प्रसिद्ध व्याख्याते, माजी सहायक शिक्षण उपसंचालक संपतराव महिपतराव गायकवाड (वय ६७) यांचे निधन अनेकांना चटका लावणारे ठरले. शिक्षण खात्यातील प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. प्रसिध्द व्याख्याता, निस्वार्थी अधिकारी व निरपेक्ष भावनेने काम करणारे व्यक्तिमत्व हरपल्याची भावना शिक्षण व सामाजिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
संपतराव गायकवाड यांचा जन्म १९५७ मधील. प्राथमिक शिक्षक म्हणून शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात झाली. सुरुवातीला दुर्गम शाहूवाडी तालुक्यातील भेडसगाव- हारुगडेवाडी येथे शिक्षक म्हणून काम केले. या कालावधीत त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले ते आज उच्चपदस्थ अधिकारी आहेत. सेवेत असतानाच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. त्यामधून शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी म्हणून काम केले. सांगली येथे उपशिक्षणाधिकारी म्हणून काम करताना आपल्या कामाची छाप पाडली. जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेत (डाएट) प्रभारी प्राचार्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. शिक्षण विस्तार अधिकारी ते सहाय्यक शिक्षण संचालक पर्यंतच्या प्रवासात त्यांनी आपल्या कृतीशील कार्यातून हजारो शिक्षक, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांनी अनेक उपक्रम राबवून शिक्षकांपुढे आदर्श निर्माण केला आहे. प्रामाणिक अधिकारी अशी त्यांची ख्याती होती. शाळा तपासणीला गेल्यावरही ते स्वतःचा दुपारच्या जेवणाचा डबा सोबत नेत होते.
संस्कारक्षम पिढी घडावी यासाठी त्यांनी सद्विचारांची पेरणी केली. कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता समाजाप्रती कर्तव्य म्हणून व्याख्यानातून प्रबोधनाचे कार्य केले. भ्रष्टाचाराविषयी त्यांना प्रचंड तिटकारा होता. सामाजिक बांधिलकी जपत प्रामाणिक, निस्वार्थ जीवन जगणारे आजच्या काळात खूपच अपवादात्मक दिसतात. एक शिक्षक, अधिकारी म्हणून काम करतानाही आणि सेवानिवृत्तीनंतरही माणूसपणाचं कर्तव्य त्यांनी कधीही सोडलं नाही. त्यांचे व्रतस्थपणे जगणे समाजातल्या प्रत्येकाला माणुसकीची दिशा दाखवणारे आहे. विशेष म्हणजे पदाचा, बुध्दीमतेचा कोणताही आविर्भाव न दाखविता काम करत राहणे ही गायकवाड यांची सहजवृत्ती. साहित्यात रमणारा, व्याख्यानातून आईची माया उलगडून दाखविणारा, संवेदनशीलतेने कर्तव्य पार पाडणारा, समाजाशी नाळ जोडणारा, प्रचंड स्वावलंबी आणि एक सच्चा माणूस म्हणजे संपतराव गायकवाड. वाचन, वक्तृत्त्व, सूक्ष्म निरीक्षण, चांगल्याचे तोंड भरून कौतुक करणारे मनाचे औदार्य, चुकीबद्दल कानउघडणी करणारे स्पष्ट व पारदर्शी मन आणि कुटुंबवत्सल साधी राहणी अशा अनेक सदगुणांचा संचय असणारे गायकवाड यांचे व्यक्तिमत्त्व होते.
उपक्रमशील अधिकारी म्हणून त्यांनी आपल्या कार्याची छाप पाडली. कोल्हापूर परिसरातील साहित्यिक, सामाजिक किंवा प्रबोधनात्मक उपक्रमामध्ये त्यांचा सक्रीय सहभाग असे. किंबहुना शिक्षण क्षेत्रातील लोकांनी अशा उपक्रमांना बळ द्यायला पाहिजे आणि त्याद्वारे विद्यार्थ्यांवर संस्कार करायला पाहिजेत, अशी त्यांची धारणा होती. त्यांची पाच पुस्तके प्रकाशित आहेत. समाजात जे चांगले घडते त्याची समाजाला माहिती व्हावी, त्यातून नवे चांगले काहीतरी निर्माण व्हावे यासाठी त्यांची धडपड असायची. अलीकडे ते समाजमाध्यमांतून प्रेरणादायी विचार पाठवत होते त्यामुळे अनेकांच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक व सुखद व्हायची. नोकरीच्या काळात आणि निवृत्तीनंतरही त्यांनी पगारातील काही टक्के रक्कम ते गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना मदत म्हणून देत होते.