गुवाहाटी : राजस्थान रॉयल्सने रविवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा ६ धावांनी पराभव करून यंदाच्या मोसमातील पहिला विजय नोंदवला. या विजयासह राजस्थानने दोन गुण मिळवत गुणतक्त्यातही खाते उघडले आहे. (Rajasthan Royals)
गुवाहाटीच्या बारसपारा स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यामध्ये चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. नितीश राणाच्या ८१ धावांच्या खेळीमुळे राजस्थानने २० षटकांत ९ बाद १८२ धावांपर्यंत मजल मारली. नितीशने ३६ चेंडूंमध्ये १० चौकार व ५ षटकारांसह ८१ धावांची खेळी केली. कर्णधार रियान परागने २८ चेंडूंमध्ये प्रत्येकी २ चौकार, षटकारांसह ३७ धावा केल्या. ( Rajasthan Royals)
राजस्थानच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात वाईट झाली. पहिल्याच षटकात सलामीवीर रचिन रवींद्र शून्यावर बाद झाला. त्यानंतर, कर्णधार ऋतुराज गायकवाडने एक बाजू सांभाळली असताना दुसऱ्या बाजूला ठरावीक अंतराने चेन्नईच्या विकेट पडत राहिल्या. ऋतुराजने ४४ चेंडूंमध्ये ७ चौकार व एका षटकारासह ६३ धावा केल्या. ऋतुराज बाद झाल्यावर रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंह धोनी यांनी २० चेंडूंमध्ये ३५ धावांची भागीदारी रचून विजयासाठी प्रयत्न केले. परंतु, अखेरच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर धोनी बाद झाल्यानंतर चेन्नईच्या उरल्यासुरल्या आशाही संपुष्टात आल्या. राजस्थानकडून वनिंदू हसरंगाने ३५ धावांत ४ विकेट घेत विजयात मोलाचा वाटा उचलला. चेन्नईचा हा यंदाच्या मोसमातील सलग दुसरा पराभव ठरला. ( Rajasthan Royals)
संक्षिप्त धावफलक : राजस्थान रॉयल्स – २० षटकांत ९ बाद १८२ (नितीश राणा ८१, रियान पराग ३७, संजू सॅमसन २०, मथिशा पथिरना २-२८, नूर अहमद २-२८) विजयी विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज – २० षटकांत ६ बाद १७६ (ऋतुराज गायकवाड ६३, रवींद्र जडेजा नाबाद ३२, राहुल त्रिपाठी २३, वनिंदू हसरंगा ४-३५, जोफ्रा आर्चर १-१३).
हेही वाचा :
सोलापूरचा वेताळ शेळके महाराष्ट्र केसरी