सिडनी : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहशी झालेल्या वादामध्ये आपलीच चूक असल्याची कबुली ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज सॅम कॉन्स्टसने दिली आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील सिडनी येथील पाचव्या कसोटीदरम्यान पहिल्या दिवसाच्या अखेरीस कॉन्स्टस आणि बुमराह यांच्यात वाद रंगला होता. त्याच्या पुढच्याच चेंडूवर बुमराहने ख्वाजाला बाद करून कॉन्स्टसला चेंडूने प्रत्युत्तर दिले होते. (Sam Konstas)
सिडनी कसोटीमध्ये पहिल्या दिवशीच्या अखेरच्या चेंडूपूर्वी फलंदाजी करणारा उस्मान ख्वाजा वेळ काढत होता. त्यावेळी गोलंदाजी करणाऱ्या बुमराहने याविषयी नाराजी व्यक्त केल्यानंतर ‘नॉन-स्ट्रायकर’ कॉन्स्टसने बुमराहला उद्देशून टिप्पणी केली. यावरून बुमराह आणि कॉन्स्टस यांच्यात वाद झाला. शेवटी पंचांना त्यांच्यामध्ये हस्तक्षेप करावा लागला. याबाबत बोलताना ‘यात बहुधा माझी चूक होती,’ असे कॉन्स्टसने सांगितले. “दुर्दैवाने पुढील चेंडूवर ख्वाजा बाद झाला. परंतु, क्रिकेटमध्ये असे घडत असते,” असेही तो म्हणाला. (Sam Konstas)
या मालिकेत बुमराहने केलेल्या कामगिरीची यावेळी कॉन्स्टसने प्रशंसा केली. याच मालिकेतील मेलबर्न कसोटीद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या कॉन्स्टसने स्वत:च्या कामगिरीवरही भाष्य केले. “मी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. पदार्पणावेळी मी दबावाखाली नव्हतो. मी संघसहकाऱ्यांशी आणि पालकांशी याविषयी बोललो होतो. त्यामुळे फलंदाजीवेळी मी शांत होतो,” असे १९ वर्षीय कॉन्स्टसने नमूद केले. कॉन्स्टसने मेलबर्न कसोटीच्या पहिल्याच डावात ६० धावांची खेळी करून क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले होते. या कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाच्या आगामी श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याची संघात निवड होण्याची शक्यता आहे. “या मालिकेसाठी निवड होईल का, हे अद्याप मला माहीत नाही. परंतु, श्रीलंकेतील वातावरण, खेळपट्ट्या ऑस्ट्रेलियापेक्षा पूर्णपणे वेगळ्या असल्यामुळे मला नव्याने खेळाची ओळख होईल,” असेही कॉन्स्टस म्हणाला. (Sam Konstas)
हेही वाचा :
बुमराह इंग्लंडविरुद्धच्या मालिकेस मुकणार?
दक्षिण आफ्रिकेचा एकतर्फी मालिका विजय