मुंबई : विशेष प्रतिनिधी : सत्ताधारी पक्षाला साथ देऊन नियमबाह्य पद्धतीने काम करणाऱ्या सभापती आणि अध्यक्षांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी गुरुवारी (२० मार्च) राजभवन येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन तक्रार केली. त्याबाबत योग्य कार्यवाही करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. (MVA Complaint)
संसदीय प्रणालीमध्ये विरोधी पक्ष हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यांची भुमिका ही सरकार विरोधी नसून सरकारच्या निर्णयावर आणि धोरणांवर अंकुश ठेवणारी आहे. आवश्यक तेथे टीका करणे आणि पर्यायी धोरण सुचविण्याची भूमिका विरोधी पक्ष पार पाडतात. मात्र महाराष्ट्र विधानपरिषद आणि विधानसभा सभागृहात सभापती व अध्यक्षांकडून सभागृहाच्या कामकाजात पक्षपाती व एकांगी भूमिकेचा अवलंब केला जात आहे. दोन्ही सभागृहाच्या कार्यवाहीमध्ये संसदीय परंपरांचे पालन केले जात नाही. सभागृहाचे कामकाज नियमबाह्य पद्धतीने चालविले जात आहे. त्याला आळा घालण्यात यावा, विरोधी सदस्यांना बोलण्याची संधी देऊन त्यांना न्याय द्यावा, अशी मागणीही विरोधी पक्षांनी केली आहे. (MVA Complaint)
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधिमंडळ गटनेते आ. आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले, अनिल परब, भास्कर जाधव, भाई जगताप, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, सुनील राऊत,सचिन अहिर, ज. मो. अभ्यंकर, मनोज जामसुतकर, सिद्धार्थ खरात, कैलास पाटील व वरुण सरदेसाई आदी उपस्थित होते.
हेही वाचा :
देवेंद्र फडणवीस हे सुटाबुटातले `योगी`
दिशा सालियन मृत्यूप्रकरण पाच वर्षांनी पुन्हा चर्चेत