प्रतिनिधी : कोल्हापूर : शिवाजी तरुण मंडळाने के.एस.ए. फुटबॉल स्पर्धेत शनिवारी बालगोपाल तालीम मंडळावर १-० असा विजय मिळवत बालगोपालची विजयाची मालिका खंडित केली. फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळाचा २-१ असा पराभव केला. (Phulewadi Football)
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित के.एस.ए. अ गट वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धा शाहू स्टेडियमवर खेळवली जात आहे. शिवाजी आणि बालगोपाल यांच्यातील सामना अतिशय चुरशीचा झाला. पूर्वार्धात शिवाजी संघाच्या करण चव्हाणची चढाई बालगोपालचा गोलरक्षक निखिल खन्नाने यशस्वीपणे रोखली. दोन्ही संघानी आघाडीसाठी जोरदार प्रयत्न केले. शिवाजी संघाकडून करण चव्हाण-बंदरे, विमल मैथई, खुर्शीद अली, दर्शन पाटील, इंद्रजीत चौगुले, सिद्धेश साळुंखे यांनी आक्रमक खेळ केला. बालगोपाल संघाकडून प्रथमेश जाधव, रोहित कुरणे, सागर पवार, एल. टीमॉन, ऋतुराज पाटील, लोमन गंबा यांनी चांगल्या चढाया केल्या. तथापि, दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्यामुळे मध्यंतरावेळी गोलशून्य बरोबरी होती.(Phulewadi Football)
उत्तरार्धात गोलची कोंडी फोडण्यासाठी दोन्ही संघांनी वेगवान खेळ केला. बालगोपालच्या प्रथमेश जाधवने मारलेला वेगवान फटका शिवाजी संघाचा गोलरक्षक मयुरेश चौगुलेने रोखत संघावरील संकट दूर केले. शेवटच्या दहा मिनिटांमध्ये शिवाजीने जोरदार आक्रमणे रचली. त्यांना दोन कॉर्नर किक मिळाल्या. ७५व्या मिनिटाला देवराज मंडलिकच्या कॉर्नर किकवर करण चव्हाण-बंदरेने चपळाईने हेडरद्वारे चेंडू गोलजाळ्यात धाडत शिवाजी संघास १-० आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी कायम टिकवत शिवाजी संघाने सामना जिंकून तीन गुणांची कमाई केली.(Phulewadi Football)
तत्पूर्वी, दुपारच्या सत्रातील पहिल्या सामन्यामध्ये फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळावर २-१ असा विजय मिळवला. पूर्वार्धात दुसऱ्या मिनिटाला उत्तरेश्वरच्या तुषार पुनाळकरने मैदानी गोल केला. सहाव्या मिनिटास आदित्य तोरस्करने गोल करत फुलेवाडी संघास १-१ अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर, ४६ व्या मिनिटाला प्रवीण साळोखेने गोल करत फुलेवाडीला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. ही गोलआघाडी अखेरपर्यंत कायम टिकवत फुलेवाडी संघाने सामना जिंकला.
- रविवारचे सामने
- प्रॅक्टिस फुटबॉल क्लब वि. झुंजार क्लब, दुपारी २ वा.
- पाटाकडील तालीम मंडळ अ वि. खंडोबा तालीम मंडळ, दुपारी ४.०० वा.