कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठातील भूगोल विभागातील एम.एस्सी. जिओइन्फॉर्मेटिक्स प्रथम वर्षात (एम.एस्सी.१) शिकणाऱ्या स्वप्नाली मगदूम या विद्यार्थिनीने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अमेरिकन आधारित आणि जीआयएस (GIS) क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी संस्था असलेल्या ‘एसरी’ (ESRI) च्या भारतीय शाखेतर्फे आयोजित ‘यंग स्कॉलर’ स्पर्धेत स्वप्नालीने संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक मिळवत राष्ट्रीय स्तरावर बाजी मारली आहे.
‘एसरी’ या जागतिक संस्थेतर्फे दरवर्षी जगभरातील विविध देशांमधून प्रत्येकी एका गुणवंत विद्यार्थ्याची ‘यंग स्कॉलर’ म्हणून निवड केली जाते. २०२६ वर्षासाठी जगभरातून निवडल्या गेलेल्या अशा ७० तरुण संशोधकांमध्ये स्वप्नाली मगदूम हिने आपले स्थान निश्चित केले आहे. या निवडीमुळे तिला जुलै महिन्यात सॅन डिएगो, कॅलिफोर्निया (अमेरिका) येथे आयोजित होणाऱ्या ‘ग्लोबल एसरी युझर कॉन्फरन्स’ मध्ये सहभागी होण्याचे अधिकृत आमंत्रण मिळाले आहे. या जागतिक व्यासपीठावर ती भारताचे प्रतिनिधित्व करेल. (Shivaji University’s Swapnali Magdum Named ‘Young Scholar’)
स्वप्नालीने या स्पर्धेसाठी ‘स्मार्ट फ्लडगार्ड: अ मोबाईल अन्ड, आयओटी बेस्ड रिअल टाईम क्लॅश फूड मॉनिटिरिंग अर्ली वार्मिंग अन्ड इव्हाक्युशन सिस्टीम’ या विषयावर आपले संशोधन सादर केले होते. अचानक येणाऱ्या महापुराचे रिअल टाइम मॉनिटरिंग करणे, त्याबद्दल पूर्वसूचना देणे आणि आपत्ती काळात सुरक्षित बाहेर पडण्यासाठी मार्ग सुचवणे, अशी अत्याधुनिक यंत्रणा तिने विकसित केली आहे. मोबाईल ॲप आणि आयओटी (IoT) तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेली ही प्रणाली आपत्ती व्यवस्थापनासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.
स्वप्नालीच्या या यशामागे तिची जिद्द आणि भूगोल विभागातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले आहे. या संशोधन प्रकल्पासाठी तिला भूगोल अधिविभागप्रमुख डॉ. सचिन पन्हाळकर, डॉ. अभिजित पाटील, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. विद्या चौगुले, डॉ. सुधीर पवार आणि शुभम गिरीगोसावी यांचे तांत्रिक व शैक्षणिक मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिने आधुनिक जिओस्पॅशिअल तंत्रज्ञानाचा वापर करून हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केला. (Shivaji University’s Swapnali Magdum Named ‘Young Scholar’)
‘विद्यापीठासाठी अभिमानास्पद’… विद्यापीठाच्या भूगोल अधिविभागातील सर्व प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी स्वप्नालीचे या यशाबद्दल अभिनंदन केले. “जगातील निवडक ७० स्कॉलर्समध्ये स्थान मिळवून ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने थेट अमेरिकेतील परिषदेमध्ये स्थान प्राप्त करणे, ही बाब शिवाजी विद्यापीठासह महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे,” अशा शब्दांत प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी तिचे अभिनंदन केले आहे. (Shivaji University’s Swapnali Magdum Named ‘Young Scholar’)