मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतंत्र ओळख असलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना पुन्हा एकदा एकत्र येण्याची साथ मुंबईतील मराठी माणसांनी घातली आहे. ३० मार्चला ठाकरे बंधूंनी गुढीपाडव्याला एकत्र येण्यासाठी ठाकरे बंधू मिलन कार्यक्रमाची निमंत्रण बनवली आहे. उद्धव आणि राज यांच्यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असलेला फोटो छापून ही पत्रिका बनवण्यात आली आहे. शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोशल मीडियावर सध्या ही पत्रिका व्हायरल होत आहे.(Raj-Uddhav)
सुमारे दोन दशकापूर्वी राज ठाकरे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला तेव्हापासून बरेच पाणी वाहून गेले आहे . उद्धव ठाकरे यांनी भाजपासमवेत युती करून २०१४ ते २०१९ मध्ये केंद्रात व राज्यात सत्ता उपभोगली. त्यानंतर दोन्ही काँग्रेससमवेत महाविकास आघाडी बनवून अडीच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री बनले होते. सोबत मुंबई महापालिकेवरील सत्ता सातत्याने ताब्यात ठेवली आहे. त्या तुलनेत राज ठाकरे यांचा राजकीय आलेख खालावत राहिला आहे.(Raj-Uddhav)
तरीही त्यांच्याबद्दलचे वलय कायम आहे. गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांना दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. उद्धव ठाकरे यांचे जेमतेम २० आमदार निवडून आले तर राज ठाकरे यांना भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे या दोघांनी पुन्हा एकदा एकत्र यावे, अशी साद मराठी माणसांकडून घातली जात आहे. मुंबईतील मराठी सेनेने त्यांना एकत्र आणण्यासाठी गुढीपाडव्यानिमित्त एक मिलन कार्यक्रम ३० मार्चला बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळी आयोजित केला आहे. (Raj-Uddhav)
विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर सध्या सर्वच पक्षाकडून महापालिका निवडणुकांची तयारी केली जात आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंनी एकत्र यावे अशी भावना सर्वच मराठी माणसांकडून व्यक्त केली जात आहे. यापूर्वी मराठी सेना पक्षाने दादर सेना भवन परिसरात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशा आशयाचे बॅनर लावले होते. त्यानिमित्ताने बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर निमंत्रण पत्रिका ठेवली आहे. ही निमंत्रण पत्रिका ठेवून बंधूत्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला ते एकत्र येतात का याबाबत सर्वांचे औत्सुक्य लागून राहिले आहे. (Raj-Uddhav)
निमंत्रण पत्रिकेत काय?
बंधू मिलन निमंत्रण, भाऊ माझा आधार, माझ्या ध्येयाचा किनारा, आयुष्याच्या प्रत्येक सुख दुःखाचा सोबती, भाऊ माझ्या जीवनाचा आधार. बंधू मिलन कार्यक्रम ३० मार्च २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज मैदान मुंबई येथे सकाळी ११ वाजता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाजवळ घेण्याचे योजिले आहे. मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे, तरी आपली उपस्थिती वंदनीय असेल. मोहनिश रवींद्र राऊळ यांनी ही निमंत्रण पत्रिका बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर ठेवली आहे. (Raj-Uddhav)
ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता धूसर
उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र काम करावे, यासाठी यापूर्वीही अनेकदा प्रयत्न झाले आहेत. मात्र काही कौटुंबिक कार्यक्रम वगळता दोघांनी राजकारणात सोबत येण्याचे आव्हान धुडकावून लावले आहे. त्यांच्यात तीव्र राजकीय मतभेद असल्याने ते येत्या गुढीपाडव्याला एकत्र येतील, याची शक्यता धूसर आहे.
हेही वाचा :
सुनीता विल्यम्सना आणण्यासाठी ड्रॅगन झेपावले