दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांवर सारखेच दडपण असेल, असे भारताचा कर्णधार रोहित शर्माला वाटते. मंगळवारी, ४ मार्च रोजी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये उपांत्य सामना रंगणार आहे. (Rohit Sharma)
भारत या स्पर्धेच्या साखळी फेरीत अपराजित राहिला असून सलग तीन विजयांसह भारताने ‘ग्रुप ए’मध्ये अग्रस्थान पटकावले. ‘ग्रुप बी’मध्ये मात्र पावसाचा व्यत्यय ऑस्ट्रेलियाच्या पथ्यावर पडला. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर विजय मिळवल्यानंतर त्यांचे उर्वरित दोन सामने पावसामुळे अनिर्णित राहिले. परिणामी, त्यांचा उपांत्य फेरीतील प्रवेश सुकर झाला. पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क, मिचेल मार्श यांसारखे ऑस्ट्रेलिया संघातील महत्त्वाचे खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळत नाही आहेत. मात्र, त्यामुळे भारतीय संघाचा उपांत्य फेरीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणार नसल्याचे रोहितने सांगितले. स्पर्धेतील आतापर्यंतच्या तीन सामन्यांप्रमाणेच भारत या सामन्याकडेही पाहील. उपांत्य फेरीमध्ये दोन्ही संघांवर सारखेच दडपण असेल. परंतु, भारतीय संघ कोणतेही अतिरिक्त दडपण घेणार नाही, असे रोहितने स्पष्ट केले. (Rohit Sharma)
आयसीसी स्पर्धांच्या बाद फेरीमधील भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्धची मागील दशकातील कामगिरी फारशी चांगली नाही. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीतील अखेरचा विजय २०११ च्या वन-डे वर्ल्ड कपमध्ये नोंदवला होता. तथापि, मंगळवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना या गतकामगिरीचे ओझे घेणार नसल्याचे रोहित म्हणाला. ऑस्ट्रेलिया हा चांगला प्रतिस्पर्धी संघ आहे. आम्ही मागील तीन सामन्यांमध्ये ज्याप्रकारे विचार करत होतो, तसाच विचार आम्हाला उपांत्य सामन्यातही करायचा आहे. प्रतिस्पर्धी संघ कसा खेळतो, याचा अभ्यास आम्ही केला आहे, असे रोहितने नमूद केले. (Rohit Sharma)
ऑस्ट्रेलिया संघात शॉर्टऐवजी कॉनोली
ऑस्ट्रेलिया संघामध्ये दुखापतग्रस्त मॅट शॉर्टऐवजी कूपर कॉनोलीचा समावेश करण्यात आला आहे. मागील आठवड्यात अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात शॉर्टच्या मांडीचे स्नायू दुखापले होते. तो उपांत्य सामन्यापूर्वी पूर्णत: तंदुरुस्त होणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याच्याजागी कॉनोलीला संघात स्थान देण्यात आले. २१ वर्षीय कॉनोली हा डावखुरा फलंदाज आणि डावखुरा फिरकीपटू आहे. ऑस्ट्रेलिया संघासोबत राखीव खेळाडू म्हणून तो पाकिस्तानला आला होता. (Rohit Sharma)
हेही वाचा
‘केकेआर’च्या कर्णधारपदी अजिंक्य रहाणे