्या सहायक प्रशिक्षक वर्गामध्ये मॉर्ने मॉर्केल (गोलंदाजी), टी. दिलीप (क्षेत्ररक्षण), अभिषेक नायर, रायन टेन डॉएश यांचा समावेश आहे. ५२ वर्षीय कोटक हे २०१९ पासून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. भारत अ संघासोबतही त्यांनी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून परदेश दौरे केले आहेत. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या भारत-दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेवेळी भारताचे बदली प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण यांचे सहायक म्हणूनही कोटक यांनी काम पाहिले होते. (Sitanshu Kotak)
ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये भारताला बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेमध्ये १-३ असा पराभव पत्करावा लागल्यानंतर बीसीसीआयने मागील आठवड्यामध्ये आढावा बैठक घेतली होती. या दौऱ्यापूर्वी भारताला मायदेशात न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ०-३ असा, तर श्रीलंका दौऱ्यातील वन-डे मालिकेत ०-२ असा पराभव स्वीकारावा लागला होता. या सर्व मालिकांमध्ये भारतीय फलंदाजांना आलेले अपयश हे संघाच्या पराभवाचे प्रमुख कारण होते. या पार्श्वभूमीवर भारतीय फलंदाजांना साहाय्य करण्यासाठी कोटक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Sitanshu Kotak)
इंग्लंडविरुद्धच्या टी-२० व वन-डे मालिकेनंतर भारतीय संघ पुढील महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफी ही महत्त्वाची स्पर्धा खेळणार आहे. त्यानंतर, जून महिन्यात संघ पाच कसोटींसाठी इंग्लंड दौऱ्यावर जात आहे. या स्पर्धांमध्ये भारतीय फलंदाजांनी यशस्वी कामगिरी करण्याची जबाबदारी आता कोटक यांना उचलावी लागेल.
हेही वाचा :
सिंधू, जॉर्ज उपांत्यपूर्व फेरीत
सिनर, फ्रिट्झ तिसऱ्या फेरीत