Home » Blog » Newzealand : न्यूझीलंड अंतिम फेरीत

Newzealand : न्यूझीलंड अंतिम फेरीत

तिरंगी स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर ६ विकेटनी मात

by प्रतिनिधी
0 comments
Newzealand

लाहोर : केन विल्यमसनने नाबाद शतक झळकावून न्यूझीलंडला तिरंगी वन-डे क्रिकेट स्पर्धेमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४ विकेटनी विजय मिळवून दिला. न्यूझीलंडचा हा स्पर्धेतील सलग दुसरा विजय असून याबरोबरच न्यूझीलंडने अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले आहे. (Newzealand)

दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडसमोर विजयासाठी ३०५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. न्यूझीलंडने ४८.४ षटकांत ४ बाद ३०८ धावा करून विजय साकारला. विल यंग आणि डेव्हॉन कॉनवे यांनी न्यूझीलंडला पहिल्या पॉवर-प्लेमध्ये ५० धावांची सलामी दिली. यंग १९ धावांवर बाद झाल्यानंतर कॉनवे आणि विल्यमसन यांनी दुसऱ्या विकेटसाठी १८७ धावा जोडल्या. कॉनवेचे शतक मात्र अवघ्या तीन धावांनी हुकले. त्याने १०७ चेंडूंमध्ये ९ चौकार व एका षटकारासह ९७ धावांची खेळी केली. त्यानंतर, डॅरेल मिचेल आणि टॉम लॅथन झटपट बाद झाले. विल्यमसनने मात्र एक बाजू लावून धरत ग्लेन फिलिप्ससह संघाला विजयापर्यंत पोहोचवले. विल्यमसनने ११३ चेंडूंमध्ये १३ चौकार व २ षटकारांसह नाबाद १३३ धावा फटकावल्या. त्याचे हे कारकिर्दीतील चौदावे शतक ठरले. फिलिप्स २८ धावांवर नाबाद राहिला. (Newzealand)

तत्पूर्वी, मॅथ्यू ब्रिझ्कच्या विक्रमी दीडशतकामुळे आफ्रिकेला ६ बाद ३०४ धावांपर्यंत मजल मारता आली. कारकिर्दीतील पहिलाच वन-डे सामना खेळणाऱ्या ब्रिझ्कने सलामीला येत ११ चौकार व ५ षटकारांच्या साहाय्याने १४८ चेंडूंमध्ये १५० धावा केल्या. याबरोबरच त्याने वन-डे पदार्पणात सर्वाधिक धावा करण्याचा तब्बल ४७ वर्षे जुना विक्रम मोडीत काढला. १९७८ मध्ये वेस्ट इंडिजच्या डेजमंड हेन्सने पदार्पणात १४८ धावांची खेळी केली होती. विल्यम मुल्डरने ६० चेंडूंमध्ये ५ चौकार व एका षटकारासह ६४ धावा करून ब्रिझ्कला साथ दिली. (Newzealand)

विल्यमसन ठरला विराटपेक्षा वरचढ

विल्यमसनने या सामन्यादरम्यान वन-डे कारकिर्दीतील ७,००० धावांचा टप्पा पूर्ण केला. त्याने १५९ डावांमध्ये हा टप्पा गाठला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वांत कमी डावांमध्ये ७,००० धावा पूर्ण करणाऱ्या फलंदाजांमध्ये विल्यमसनने विराट कोहलीला मागे टाकत दुसरे स्थान पटकावले. विराटने १६१ डावांमध्ये हा टप्पा गाठला होता. सर्वांत वेगवान ७,००० धावा पूर्ण करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम अमलाच्या नावावर असून त्याने १५० डावांत ही कामगिरी केली आहे.

संक्षिप्त धावफलक : दक्षिण आफ्रिका – ५० षटकांत ६ बाद ३०४ (मॅथ्यू ब्रिझ्क १५०, वियान मुल्डर ६४, जेसन स्मिथ ४१, मॅट हेन्री २-५९, विल ऑरुर्के २-७२) पराभूत विरुद्ध न्यूझीलंड – ४८.४ षटकांत ४ बाद ३०८ (केन विल्यमसन नाबाद १३३, डेव्हॉन कॉनवे ९७, ग्लेन फिलिप्स नाबाद २८, सेनुरन मुथुसामी २-५०, एथन बॉश १-३३).

हेही वाचा :

मुंबईची आघाडी अडीचशेपार
रोहितने टाकले द्रविड, गेलला मागे

 

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00