– जयंत माईणकर
निवडणूक निकालानंतर येणारे सरकार बनविण्यात शरद पवारांची भूमिका महत्त्वाची असेल. नव्या सरकारचा मुख्यमंत्री आपल्या पसंतीचा असावा किंबहुना त्या जागी आपली कन्या सुप्रियाच बसावी असं पवारांच्या मनात असल्यास नवल वाटायला नको. आणि म्हणूनच की काय भावी मुख्यमंत्र्यांचा चेहरा देण्याच्या स्पर्धेत राष्ट्रवादी उतरली नाही.
शिरूर तालुक्यात एका प्रचारसभेत बोलताना महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळावा अशी इच्छा शरद पवार यांनी प्रदर्शित केली. पवार म्हणाले, राज्यात त्यांच्या सत्ताकाळात महिलांना ३० टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राने घेतला. त्यानंतर हा निर्णय देशभर लागू झाला. आज ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत महिलांचा सहभाग वाढला आहे. आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा आहे.
निवडणूक निकालानंतर येणारे सरकार बनविण्यात शरद पवारांची भूमिका महत्त्वाची असेल हा मुद्दा मी नेहमीच माझ्या लेखात आणि टी व्ही डिबेट्स मध्ये मांडत असतो. इतकंच नव्हे तर नव्या सरकारचा मुख्यमंत्री आपल्या पसंतीचा असावा किंबहुना त्या जागी आपली कन्या सुप्रियाच बसावी असं पवारांच्या मनात असल्यास नवल वाटायला नको. आणि म्हणूनच की काय भावी मुख्यमंत्र्यांचा चेहरा देण्याच्या या रेसमध्ये राष्ट्रवादी उतरली नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीद्वय देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे समर्थक आपापल्या नेत्यांना भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करतात. गृहमंत्री अमित शाह यांनी तर खुलेआम फडणवीसांना भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून उल्लेख केला. पण पवारांनी आपल्या पक्षाकडून कोणत्याही नावाचा उल्लेख केला नाही. अनेक नावे समोर आल्यावर पवारांनी जयंत पाटील यांचं नाव पुढे केलं. पण ते तात्पुरतं होतं असं वाटतं.
शरद पवारांची राजकीय खेळी सुरू होईल २३ नोव्हेंबरला निवडणुक निकलानंतर! ही खेळी पवार याआधी १९८६ ला खेळले होते. पंचावन्न आमदार असलेला आपला पक्ष त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन केला आणि त्यानंतर दीड वर्षात त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. आज त्यांच्या पक्षाचे लोकसभेत आठ खासदार आहेत. २०२६ नंतर पुन्हा राज्यसभेत परतणार नाही याची घोषणा करून पवारांनी त्यांच्या मतदारांना भावनिक साद घातली आहेच. आज त्यांच्या पक्षाचे ८७ उमेदवार रिंगणात आहेत. लोकसभेत केवळ १० जागा लढून त्यांनी आठ जागा मिळविल्या तशाच प्रकारचे घवघवीत यश त्यांच्या पक्षाला अपेक्षित आहे. पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे साठ ते सत्तर आमदार असतील अशी अपेक्षा! आणि नव्याने निवडून आलेल्या आमदारांच्या भरवशावर पवार काँग्रेसची वाट धरू शकतात. कारण त्यामुळे लोकसभेत काँग्रेसची सदस्यसंख्या १०७ होईलच. शिवाय १०३ जागी लढणाऱ्या काँग्रेसला ७५च्या वर जागा मिळण्याची अपेक्षा आहे. केवळ हे दोनच पक्ष १४५ च्या आसपास पोचतील असं वाटतं. त्याचबरोबर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदारसुद्धा शरद पवारांच्या छावणीत दाखल होऊ शकतात. असे झाले तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या काँग्रेसपेक्षा जास्त होऊ शकते.
त्याचवेळी शरद पवार आपल्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचा आग्रह मुख्यमंत्री पदासाठी धरू शकतात. शरद पवारांनी आपल्या पक्षाचे विलिनीकरण काँग्रेसमध्ये केल्यास त्याचा फायदा केंद्रात आणि राज्यात होणारच आणि त्याचबरोबर महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री आपल्या कन्येला करण्याची शरद पवारांची इच्छा पूर्ण होऊ शकते.
सुप्रिया सुळे या संसदीय राजकारणात गेल्या अठरा वर्षांपासून आहेत. २००६ ला त्या प्रथम राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेल्या. तर २००९ पासून त्या सतत बारामती मतदारसंघातून लोकसभेवर निवडून येत आहेत. शरद पवारांनी पंचवीस वर्षांपूर्वी सोनिया गांधी जन्माने इटालियन असल्याचा मुद्दा काढला होता. तो मुद्दा एवढा वाढला की पुढे काँग्रेस पक्ष केंद्रात सत्तेवर आला पण सोनिया गांधी पंतप्रधान बनू शकल्या नाहीत. अर्थात राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या विलिनीकरणामुळे होणारा फायदा लक्षात घेता राहुल गांधी त्या इतिहासाकडे दुर्लक्ष करून राष्ट्रवादीला सामावून घेऊ शकतात.
राजकारणातील नेहरू – गांधी कुटुंबाची वंश परंपरा यावर कोणीही कितीही टीका केली तरीही या देशाचं राजकारण पारिवारिक पक्षांवर आधारित आहे. बहुतेक सगळे पक्ष हे पारिवारिक मालमत्ता असतात. याला अपवाद म्हणजे नामशेष होत चाललेले कम्युनिस्ट आणि भाजप! अर्थात भाजपमध्येही वंशपरंपरा आहे. मात्र ती दुसऱ्या फळीतील नेतृत्वात आहे.
नेहरू – गांधी कुटुंबाने देशाला तीन पंतप्रधान आत्तापर्यंत दिले तर चौथ्या व्यक्तीने (सोनिया गांधी) किंगमेकर किंवा पंतप्रधान मेकरची भूमिका निभावली. आज त्या वंशाचे राहुल गांधी चौथे पंतप्रधान बनण्याची वाट पाहत आहेत. काश्मीर पासून केरळ पर्यंत प्रत्येक राज्यात राजकीय परिवार किंवा पारिवारिक पक्ष आहेत.
नेहरू गांधी परीवाराप्रमाणे अब्दुल्ला परिवाराने तीन मुख्यमंत्री दि,ले तर देवीलाल यांच्या चौथ्या पिढीचे प्रतिनिधी दुष्यंत आत्तापर्यंत हरियाणाचे उपमुख्यमंत्री होते. महाराष्ट्रात शंकरराव आणि अशोक चव्हाण हे पिता पुत्र मुख्यमंत्री बनले. आत्तापर्यंत राज्याला चार उपमुख्यमंत्री देणारे माजी मुख्यमंत्री शरद पवार आज त्याच मांदियाळीत आपल्या कन्येचा समावेश करण्यासाठी उत्सुक असावेत. सुप्रियाच्या रुपाने महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री करण्यासाठी!
(लेखक मुंबईतील जेष्ठ पत्रकार आहेत.)