इम्फाळ : काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील विविध समुदायांच्या नेत्यांची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपर्यंत ईशान्येकडील या हिंसाचारग्रस्त राज्याला भेट दिली नाही, याबद्दल त्यांनी टीका केली. (Rahul met Manipur Leaders)
राहुल गांधी यांनी यासंदर्भात एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणतात, ‘काल मी संसदेत मणिपूरमधील विविध समुदायांच्या काँग्रेस नेत्यांशी भेटलो. जवळजवळ दोन वर्षांच्या हिंसाचारानंतर आणि आता राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतरही पंतप्रधान मोदींनी अद्याप या राज्याला भेट दिली नाही हे अत्यंत चिंताजनक आहे. मणिपूरमधील लोकांना शांतता आणि स्थैर्य हवे आहे. या संकटावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिक कटिबद्ध आहे. येथील संघर्षाचे निराकरण करणे ही आपली राष्ट्रीय प्राथमिकता असली पाहिजे.’ (Rahul met Manipur Leaders)
गृह मंत्रालयाने जाहीर केल्यानुसार, मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर फेब्रुवारीपासून मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.
२०२३ पासून मणिपूर जातीय हिंसाचाराने ग्रासलेले आहे. मैतेई समुदाय आणि कुकी-झो जमातींमधील संघर्षात २५० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. मोठ्या प्रमाणात लोक विस्थापित झाले आहेत. बिरेन सिंह यांच्या कार्यकाळात राज्यात अशांतता माजली होती. राज्यात शांतता प्रस्थापित करण्यात त्यांच्या सरकारला अपयश आले. त्यामुळे सिंह यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. (Rahul met Manipur Leaders)
सत्ताधारी भाजपमधील नेत्यांमधून बिरेन सिंह यांच्याविरोधातील नाराजीचा स्वर तीव्र होऊ लागला. याची दखल केंद्रीय नेतृत्वाला घ्यावी लागली. अखेर बिरेन सिंह यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. आता या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.
राज्यात हिंसाचाराचा आगडोंब सुरू होता. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे डिसेंबर २०२४ मध्ये, सिंह यांनी हिंसाचाराबद्दल जाहीरपणे माफी मागितली. सलोख्याचे आवाहन केले, समुदायांना क्षमा करण्याचे आणि शांतता पुनस्थापित करण्याचे आवाहन केले.
तथापि, काँग्रेसने त्यांच्यावर राज्यात फूट पाडण्याचा आरोप केला. राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर तेथील राज्यपालांनी मैतेई आणि कुकी समाजातील बंडखोरांना शांततेचे आवाहन केले. शस्त्रे सरकारजमा करण्याचे आवाहन केले. त्या आवाहनाला काही प्रमाणात प्रतिसादही मिळाला, तथापि, अधूनमधून तेथे लोक रस्त्यावर येऊन निदर्शने आणि हिंसाचार घडवत असल्याच्या घटना घडत आहेत.
हेही वाचा :
म्यानमारमधील मृतांचा आकडा हजारावर
भारताकडून म्यानमारला १५ टन मदत साहित्य