नवी दिल्ली : भारताचा फलंदाज श्रेयस अय्यरची इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी मोसमासाठी पंजाब किंग्ज संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. याबरोबरच आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात तीन संघांचे कर्णधारपद भूषवणारा श्रेयस हा पहिलाच भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. (Shreyas Iyer)
श्रेयसने २०२४ च्या आयपीएल स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्स संघाचे नेतृत्व केले होते. त्याचप्रमाणे, त्याच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाने २०२० च्या आयपीएलमध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. दोन भिन्न संघांचे आयपीएलच्या अंतिम सामन्यात नेतृत्व करणाराही तो आजवरचा एकमेव खेळाडू आहे.मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या आयपीएल लिलावामध्ये पंजाब संघाने तब्बल २६.७५ कोटी मोजून श्रेयसला करारबद्ध केले होते. या लिलावातील तो रिषभ पंतखालोखाल दुसरा सर्वांत महागडा खेळाडू ठरला होता. श्रेयसच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने मागील महिन्यात देशांतर्गत सईद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. (Shreyas Iyer)
“संघाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी ऋणी आहे. पंजाबचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांच्यासोबत काम करण्यास मी उत्सुक आहे. यावर्षी पंजाबचा संघ बलाढ्य दिसत असून संघामध्ये गुणवान आणि अनुभवी खेळाडूंचा योग्य ताळमेळ आहे. माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून पंजाबसाठी पहिलेवहिले आयपीएल विजेतेपद जिंकण्याची मला आशा आहे,” अशी प्रतिक्रिया श्रेयसने कर्णधारपदी निवड झाल्यावर दिली. ३० वर्षीय श्रेयसने २०१५ मध्ये दिल्ली संघातर्फे आयपीएल पदार्पण केले होते. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत ११६ सामन्यांत ३२.२३ च्या सरासरीने ३१२७ धावा केल्या असून त्यामध्ये २१ अर्धशतकांचा समावेश आहे. (Shreyas Iyer)
यापूर्वी, श्रीलंकेच्या माहेला जयवर्धनेने आणि ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने आयपीएलमध्ये तीन वेगवेगळ्या संघांचे नेतृत्व केले होते. जयवर्धने प्रथम तो किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार होता, त्यानंतर त्याने कोची टस्कर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांचे कर्णधारपद भूषवले. स्मिथ हा पुणे वॉरियर्स इंडिया, रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांचा कर्णधार राहिला आहे. (Shreyas Iyer)
𝐒𝐡𝐫𝐞𝐲𝐚𝐬 𝐈𝐲𝐞𝐫 ➡️ 𝐓𝐡𝐞 𝐜𝐡𝐨𝐬𝐞𝐧 𝐨𝐧𝐞! ©️♥️#CaptainShreyas #SaddaPunjab #PunjabKings pic.twitter.com/EFxxWYc44b
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) January 12, 2025
हेही वाचा :