क्वालालंपूर : भारताच्या सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी या जोडीने मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीमध्ये उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्यपूर्व फेरीमध्ये त्यांनी मलेशियाच्या यू सिन आँग-ई यी तेओ या जोडीवर ५० मिनिटे रंगलेल्या लढतीत २६-२४, २१-१५ असा विजय मिळवला. (Satvik-Chirag)
या स्पर्धेमध्ये सात्विक-चिराग जोडीला सातवे मानांकन आहे. अन्य सर्व गटांमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंचे आव्हान संपुष्टात आल्यामुळे याच जोडीवर भारताच्या आशा आहेत. शुक्रवारी रंगलेल्या उपांत्यपूर्व लढतीच्या पहिल्या गेममध्ये दोन्ही प्रतिस्पर्ध्यांदरम्यान प्रत्येक गुणासाठी चुरस पाहायला मिळाली. परंतु, अखेर सात्विक-चिराग जोडीने हा गेम २८ मिनिटांमध्ये २६-२४ असा जिंकून सामन्यात आघाडी घेतली. (Satvik-Chirag)
दुसऱ्या गेममध्ये मलेशियाच्या जोडीने सामन्यात पुनरागमन करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. या गेमच्या मध्यापर्यंत त्यांनी आघाडी टिकवून ठेवली होती. मात्र, दोन्ही जोड्या ११-११ अशा बरोबरीत असताना सात्विक-चिरागने आघाडी घेतली. त्यानंतर, ही आघाडी अखेरपर्यंत कायम ठेवून भारतीय जोडीने हा गेम २१-१५ असा जिंकला आणि उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. (Satvik-Chirag)
उपांत्य फेरीमध्ये सात्विक-चिराग जोडीसमोर दक्षिण कोरियाच्या किम वोन हो-सेओ सेउंग जे या जोडीचे आव्हान आहे. दक्षिण कोरियाच्या या जोडीने उपांत्यपूर्व सामन्यात तैपेईच्या फँग चीह ली-फँग जेन ली या जोडीवर २१-११, २१-७ अशी सहज मात करून उपांत्य फेरी गाठली. (Satvik-Chirag)
हेही वाचा :
ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व पुन्हा स्मिथकडे