मुलतान : पाकिस्तानने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर २०२ धावांची आघाडी घेतली आहे. विंडीजचा पहिला डाव १३७ धावांत संपुष्टात आल्यामुळे पाकला ९३ धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर पाकने दिवसअखेरपर्यंत दुसऱ्या डावात ३ बाद १०९ धावा केल्या होत्या. (Pakistan)
या कसोटीच्या पहिल्या दिवशी पाकने पहिल्या डावामधअये ४ बाद १४३ धावा केल्या होत्या. नाबाद राहिलेल्या सौद शकील आणि महंमद रिझवान यांनी दुसऱ्या दिवशी पाकला पावणेदोनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. शकीलने ६ चौकारांसह ८४, तर रिझवानने ९ चौकारांसह ७१ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यानंतर थोड्या वेळातच पाकचा डाव आटोपला. त्यानंतर, फलंदाजीस आलेल्या विंडीज संघाची पाकच्या फिरकीपटूंपुढे भंबेरी उडाली. साजिद खान व नोमान अलीच्या फिरकीपुढे आघाडीचे सर्व फलंदाज अपयशी ठरल्यामुळे सोळाव्या षटकातच विंडीजची अवस्था ८ बाद ६६ अशी होती. अखेरच्या दोन जोड्यांनी ७१ धावा जोडल्यामुळे विंडीजला १३७ धावांपर्यंत मजल मारता आली. विंडीजकडून दहाव्या क्रमांकाच्या जोमेल वॉरिकनने ४ चौकार व एका षटकारासह सर्वाधिक ३१ धावांची खेळी केली. पाकतर्फे साजिदने ४, तर नोमानने ५ विकेट घेतल्या. (Pakistan)
दुसऱ्या डावामध्ये शान मसूद आणि महंमद हुरियारा यांनी पाकला ६७ धावांची सलामी दिली. हुरियारा २९ धावांवर बाद झाल्यानंतर बाबर आझम केवळ ५ धावा करून परतला. पाकचा कर्णधार शान मसूद प्रत्येकी २ चौकार व षटकारांसह ५२ धावा करून धावबाद झाला. अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ थांबला, तेव्हा कामरान गुलाम ९, तर सौद शकील २ धावांवर खेळत होता. (Pakistan)
संक्षिप्त धावफलक : पाकिस्तान – पहिला डाव २३० आणि दुसरा डाव ३१ षटकांत ३ बाद १०९ (शान मसूद ५२, महंमद हुरायरा २९, जोमेल वॉरिकन २-१७) विरुद्ध वेस्ट इंडिज – पहिला डाव २५.२ षटकांत सर्वबाद १३७ (जोमेल वॉरिकन नाबाद ३१, जेडन सिल्स २२, नोमान अली ५-३९, साजिद खान ४-६५).