कोलकाता : इंडियन प्रीमियर लीगच्या २०२५च्या मोसमासाठी लखनौ सुपरजायंट्स संघाचा कर्णधार म्हणून रिषभ पंतच्या नावाची सोमवारी घोषणा करण्यात आली. मागील वर्षी झालेल्या लिलावामध्ये लखनौ संघाने तब्बल २७ कोटी रुपयांना पंतला करारबद्ध केले होते. या लिलावातील तो सर्वांत महागडा खेळाडू ठरला होता. (Rishabh Pant)
कोलकातामध्ये झालेल्या कार्यक्रमात संघाचे मालक संजीव गोयंका आणि मार्गदर्शक जहीर खान यांच्या उपस्थितीमध्ये पंतला कर्णधारपदाची जर्सी प्रदान करण्यात आली. याप्रसंगी प्रतिक्रिया देताना पंत म्हणाला, “लखनौने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी ऋणी आहे. संघासाठी २०० टक्के योगदान देण्याकरिता मी कटिबद्ध आहे. या विश्वासास पात्र ठरण्यासाठी जे काही करणे शक्य असेल, ते मी करेन. आयपीएलमध्ये नवी सुरुवात करण्यास मी उत्सुक आहे.” (Rishabh Pant)
लखनौचा संघ २०२२ साली आयपीएलमध्ये आल्यापासून त्यांनी प्रथमच कर्णधार बदलला आहे. मागील तीन मोसमात लोकेश राहुलने लखनौचे कर्णधारपद भूषवले होते. यांपैकी २०२२ व २०२३ च्या मोसमात लखनौने प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला होता. २०२४ मध्ये मात्र त्यांना सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे पंत २०१६ ते २०२४ या काळात दिल्ली कॅपिटल्स संघातर्फे आयपीएलमध्ये खेळला आहे. यादरम्यान, त्याने २०२१, २०२२ आणि २०२४ या तीन मोसमात दिल्लीच्या नेतृत्वाची धुराही सांभाळली होती. या वर्षीच्या आयपीएलसाठी नव्या कर्णधाराची घोषणा करणारा लखनौ हा दुसरा संघ ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच पंजाब किंग्ज संघाने नवा कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरच्या नावाची घोषणा केली होती. यावर्षीची आयपीएल स्पर्धा २१ मार्च ते २५ मेदरम्यान रंगणार आहे. (Rishabh Pant)
Captain. Rishabh. Pant.
That’s the tweet
pic.twitter.com/3NdCc00l5D
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) January 20, 2025
हेही वाचा :
फलंदाजी क्रमामध्ये बदल शक्य