तासगाव; मिलिंद पोळ : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या रोहित पाटील यांनी बाजी मारली. त्यांनी माजी खासदार संजय पाटील यांचा २७६४४ मतांनी पराभव केला. या विजयामुळे ‘तासगाव – कवठेमहांकाळ’ मतदारसंघात रोहित पाटीलच ‘दादा’ असल्याचे सिद्ध झाले. तर संजय पाटील यांना लोकसभेनंतर विधानसभेलाही मतदारांनी नाकारले. आर. आर. पाटील घराण्याविरोधात विजय मिळवण्याचे त्यांचे ३५ वर्षांचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. रोहित यांच्या विजयानंतर मतदारसंघात ‘आर. आर. पार्ट -२’ सुरू झाल्याचे बोलले जात आहे.
या मतदारसंघाची निवडणूक राज्यात सुरुवातीपासूनच लक्षवेधी ठरली. याठिकाणी आर. आर. पाटील यांचे चिरंजिव रोहित पाटील व माजी खासदार संजय पाटील आमने-सामने आले होते. मध्यंतरीच्या काळात या दोन्ही गटातील संघर्ष कुठेतरी कमी झाल्याचे पहायला मिळाले होते. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा या दोन्ही घराण्यातील संघर्ष उफाळून आला होता. दरम्यान निवडणुकीत प्रचारादरम्यान दोन्ही गटांनी टोकाचा प्रचार केला. एकमेकांवर चिखलफेक करण्यात आली. त्यामुळे याठिकाणी कोण बाजी मारणार, याकडे लक्ष लागले होते.
त्यामुळे मतमोजणीच्या दिवशीही कमालीची उत्सुकता होती. पहिल्या फेरीपासूनच रोहित पाटील यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली. माजी खासदार संजय पाटील यांचे चिंचणी हे गाव, भैरववाडी तसेच जुळेवाडी वगळता तासगाव तालुक्यातील इतर गावांमध्ये रोहित पाटील यांची आघाडी कायम राहिली. तासगाव तालुक्यातील आठवी फेरी सोडली तर जवळपास सर्वच फेऱ्यांमध्ये रोहीत पाटील आघाडीवर राहिले.
येळावी, मणेराजुरी, कवठेएकंद, सावळज, कुमठे, सावर्डे, वायफळे यासह अन्य राजकीयदृष्ट्या संवेदनशील गावांमध्ये संजय पाटील यांना पिछाडीवर रहावे लागले. होमग्राउंडवर संजय पाटील यांना मतदारांनी नाकारल्याने सुरुवातीपासून त्यांची वाटचाल पराभवाकडे होती. हक्काच्या गावांमध्ये मतदारांनी त्यांना नाकारल्याने पाटील यांचा पराभव गडद होऊ लागला होता.
घोरपडेंचे कार्यकर्तेही विरोधात
कवठेमहांकाळ येथे अजितराव घोरपडे यांनी संजय पाटील यांच्या हातात हात घालून काम केले. मात्र घोरपडे यांच्या कार्यकर्त्यांनीही त्यांचे ऐकले नसल्याचे दिसून आहे. ‘एक मत, दोन आमदार’ ही घोषणा हवेत विरल्याचे दिसले. कवठेमहांकाळमधील हाताच्या बोटावर मोजण्याइतपत गावांमध्ये संजय पाटील यांना आघाडी मिळाली. तर बहुतांशी गावांमध्ये रोहित पाटील यांना मतदारांनी पसंती दिल्याचे दिसून आले. निवडणुकीत रोहित पाटील यांना १ लाख २८ हजार ४०३ मते मिळाली. तर संजय पाटील यांना १ लाख ७५९ मते मिळाली.
विजय निश्चित झाल्यानंतर रोहित पाटील समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत गुलालाची उधळण केली. रोहित यांना खांद्यावर घेऊन कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढली. आमदार सुमन पाटील, रोहित पाटील यांच्या भगिनी स्मिता पाटील याही मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या.
लोकांचा विश्वास रोहित सार्थकी लावेल : स्मिता पाटील
तासगाव कवठेमंकाळ मतदार संघातील जनतेने आर. आर. पाटील कुटुंबीयांवर कायम प्रेम केले आहे. रोहितच्या रूपाने या मतदारसंघाने पुन्हा आमच्यावर विश्वास टाकला. रोहीतही या मतदारसंघाचा चांगला विकास करेल. आमच्या कुटुंबावर दाखवलेला विश्वास सार्थकी ठरवेल, अशी प्रतिक्रिया स्मिता पाटील यांनी दिली.
जनतेचे विकासाला मत : सुमनताई पाटील
दिवंगत आर. आर. आबा पाटील आणि मी केलेल्या विकासकामाच्या बळावर रोहित यांना जनतेने भरभरून मतदान दिले. त्याबद्दल आम्ही या मतदारसंघाच्या जनतेचे ऋणी आहोत. विकासकामांचा वारसा आर आर आबांप्रमाणेच रोहित पुढे चालवत चांगले काम करेल असा विश्वास मावळत्या आमदार सुमनताई पाटील यांनी व्यक्त केला.
गुंडगिरी मोडून काढणार : आ. रोहित पाटील
तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघात यापुढे गैरकृत्य व अवैध कारभार चालू देणार नाही. चालला तर त्यावर योग्य पद्धतीने आवाज उठवत मी कायद्याच्या माध्यमातून गुंडगिरी मोडून करणार असल्याचे रोहित पाटील यांनी सांगितले. तसेच भविष्यात तासगाव कवठेमंकाळ मतदार संघात विविध विकासकामे आणि एमआयडीसीमध्ये चांगल्या कंपन्या कशा येतील, यासाठी प्रयत्न करणार आहे. साडेतीन हजार बोगस मतदान होऊनही तासगाव शहरातल्या लोकांनी अडीच हजारांचे लीड मला दिले. जनता माझ्या सोबत होती. तिचा ऋणी असल्याचे आमदार रोहित पाटील यांनी निकालानंतर स्पष्ट केले.
निवडणूक भावनिक मुद्द्यांवर : संजय पाटील
विधानसभा निवडणुकीत विकासाचे राजकारण सोडून निवडणूक भावनिक मुद्द्यावर गेली. जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. केंद्रात व राज्यात महायुतीचे सरकार आहे. आपण पुन्हा विकासाच्या मार्गाने राजकारण करून लोकांच्या जनमताचा आदर करू, अशी प्रतिक्रीया माजी खासदार संजय पाटील यांनी दिली.