रांची : झारखंडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपावर ‘इंडिया’ आघाडीच्या पक्षांमध्ये एकमत झाले आहे. या संदर्भात (दि.१९) दुपारी रांचीमध्ये आघाडीच्या पक्षांची बैठक झाली. बैठकीनंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी जागावाटपाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, की राज्यातील ८१ विधानसभा जागांपैकी ७० जागा काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चामध्ये विभागल्या जातील, तर उर्वरित ११ जागा इतर मित्रपक्षांसाठी सोडल्या जातील. (Hemant Soren)
पत्रकार परिषदेत त्यांनी असेही सांगितले, की या विधानसभा निवडणुकीत डावे पक्षही ‘इंडिया’ आघाडीच्या बॅनरखाली लढतील. याचा अर्थ असा की ७० जागांनंतर बाकीच्या ११ जागांवर डावे आणि राष्ट्रीय जनता दलासारखे इतर सहयोगी आपले उमेदवार उभे करतील. मात्र, कोणता पक्ष किती जागा लढवणार याचा निर्णय अद्याप झालेला नाही. पत्रकार परिषदेत सोरेन म्हणाले, की आम्ही ‘इंडिया’ आघाडीचे लोक ही निवडणूक अतिशय गांभीर्याने घेत आहोत आणि प्रत्येक पैलू लक्षात घेऊन या निवडणुकीत एकत्र उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आघाडी करून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. (Hemant Soren)
ते पुढे म्हणाले, ‘झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलासोबत आणखी एक सहयोगी या आघाडीत सामील होत आहे. डावे पक्षही आता या आघाडीत सहभागी होणार आहेत. या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी ठरलेल्या गोष्टी म्हणजे राज्यातील ७० जागांवर ‘इंडिया’ आघाडीचे झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसचे उमेदवार असतील आणि उरलेल्या विधानसभांपैकी कोणत्या जागेवर कोण निवडणूक लढवणार याबाबत आम्ही त्यांच्याशी बसून चर्चा करू.
हेही वाचा :
- सांगली : आटपाडीच्या ओढ्यात नोटांचा पूर
- पुढचे काही दिवस कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट
- शिवाजी विद्यापीठाच्या ७२ जागांसाठी होणार भरती