Home » Blog » कोणाही जीवाचा न घड मत्सर |

कोणाही जीवाचा न घड मत्सर |

कोणाही जीवाचा न घड मत्सर |

by प्रतिनिधी
0 comments

संविधानाच्या अमृतमहोत्सवानिमित्त संविधान कीर्तन मालिका

भाग -१ 

कोणाही जीवाचा न घडो मत्सर l

श्यामसुंदर महाराज सोन्नर

विष्णूमय जग वैष्णवाचा धर्म l

भेदा भेद भ्रम अमंगळ ll1ll

आईकाजी तुम्ही भक्त भागवत l

कराल ते हित सत्य करा ll2ll

कोणाही जीवाचा न घडो मत्सर l

वर्म सर्वेश्वर पूजनाचे ll3ll

तुका म्हणे एका देहाचे अवयव l

सूख दु:ख भोग देह पावे ll4ll

जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथेतील हा अत्यंत प्रसिद्ध अभंग आहे. हा अभंग माहिती नसेल असा मराठी माणूस क्वचितच सापडेल. कारण अनेक भाषणात, लेखनात या अभंगाचा संदर्भ आलेला असतो. या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी या अभंगाचा सरळ भावार्थ पाहू.

तुकाराम महाराज सांगतात, हे संपूर्ण जग हे विष्णूमय असून इथे कुणाचाही जात, धर्म, पंथ, पक्ष, प्रांत, लिंग यावरून भेद करणे, हे अमंगळपणाचे लक्षण आहे. समतेच्या पायावर उभ्या असणा-या भागवत धर्माच्या भक्तांनो सावधपणे मी जे सांगतो आहे ते ऐका आणि सत्यामध्येच हित असल्याने ते सत्य स्वीकारून आपले हित साधून घ्या. आणखी महत्त्वाची गोष्ट सांगतो, ते म्हणजे तुमच्याकडून कोणत्याही जिवाचा धर्म, जात, पंथ, लिंग या वा इतर कारणाने द्वेष होणार नाही, याची काळजी घ्या. कोणत्याही जिवाचा मत्सर न करणे हीच खरी ईश्वराची भक्ती आहे.

शेवटी तुकाराम महाराज सांगतात, आपल्या समाजात परस्परांविषयी इतका बंधुभाव वाढला पाहिजे की, आपल्या शरीराच्या कोणत्याही अवयवाला इजा झाली तर संपूर्ण शरीराला वेदना होतात. त्याचा भोग जिवाला भोगावा लागतो. तसं समाजातील कोणताही घटक संकटात असेल तर त्याची आच समाजातील प्रत्येक माणसाला लागली पाहिजे.

केवढा मोठा संदेश तुकाराम महाराज यांनी या अभंगातून दिलेला आहे. या अभंगाच्या पहिल्या चरणात आपल्याला समतेचा विचार दिसतो, तर दुस-या चरणात सत्य स्वीकारून व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य दिसते. तिस-या आणि चौथ्या चरणात बंधुत्वाचा उत्कृष्ट अविष्कार पहायला मिळतो. म्हणजे समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व ही भारतीय संविधानाची मूल्ये एकूणच संत साहित्यात पहायला मिळतात.

आज समाजामध्ये जात, धर्म, लिंग यावरून जी विषमतेच्या विषारी विचारांची पेरणी समाजात सुरू आहे, ती रोखायची असेल तर संतांनी महाराष्ट्रात रुजविलेल्या समतेच्या विचारांचा जागर झाला पाहिजे. साडेतीनशे वर्षांपूर्वी तुकाराम महाराज यांनी या अभंगातून मांडलेली भूमिका ही समतेचा विचार भक्कम करणारी आहे. इतकेच नव्हे तर भारतीय संविधानानाने जी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि सामाजिक न्यायाची भूमिका मांडली आहे, त्याला पूरक आहे. मध्ययुगीन प्रबोधन चळवळीत संतांनी जी समाज जागरणासाठी साहित्य निर्मिती केली, विचारांची पेरणी केली, त्याचे प्रतिबिंब आपल्याला भारतीय संविधानात पडलेले दिसते. भारतीय राज्य घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घटना लिहिताना या संत साहित्याचा खूप उपयोग झाला, असे त्यांनी मान्य केलेले आहे.

भारतीय राज्य घटनेत समाविष्ट असणारी मूल्ये आणि संत साहित्यातून व्यक्त झालेले विचार हे परस्परपूरक असल्याचे आपल्याला स्पष्ट दिसते. किंबहुना वारकरी संप्रदायाच्या ज्या प्रथा परंपरा आहेत त्यातही आपल्याला संविधानाने दिलेल्या मूल्यांचे प्रतिबिंब दिसते. भारतीय संविधातील महत्वाचे मूल्य आहे. समता! समाजातील जात, धर्म, लिंग यावरून जो भेद करू नये, अशी राज्य घटना सांगते. तर आज चिंतनासाठी निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात तोच विचार मांडताना तुकाराम महाराज म्हणतात-

विष्णूमय जग वैष्णवाचा धर्म l

भेदा भेद भ्रम अमंगळ ll1ll

समाजातील अमंगळ भेदा भेद संपले पाहिजेत, याच उदात्त हेतूने आम्ही पंढरपूरच्या वाळवंटात खेळ मांडलेला आहे. या मांडलेल्या खेळामुळे भेदा भेदातून निर्माण होणार क्रोध, कुणाला तरी कनिष्ठ समजून आपण श्रेष्ठ असल्याचा अभिमान आहे, त्याला आम्ही पावटणी केली आहे. परिणामी आता कुणीच उच्च किंवा नीच राहत नसल्याने सर्वजण एकमेकांच्या पायाला लागतात, असे अन्य एका अभंगात तुकाराम महाराज म्हणतात. ज्या अभंगातील काही भाग प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी गायल्याने तो अभंग घराघरात पोहचलेला आहे.

खेळ मांडियेला वाळवंटी घाई l

नाचती वैष्णव भाई रे l

क्रोध अभिमान केला पावटणी l

एक एका लागतील पायी रे ll1ll

या खेळामध्ये कोणतेही अवघड कर्मकांड नाही. गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर गोपीचंदनाचा टिळा, टाळ-मृदंगाचा ध्वनी यातून निर्माण झालेल्या नादातून आनंदाचा कल्लोळ आणि त्याच नादात आम्ही पवित्र नामावळी गात आहोत. या आनंद कल्लोळात पंडित, ज्ञानी, योगी, महानुभाव, सिद्ध, साधक, मूढ इतकेच नव्हे तर स्री आणि पुरुष हे सर्व भेद गळून पडले आहेत. हे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात-

लुब्धली नादी लागली समाधी l

मूढजन नर नारी लोका रे ll

पंडित साधक योगी महानुभाव l

एकचि सिद्ध साधक रे ll

या पुढचं चरण खूपच महत्त्वाचे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अहो पंढरपूरच्या वाळवंटात आम्ही जो खेळ मांडलेला आहे ना त्यामुळे वर्णाचा अभिमान गळून पडला. खर तर इथल्या वर्णव्यवस्थेने भेदाभेदाचा कळस गाठलेला होता. त्यालाच या खेळाने सुरुंग लावला आहे. खरं तर वर्णव्यवस्थेने निर्माण केलेल्या उच्च-नीच व्यवस्थेत खालच्या वर्गातल्या लोकांनी उच्च वर्णीयांच्या पायावर लोटांगण घालावे, अशी प्रथा होती. पण तुकाराम महाराज सांगतात आम्ही मांडलेल्या या खेळामुळे वर्णाचा अभिमान गळून पडला आणि त्याचा परिणाम सर्वजण एकमेकांच्या पाया पडू लागले आहेत. केवढी मोठी क्रांती केली. उच्च-नीच भेदाने जे चित्त गढूळ झाले होते. ते चित्त आम्ही मांडलेल्या खेळामुळे इतके निर्मळ झाले की, दगडालाही आता पाझर फुटले आहेत.

वर्णाभिमान विसरली याती l

एकमेका लोटांगणे जाती ll

निर्मळ चित्ते झाली नवनीते l

पाषाणा पाझर फुटती रे ll

समाजिक समतेचा केवढा संदेश संत साहित्याच्या शब्दांतून पाझरत आहे. जात-धर्म विरहित असणा-या या भागवत धर्माचे जे भक्त आहेत, त्यांनी हे सत्य जाणून घ्यावे, हेच महाराज अभंगाच्या दुस-या चरणात सांगतात.

आइकाजी तुम्ही भक्त भागवत l

कराल ते हीत सत्य करा ll

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00