नवी दिल्ली : प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात ‘हमारा संविधान, हमारा सन्मान,’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. शुक्रवारी (दि. २४ जानेवारी) परमार्थ त्रिवेणी पुष्प, अराइल घाट येथे हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. (Sanvidhan Samman)
उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्याहस्ते गेल्या वर्षी २४ जानेवारीला या उपक्रमाची सुरूवात नवी दिल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय केंद्रात झाली होती. यानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम राबवण्यात आले. भारतीय स्वातंत्र्याचा तसेच संविधानाच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून ‘विकसीत भारत २०४७’ चा संकल्प यानिमित्ताने सोडण्यात आला आहे. या उपक्रमात माझे सरकार प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जवळपास १ लाख ३० हजार नागरिकांनी पंचप्राण शपथ घेत राष्ट्रउभारणीतील बांधीलकी दर्शवली. (Sanvidhan Samman)
‘ग्राम विधि चेतना’ हा उपक्रम विधि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी राबवला. या विद्यार्थ्यांनी दत्तक घेतलेल्या गावांमध्ये कायद्याविषयी जागरूकता करणारे उपक्रम राबवण्यात आले. सुमारे २१ हजारांवर लाभार्थ्यांनी यात सहभाग घेतला.
याशिवाय, नारी भागिदारी आणि वंचित वर्ग सन्मान उपक्रम सामाजिक न्याय विभागाने राबवले. दूरदर्शन आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या (IGNOU) च्या सहकार्याने त्यासाठी वेबिनार आयोजित करण्यात आले. त्यात ७० लाखांहून अधिक प्रेक्षक सहभागी झाले. कायदेशीर आणि सामाजिक बाबींमध्ये महिलांचा सहभाग यानिमित्ताने वाढल्याचे स्पष्ट झाले. वर्षभर राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचा समारोप येत्या २४ जानेवारीला प्रयागराज महाकुंभ मेळाव्यात होत आहे. (Sanvidhan Samman)
हेही वाचा :
राष्ट्रपती, पंतप्रधान कुंभमेळ्यासाठी येणार