नागपूर; विशेष प्रतिनिधी : परभणी आणि बीड जिल्ह्यातील हिंसक घटना ह्या पुरोगामी महाराष्ट्राला आणि संताच्या भूमीला कलंक लावणाऱ्या आहेत. शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचार संपवण्याचा हा प्रयत्न आहे. परभणीत पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सुर्यवंशी यांचा झालेला मृत्यू हा पोलिसांनी केलेली हत्या आहे. या हत्येप्रकरणी जबाबदार पोलिसांवर अद्याप कठोर कारवाई का केली नाही? राजकीय आशिर्वादाने महाराष्ट्रात सुरु असलेल्या गुंडाराजचा कायमचा बिमोड करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. (Nana Patole)
विधानसभेत परभणी आणि बीड जिल्ह्यातील घटनांवरील चर्चेत बोलताना त्यांनी सरकारचे वाभाडे काढले. ते म्हणाले की, महायुतीच्या अडीच वर्षांच्या काळात राज्यात गुंडगिरीला संरक्षण देण्याचा प्रयत्न झाला आहे. बीडमधील वाल्मिक कराडवर ३०२ सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत, त्याला पोलीस संरक्षण दिले, त्याला पोलीस संरक्षण देण्याची शिफारस करणारा कोण? त्याला कशासाठी पोलीस संरक्षण दिले? परळीत आंधळे व गीते यांच्यात गोळीबार झाला. त्यात गीते यांचा मृत्यू झाला, या प्रकरणात वाल्मिक कराडचा संबंध आहे. या घटनेवेळी पीआय महाजन व पाटील नावाचे पीएसआय त्या भागात कार्यरत होते. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्या केज विभागात हेच महाजन व पाटील पोलीस विभागात कार्यरत आहेत. वाल्मिक कराडच्या आदेशाने पोलीस विभागातील बदल्या होत आहेत का? बीडची घटना अत्यंत गंभीर असून त्याला राजकीय आशिर्वाद आहे. मंत्रिमंडळातील एक मंत्री यात सहभागी आहे अशी चर्चा आहे, त्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून बाहेर केले पाहिजे. (Nana Patole)
परभणीची घटना ही कोरेगाव भीमासारखीच आहे. घटना घडल्याच्या दुसऱ्या दिवशी शेकडो लोक रस्त्यावर जमा झाले, दुकाने बंद झाली. पोलिसांनी घटना घडली त्यावेळीच योग्य ती कारवाई केली असती तर पुढील घटना घडल्या नसत्या. परभणीत पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करुन निरपराध लोकांवर लाठीचार्ज केला, पोलिसांना लाठीचार्जचे आदेश कोणी दिले? परभणीतील घटना सरकार प्रायोजित होती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे, असे पटोले म्हणाले. (Nana Patole)
सोमनाथ सुर्यवंशी हा पोलीस लाठीचार्जचा व्हीडिओ शूट करत होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक केली व पोलीस कोठडीत बेदम मारहाण केली, सुर्यवंशी यांची हत्या पोलिसांनी केली पण सरकारने अद्याप एकाही पोलिसावर कारवाई केली नाही. बीडच्या घटनेत वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून दोन दिवसांत २०० खोटे गुन्हे दाखल केले आहेत, तोच शासन चालवतो. पोलीस काय करतात?
पवईतील जयभीमनगर झोपडपट्टी ऐन पावसाळ्यात मुंबई महापालिका, बिल्डर हिरानंदानी आणि पोलिसांच्या मदतीने तोडून टाकली. या प्रकरणी सरकारने नेमलेल्या एसआयटीच्या अहवालात पोलीस, बीएमसी प्रशासन आणि बिल्डर हिरानंदानीला दोषी ठरवले आहे, पण आजही त्यांच्यावर कारवाई केली नसल्याचे पटोले यांनी निदर्शनास आणून दिले.
हेही वाचा :
- मुंबई : भाजयुमो आक्रमक; काँग्रेसचे कार्यालय फोडले
- dhanakad धनकड यांच्याविरोधातील महाभियोग फेटाळला
- Virat Kohli : “न विचारता व्हिडिओ घेऊ नका”