नवी दिल्ली : संसदेत वादग्रस्त वक्फ दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा दिल्याबद्दल जनता दला(यु)त राजीनामासत्र सुरू झाले आहे. पक्षाने घेतलेल्या या भूमिकेशी असहमती दर्शवत पक्षाच्या पाच नेत्यांनी राजीनामा दिला आहे. यापुढेही राजीनामसत्र सुरूच राहील, अशी चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे बिहारच्या आगामी विधानसभेच्या तोंडावर पक्षाचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.(Rift within JD(U))
वक्फ विधेयक मंजूर होताच एक-दोन नव्हे तर किमान पाच नेत्यांनी आपले राजीनामे सादर केले. गुरुवार आणि शुक्रवारी लागोपाठ हे राजीनामे देण्यात आले.
नदीम अख्तर यांनी नुकताच राजीनाम दिला. त्याआधी राजू नय्यर, तबरेज सिद्दीकी अलीग, मोहम्मद शाहनवाज मलिक आणि मोहम्मद कासिम अन्सारी या चार नेत्यांनी राजीनामा दिला आहे. (Rift within JD(U))
नदीम, राजू आणि तबरेज यांनी शुक्रवारी राजीनामा दिला, तर शाहनवाज आणि मोहम्मद कासिम अन्सारी यांनी गुरुवारी राजीनामा दिला.
राजू नय्यर यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे, ‘‘लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झाले. पक्षाने पाठिंबा दिल्यामुळे हे विधेयक मंजूर होऊ शकले. त्यामुळे मी जेडी(यू) चा राजीनामा देत आहे.’’ (Rift within JD(U))
“मी जेडी(यू) युवा संघटनेच्या माजी राज्य सचिवपदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पत्र पाठवून मला सर्व जबाबदाऱ्यांपासून मुक्त करण्याची विनंती करतो,” असे ते म्हणाले.
तबरेज सिद्दीकी अलिग यांनी जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लिहिलेल्या पत्रात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुस्लिम समुदायाचा विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी पक्षावर केला आहे.
‘‘तुम्ही खरोखरच धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे समर्थन करता असा आमच्यासारख्या लाखो भारतीय मुस्लिमांचा ठाम विश्वास होता. तो विश्वास आता तुटला आहे,’’ असे शाहनवाज मलिक यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे.
नितीश कुमारांची मानसिक स्थिती बिघडली : पप्पू यादव
दरम्यान, पूर्णिया येथील अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी, बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडी(यू) प्रमुख नितीश कुमार यांची मानसिक स्थिती चांगली नाही आणि आता त्यांचे पक्षावर नियंत्रण राहिलेले नाही, असा दावा केला. ‘‘नितीश कुमार यांची मानसिक स्थिती सध्या फारशी चांगली नाही. त्यांच्या पक्षात ९० टक्के नेते एससी/एसटीच्या विरोधात आहेत, तरीही त्यांचा भाजपशी घरोबा आहे. बिहारमध्ये मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजल्यानंतर भाजपला नितीश कुमारांची गरज राहणार नाही.. जेडी(यू) आता नितीशजींच्या हातात नाही,’’ असे यादव यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
हेही वाचा :
अत्यंत दुर्दैवी
मनोजकुमार यांचे निधन
मोदींनी उपस्थित केला अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा मुद्दा