नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान गुरुवारी भाजप आणि काँग्रेस खासदारांमधील कथित धक्काबुक्कीच्या प्रकारामुळे आरोप-प्रत्यारोपाची राळ उठली आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एका खासदाराला ढकलले. तो माझ्या अंगावर पडला. त्यामुळे पायऱ्यावरून घसरून पडलो, असा आरोप भाजपचे खासदार प्रतापचंद्र सारंगी यांनी केला. तर भाजप खासदार मला संसदेत जाण्यापासून रोखत होते. धमकावत होते, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. (scuffle outside parliament)
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या खासदारांनी गुरुवारी रान उठवले. त्याला प्रत्युत्तर म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याचा आरोप काँग्रेसवर करत संसदेत भाजप खासदारांनी निषेध आंदोलन केले. यादरम्यान हा प्रकार झाला.(scuffle outside parliament)
नव्या संसदेच्या मकरध्वजद्वाराच्या परिसरात हा धक्काबुकीचा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. प्रताप चंद्र सारंगी जखमी झाल्यानंतर भाजपच्या काही खासदारांनी मल्लिकार्जुन खर्गे आणि प्रियांका गांधी यांनाही धक्काबुक्की केल्याचे वृत्त आहे.
खासदार प्रताप सारंगी म्हणाले, मी पायऱ्यावर उभा होतो. राहुल गांधींनी एका खासदाराला माझ्या अंगावर ढकलले, त्यामुळे खाली पडलो आणि जखमी झालो. या घटनेनंतर प्रताप सारंगी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भाजप खासदार मुकेश राजपूत यांना अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. भाजप नेते पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, शिवराज सिंह चौहान आणि प्रल्हाद जोशी हॉस्पिटलमध्ये पोहचले आहेत.(scuffle outside parliament)
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात इंडिया आघाडीकडून संसदेत आंदोलन करण्यात आले. अमित शाह यांनी माफी मागावी आणि पदाचा राजीनामा द्यावा यासाठी इंडिया आघाडीचे आंदोलन सुरु आहे. धक्काबुक्कीच्या घटनेनंतर इंडिया आघाडीचे खासदारही आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षाचे खासदारांनी मकरद्वाराच्या भिंतीवर चढून आंदोलन सुरू केले.
भाजप खासदार धमकावत होते : राहुल गांधी
धक्काबुक्कीच्या आरोपावर बोलताना राहुल गांधी म्हणाले, मी संसदेच्या प्रवेशद्वारातून आत जाण्याचा प्रयत्न करत होतो. त्यावेळी भाजप खासदार मला रोखण्याचा प्रयत्न करत होते. मला धमकावत होते, त्यावेळी हा प्रकार घडला. मला संसदेत जाण्याचा अधिकार आहे. भाजप संविधानावर आक्रमण करत आहे, हा मूळ मुद्दा आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले. काँग्रेस खासदार माणिकम टागोर यांनी या प्रकारानंतर भाजपवर टीकास्त्र सोडले. त्यांनी म्हटले की, आम्ही याबाबत लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार आहोत. तत्पूर्वी संसद परिसरात राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली इंडिया आघाडीच्या खासदारांनी निषेध मोर्चा काढला.
काँग्रेसचे लोकसभा अध्यक्षांना पत्र
दरम्यान, काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल, के. सुरेश आणि मणिकम टागोर यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. त्यात सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी राहुल गांधी यांना मारहाण केल्याचा आरोप केला. ‘… आम्ही मकरद्वार मार्गे संसदेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असताना अडथळा आणले. खासदार राहुल गांधींना सत्ताधारी पक्षाच्या तीन खासदारांनी मारहाण केली,’ असे या पत्रात म्हटले आहे.
भाजपची राहुल गांधी यांच्या विरोधात तक्रार
भाजपने खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. खुनाच्या प्रयत्नासह अन्य गंभीर कलमाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केल्याचे भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी सांगितले. तर भाजप खासदार फंगनॉन कोन्याक यांनी राहुल गांधी यांनी माझ्याशी गैरवर्तन केले, माझा अपमान केला. मला संरक्षण देण्यात यावे अशी मागणी त्यांनी राज्यसभेत केली.
हेही वाचा :