Home » Blog » Shinde-Uddhav: ठाकरे-शिंदेंचा कलगी तुरा… कौन जीता कौन हारा ?

Shinde-Uddhav: ठाकरे-शिंदेंचा कलगी तुरा… कौन जीता कौन हारा ?

by प्रतिनिधी
0 comments
Shinde-Uddhav

शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा कलगीतुरा कमालीचा रंगला. दोन्ही शिवसेनेच्या या मेळाव्यांचा लेखाजोखा. (Shinde-Uddhav)
-डॉ. विजय चोरमारे


‘कम ऑन किल मी… गद्दारांसमोर उभा राहून मी म्हणतोय. असेल हिंमत तर या अंगावर. अंगावर येणार असाल तर एक लक्षात ठेवा. अँब्युलन्स घेऊन या. सरळ या आडवे होऊन जाल…,’’ अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव टाकरे यांनी गुरुवारी (१९ जून) भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला थेट आव्हान दिले. त्याला एकनाथ शिंदे यांनी, विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या जनतेने तुमचा मुडदा पाडला आहे, अशा शब्दांत प्रत्त्युत्तर दिले.(Shinde-Uddhav)
शिवसेनेचा ५९ वा वर्धापनदिन १९ जून रोजी होता. त्याचे दोन समारंभ झाले. गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापनदिन झाला. त्याचेही दोन मेळावे झाले. शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा षण्मुखानंद सभागृहात झाला. त्याचवेळी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचा मेळावा वरळीच्या एनएससीएन डोममध्ये झाला.
निष्ठावंत शिवसैनिकांचा कुटुंबसोहळा – अशी ठाकरेसेनेच्या मेळाव्याची टॅगलाईन होती.
मेळाव्यातले खासदार संजय राऊत यांचे भाषणही त्यांच्या आक्रमक शैलीत झाले. आपल्याला वेगळ्या मनोरंजनाची गरज नाही, कारण आपले मनोरंजन करण्याची जबाबदारी सरकारने घेतली आहे, अशा शब्दांत त्यांनी खिल्ली उडवली. शिंदेंच्या शिवसेनेचा स्थापना सोहळा सूरतला व्हायला पाहिजे. तुमचा पक्ष स्थापन झाला गुजरातमध्ये. तुमच्या पक्षाचे प्रमुख आहेत अमित शाह. तुम्ही अमित शाह यांचा फोटो लावा, असे सुनावतानाच शिवसेना झुकली नाही, वाकली नाही कुणाच्या चरणाशी बसली नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघर्ष हाच आपला मंत्र असल्याचे त्यांनी सांगितले.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्यांचा विचार करायचा तर सर्वाधिक कुतूहल होते ते राज ठाकरे यांच्याशी युतीबाबत ते काही बोलतात का याबद्दलचे. त्याबाबत आपण सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.(Shinde-Uddhav)
तुमच्या मनात आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन, असे सांगतानाच हे होऊ नये म्हणून भेटीगाठी सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. मराठी माणसाची शक्ती एकवटू नये यासाठी शेठजींच्या नोकरांचे नोकर प्रयत्न करताहेत. म्हणतात होणारच नाही. आमचं आम्ही बघू. शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा विचार कराल तर भाजपचे महाराष्ट्रातून नामोनिशाण पुसून टाकू, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सुनावले.
सध्या चर्चेत असलेल्या तिसरी भाषा म्हणून हिंदी लादण्यासंदर्भातही उद्धव ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला. हिंदीची सक्ती करू देणार नाही, असे ठणकावतानाच त्यांनी तमिळनाडूमध्ये किंवा गुजरातमध्ये हिंदीची सक्ती करून दाखवा असे आव्हान दिले.
निवडणूक जिंकण्यासाठी माताभगिनींशी केलेला वादा पाळत नाही, असे सांगताना त्यांनी भाजपने आपल्याशी केलेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा वादा पाळला नसल्याची आठवण करून दिली.
केंद्रात सरकार आल्यानंतर पणवती लागली आहे. एअरपोर्टवरचं छत गळतंय. मेट्रोची दुर्दशा, दिल्ली रेल्वे स्टेशन, कुंभमेळा चेंगराचेंगरी, विमान अपघात, रेल्वे अपघात… जबाबदारी घ्यायला कुणी नाही. देशाला गृहमंत्र्याची गरज आहे, घरफोड्या अमित शाहांची नव्हे. देशाला संरक्षणमंत्र्यांची गरज आहे, गुंडांना संरक्षण देणाऱ्या देवेंद्र फडणवीस आणि राजनाथ सिंहांची नाही.
जेव्हा आम्ही इंडिया आघाडी म्हणून पर्याय म्हणून उभे राहिलो तेव्हा लाज वाटली नाही इंडियन मुजाहिदीनशी तुलना करताना, असे सांगून ठाकरे यांनी, जग तुमच्या विरोधात गेले असताना मग आमच्या पक्षाचे खासदार जगभर का पाठवले, असा प्रश्न उपस्थित केला.(Shinde-Uddhav)

ट्रम्पचा फोन आल्यावर यांचा आवाजच गेला. काय करायचे असले प्रधानमंत्री. चार अतिरेकी आत आलेच कसे – ते पाताळात गेले, आकाशात गेले की भाजपात गेले… फक्त दाऊदला घ्यायचे राहिले आहे…

एकूण उद्धव ठाकरे यांचे भाषण क्रमाने चढत गेले आणि एका उच्च पातळीवर जाऊन त्यांनी ते थांबवले.
उद्धव ठाकरे यांचे भाषण संपल्यानंतर तिकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू झाले. त्यामुळे स्वाभाविकपणे उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्यांचा समाचार घेण्याची संधी त्यांना होती. तो त्यांनी योग्य पद्धतीने घेतला, असे म्हटले तरी ते चुकीचे ठऱणार नाही.(Shinde-Uddhav)
महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा निवडणुकीत तुमचा अहंकार ठेचला. बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचे पाप तुम्ही केले. सत्तेसाठी लाचारी पत्करण्याचं काम कुणी केलं, हेही आपल्याला ठाऊक आहे. शिवसेनेच्या मतदारांशी, बाळासाहेबांच्या विचारांचा विश्वासघात केला. हिंदुत्वाचा, मराठी माणसांचा विश्वासघात केला, अशी टीका शिंदे यांनी केली.

मुख्यमंत्रिपदासाठी झाले लाचार, ते काय होणार बाळासाहेबांचे वारसदार, असा प्रश्न विचारून शिंदे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडले.

तुमच्यामुळे मराठी माणूस मुंबईतून बाहेर फेकला गेला, असे एकनाथ शिंदे म्हणाले, तेव्हा त्या काळात एकनाथ शिंदे शिवसेनेतच होते, याचे विस्मरण त्यांना झाले असावे. परंतु मुंबईबाहेर फेकलेल्या मराठी माणसाला पुन्हा मुंबईत आणण्याचे काम आपल्याला करायचे आहे. जुन्या चाळींचा विकास करायचा आहे, रखडलेला एसआरए प्रकल्प मार्गी लावायचे आहेत, गिरणी कामगारांना घरे द्यायची आहेत. स्थगिती सरकार बदलून आपण प्रगती सरकार आणले. काम होणार नाही हे सांगायला अक्कल लागत नाही, न होणारे काम नियमात बसवून करावे लागते. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ३६० कोटी रुपये दिले. यापुढे विकासच आपला अजेंडा असल्याचे त्यांनी सांगितले.

कोविडमध्ये, खिचडीमध्ये, मिठीच्या गाळात पैसे खाल्ले असे आरोप केले. मिठीच्या मगरमिठीतून कुणी सुटणार नाही, असे सांगितले.

मुंबई महापालिका सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे, असे मानणारे लोक मुंबई खतरे में है अशा आऱोळ्या ठोकताहेत. यांचे राजकारण खतऱ्यात येईल. राक्षसाचा जीव पोपटात असतो तसा यांचा जीव मुबई महापालिकेच्या तिजोरीत आहे.

पाच वर्षे होऊन गेली, २०१९ला. परंतु पाच वर्षांपूर्वीचे उगाळणे. अजून तिथेच रेकॉर्ड अडकली आहे. भाजप, नरेंद्र मोदी, आरएसएसची वकिली करण्यात शिंदे यांनी बराच वेळ घालवला.

जे काम केले त्याची आठवण लोकांनी ठेवली, हे माझे भाग्य. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, याची ग्वाही त्यांनी दिली.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची पार्श्वभूमी दोन्ही मेळाव्यांना होती. एकनाथ शिंदे यांच्या भाषणाचा बहुतांश भर त्यावरच होता. परंतु वाचलेले भाषण आणि उत्स्फुर्त भाषण यातला फरक जाणवल्यावाचून राहात नाही. उद्धव ठाकरे यांच्या भाषणात जो जोश होता, तो एकनाथ शिंदे यांच्या भाषणात जाणवला नाही. त्यांचे भाषण अनावश्यक लांबले. शिवसेना फुटल्यानंतरच्या पहिल्या वर्षीच्या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्या लांबलेल्या भाषणाची आठवण आल्यावाचून राहिली नाही.
चला उठा व्हा सज्ज, मुंबईवर भगव्याचेच राज्य.. अशा शब्दांत शिंदे यांनी भाषणाचा समारोप केला.
अर्थात हे शक्तिप्रदर्शन होते. अजून ब-याच गोष्टी बाकी आहेत. राज ठाकरे यांची भूमिका ठरायची आहे. महायुतीची गणिते निश्चित व्हायची आहेत. त्यामुळे या मेळाव्यांना शक्तिप्रदर्शनापलीकडे फारसे महत्त्व नाही.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00