दुबई : श्रेयस अय्यरच्या खेळीला वरुण चक्रवर्तीच्या फिरकीची जोड मिळाल्यामुळे भारताने रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये न्यूझीलंडवर ४४ धावांनी मात केली. या अखेरच्या साखळी सामन्यात भारताच्या ९ बाद २४९ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव ४५.३ षटकांत २०५ धावांत आटोपला. या सलग तिसऱ्या विजयासह भारताने ‘ग्रुप ए’मध्ये अपराजित राहत ६ गुणांसह अग्रस्थान पटकावले. त्यामुळे उपांत्य फेरीत भारताचा सामना ‘ग्रुप बी’मध्ये दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या ऑस्ट्रेलियाशी होईल. (Newzealand)
या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा नाणेफेकीबाबत कमनशिबी ठरला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा हा निर्णय सार्थ ठरवत सुरुवातीच्या ७ षटकांमध्येच भारताची अवस्था ३ बाद ३० अशी केली होती. सलामीवीर रोहित शर्मा व शुभमन गिल अनुक्रमे १५ व २ धावांवर बाद झाले, तर विराट कोहली ११ धावाच करू शकला. हेन्रीच्या गोलंदाजीवर ग्लेन फिलिप्सने पॉइंटला विराटचा अफलातून झेल पकडला. श्रेयस अय्यर व अक्षर पटेल यांनी चौथ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी रचून भारताचा डाव सावरला. (Newzealand)
रचिन रवींद्रने तिसाव्या षटकात अक्षरला बाद करून ही जोडी फोडली. अक्षरने ६१ चेंडूंत ३ चौकार व एका षटकारासह ४२ धावा केल्या. श्रेयस अय्यरने ९८ चेंडूंमध्ये ४ चौकार व २ षटकारांच्या मदतीने भारताकडून सर्वाधिक ७९ धावांची खेळी केली. हे दोघे परतल्यानंतर लोकेश राहुल व रवींद्र ज़डेजा मोठी खेळी करू शकले नाहीत. जडेजाचा केन विल्यमसनने घेतलेला झेलही वाखाणण्याजोगा होता. अखेरच्या षटकांतील हार्दिक पंड्याच्या फटकेबाजीमुळे भारताला अडीचशेच्या आसपास पोहोचता आले. हार्दिकने ४५ चेंडूंमध्ये ४५ धावा करताना ४ चौकार व २ षटकार लगावले. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने ४२ धावांत ५ विकेट घेतल्या. (Newzealand)
विजयी लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडला पंड्याने चौथ्या षटकात रचिन रवींद्रला बाद करून पहिला धक्का दिला. त्यानंतर, वरुण चक्रवर्तीने बाराव्या षटकात दुसरा सलामीवीर विल यंगचा त्रिफळा उडवला. कुलदीप यादवने डॅरेल मिचेलला, तर जडेजाने टॉम लॅथमला पायचीत पकडला. ग्लेन फिलिप्स आणि मायकेल ब्रेसवेल यांनाही वरुणने आपल्या फिरकीच्या जाळ्यात ओढले. एका बाजूने ही पडझड सुरू असताना केन विल्यमसनने दुसरी बाजू नेटाने सांभाळली होती. ४२ व्या षटकात अक्षर पटेलला पुढे येऊन खेळण्याच्या प्रयत्नात विल्यमसन यष्टिचित झाला. त्याने १२० चेंडूंमध्ये ७ चौकारांसह ८१ धावांची खेळी केली. (Newzealand)
विल्यमसन बाद झाला, त्यावेळी न्यूझीलंडला विजयासाठी ९ च्या धावगतीने ५४ चेंडूंमध्ये ८१ धावांची गरज होती. न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांना हे आव्हान न पेलवल्याने त्यांचा डाव सेहेचाळीसाव्या षटकात २०५ धावांत आटोपला. भारतातर्फे वरुणने ४२ धावांत ५ विकेट घेत वन-डे कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. कुलदीपने २ विकेट घेतल्या.
धावफलक : भारत – रोहित शर्मा झे. यंग गो. जेमिसन १५, शुभमन गिल पायचीत गो. हेन्री २, विराट कोहली झे. फिलिप्स गो. हेन्री ११, श्रेयस अय्यर झे. यंग गो. ऑरुर्के ७९, अक्षर पटेल झे. विल्यमसन गो. रवींद्र ४२, लोकेश राहुल झे. लॅथम गो. सँटनर २३, हार्दिक पंड्या झे. रवींद्र गो. हेन्री ४५, रवींद्र जडेजा झे. विल्यमसन गो. हेन्री १६, महंमद शमी झे. फिलिप्स गो. हेन्री ५, कुलदीप यादव नाबाद १, अवांतर १०, एकूण ५० षटकांत ९ बाद २४९.
बाद क्रम – १-१५, २-२२, ३-३०, ४-१२८, ५-१७२, ६-१८२, ७-२२३, ८-२४६, ९-२४९.
गोलंदाजी – मॅट हेन्री ८-०-४२-५, काइल जेमिसन ८-०-३१-१, विल ऑरुर्के ९-०-४७-१, मिचेल सँटनर १०-१-४१-१, मायकेल ब्रेसवेल ९-०-५६-०, रचिन रवींद्र ६-०-३१-१.
न्यूझीलंड – विल यंग त्रि. गो. वरुण २२, रचिन रवींद्र झे. पटेल गो. पंड्या ६, केन विल्यमसन यष्टि. राहुल गो. अक्षर ८१, डॅरेल मिचेल पायचीत गो. कुलदीप १७, टॉम लॅथम पायचीत गो. जडेजा १४, ग्लेन फिलिप्स पायचीत गो. वरुण १२, मायकेल ब्रेसवेल पायचीत गो. वरुण २, मिचेल सँटनर त्रि. गो. वरुण २८, मॅट हेन्री झे. कोहली गो. वरुण २, काइल जेमिसन नाबाद ९, विल ऑरुर्के त्रि. गो. कुलदीप १, अवांतर ११, एकूण ४५.३ षटकांत सर्वबाद २०५.
बाद क्रम – १-१७, २-४९, ३-९३, ४-१३३, ५-१५१, ६-१५९, ७-१६९, ८-१९५, ९-१९६, १०-२०५.
गोलंदाजी – शमी ४-०-१५-०, हार्दिक ४-०-२२-१, अक्षर १०-०-३२-१, वरुण चक्रवर्ती १०-०-४२-५, कुलदीप ९.३-०-५६-२, जडेजा ८-०-३६-१.
हेही वाचा :
पाटाकडील ब’ संघाचा ‘सम्राटनगर’ वर विजय