Home » Blog » म्युच्युअल फंड

म्युच्युअल फंड

म्युच्युअल फंड

by प्रतिनिधी
0 comments
Mutual Funds file photo

-प्रा. विराज जाधव

रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणजे काय आणि महागाई दराचा विचार करून आपल्याला किती सेवानिवृत्ती निधी जमा करावा लागेल याचे गणित कसे करायचे याबद्दलची माहिती आपण मागील दोन लेखांमध्ये घेतली. यावरून तुम्हाला एक गोष्ट नक्कीच समजली की असेल निवृत्तीसाठी निधी जमा करण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूक आवश्यक आहे. त्यासाठी म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

म्युच्युअल फंड आपल्या भविष्यासाठी इतका महत्त्वाचा असेल तर त्याबद्दल अधिक माहिती मिळवायला हवी. म्युच्युअल फंडबद्दल माहिती घेत असताना खालील प्रश्नांची उत्तरे आपण बघणार आहोत.

  • म्युच्युअल फंड म्हणजे काय?
  • म्युच्युअल फंड कसे काम करतात?
  • म्युच्युअल फंडाचे प्रकार कोणते?
  • म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
  • म्युच्युअल फंडात गुंतवणूक कशी करावी?
  • चांगला म्युच्युअल फंड कसा निवडावा?
  • म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे फायदे काय?
  • म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे तोटे काय?
  • म्युच्युअल फंडवरील करप्रणाली कशी असते?

मी एक गोष्ट पाहिली आहे की लोकांना म्युच्युअल फंडातील ‘फंड’ हा शब्द नीट समजत नाही किंवा उलट त्यांचा गैरसमज होतो. म्हणून सर्वप्रथम आपण या ‘फंड’ शब्दाचा अर्थ योग्य पद्धतीने समजून घेतला पाहिजे.

समजा, तुम्ही तुमच्या कुटुंबातील एकमेव सदस्य आहात ज्याला शेअर बाजाराची चांगली समज आहे. तुम्ही शेअर बाजारातूनही पैसे कमवले आहेत, तुम्ही मल्टी-बॅगर स्टॉक ओळखता, शेअरची किंमत कधी वर जाणार, कधी खाली येणार याची चांगली जाण आहे. तुमच्या इतर नातेवाईकांनाही तुमच्या क्षमतेची कल्पना आली आहे. प्रत्येकजण फॅमिली व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये तुम्हाला गुंतवणुकीबद्दल सारखे सल्ले विचारत असतात. हळूहळू तुमचे वडील, काका, मामा, मावशी तुम्हाला त्यांचे पैसे सांभाळायला सांगतात. सगळ्या नातेवाईकांचे मिळून तुमच्याकडे काही पैसे जमा झाले आहेत. या जमा झालेल्या पैशांना ‘फंड’ असे म्हणतात. हा सर्व फंड तुम्ही मॅनेज करणार म्हणजे तुम्ही झाला ‘फंड मॅनेजर’.

आता येथे एक प्रश्न पडतो की तुम्ही त्यांचे पैसे कसे व्यवस्थापित कराल? नियमांनुसार, तुमच्याकडे फंड व्यवस्थापन परवाना असल्याशिवाय तुम्ही इतरांच्या पैशांचे व्यवस्थापन करू शकत नाही. समजा, तुम्ही परवान्यासाठी अर्ज केला आणि तुम्हाला सेबीकडून परवाना मिळाला. आता ही झाली तुमची म्युच्युअल फंड कंपनी. पैसे व्यवस्थापित करण्यासाठी तुम्ही कुटुंबातील सदस्यांना एका खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यास सांगाल. सर्व पैसे एकाच ठिकाणी आणणे आणि नंतर ते बाजारात गुंतवण्यासाठी वापरणे अशी येथे कल्पना आहे. आता सर्वांनी एकाच खात्यात पैसे जमा केल्यामुळे, ज्या खात्यात निधी ठेवला आहे ते सर्व गुंतवणूकदारांचे आहे. म्हणून, ‘म्युच्युअल फंड’याला ‘म्युच्युअल’ फंड म्हणतात कारण म्युच्युअलचा अर्थ आहे : सर्वसमतीने/ सर्वसमावेशक.

म्युच्युअल फंड योजना या म्युच्युअल फंड हाऊसद्वारे व्यवस्थापित केल्या जातात, ज्याला AMC किंवा ॲसेट मॅनेजमेंट कंपनी म्हणूनही ओळखले जाते. मालमत्ता व्यवस्थापन कंपनी (एएमसी) ही गुंतवणूकदारांचे पैसे व्यवस्थापित करणारी वित्तीय संस्था आहे. ते ऑनलाईन (नेट बँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्ड, UPI इ.) आणि ऑफलाईन (चेक आणि कॅशद्वारे) यांसारख्या विविध माध्यमांद्वारे निधी संकलित करतात. AMC चालवण्याचा परवाना फक्त स्पॉन्सरला मिळतो. स्पॉन्सर हा ट्रस्टी आणि AMC कंपनीची नियुक्ती करतो. AMC ला गुंतवणूक व्यवस्थापकही म्हणतात. AMC चे काम म्युच्युअल फंड सुरू करणे आणि AMC च्या विविध गुंतवणूक योजना सुरू करणे आहे. AMC मध्ये एक मुख्य गुंतवणूक अधिकारी (CIO), काही फंड मॅनेजर्स, ॲनालिस्ट असतात आणि ते सर्व मिळून ॲसेट मॅनेजमेंट कंपनी चालवतात. विविध प्रकारच्या म्युच्युअल फंड योजना चालवणे आणि व्यवस्थापित करणे आणि SEBI चे नियम पाळले जातात हे पाहणे ही AMC ची जबाबदारी आहे. AMC एका कस्टोडियनची नियुक्ती करते. म्युच्युअल फंड जे शेअर्स खरेदी करतात ते सर्व शेअर्स फक्त या कस्टोडियनकडेच ठेवले जातात. म्युच्युअल फंडाची सर्व मालमत्ता योग्यरित्या ठेवणारा एक चांगला पालक म्हणून तुम्ही कस्टोडियनचा विचार करू शकता. AMC फंडसाठी RTA म्हणजेच रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंटही नियुक्त करते. सर्व ग्राहकांच्या म्युच्युअल फंडाची योग्य देखभाल करणे, त्यांना त्यांचा फोलिओ क्रमांक सांगणे, त्यांचे युनिट हस्तांतरित करणे आणि अशी इतर सर्व कामे करणे हे RTA चे काम आहे. AMC साठी, कस्टोडियन आणि RTA यांना त्यांचे सर्विस प्रोव्हायडर म्हणतात; जसे की CAMS आणि Karvy ही नावे आपल्यांपैकी काही जणांनी नक्कीच ऐकली असतील. हे सर्व एकत्र मिळून म्युच्युअल फंड कंपनी चालवतात. खरेतर, म्युच्युअल फंड रचना ही एक अशी पद्धत आहे जी गुंतवणूकदारांच्या पैशांचे व्यवस्थापन करण्यासाठी डिझाइन केली आहे.

आता आपण तक्त्याच्या माध्यमातून वरील सर्व संकल्पना समजून घेऊ…

म्युच्युअल फंडाचे नाव ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड
स्पॉन्सरचे नाव ICICI बँक लिमिटेड आणि प्रुडेंशियल PLC
ट्रस्टी कंपनीचे नाव ICICI प्रुडेन्शियल ट्रस्ट लिमिटेड
AMC कंपनीचे नाव ICICI प्रुडेन्शियल ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड
कस्टोडियनचे नाव सिटी बँक, दॉइशे बँक, एचडीएफसी बँक, एचएसबीसी बँक, SBI-SG ग्लोबल सिक्युरिटीज सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड
रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंटचे नाव कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड (CAMS)

गुंतवणूकदार म्हणून तुमच्यासाठी दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत

  • AMC चा प्रायोजक कोण आहे – हे नाव स्वतःच खात्री देते की तुम्ही विश्वासार्ह नावाशी संबंधित आहात.
  • फंड मॅनेजर कोण आहे – हे तुम्हाला सांगते की तुमचे पैसे योग्य व्यक्तीद्वारे व्यवस्थापित केले जात आहेत.

आणखी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, म्युच्युअल फंड योजना वेगवेगळ्या गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करते आणि गोळा केलेली रक्कम इक्विटी स्टॉक्स, कॉर्पोरेट बाँड्स, सरकारी सिक्युरिटीज, मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्स, डिपॉझिट सर्टिफिकेट्स, कमर्शियल पेपर्स, ट्रेजरी बिल, सोने, चांदी सारख्या कमोडिटीज इ., फ्यूचर्स आणि ऑप्शन्स सारख्या इंडेक्स डेरिव्हेटिव्हसह विविध प्रकारच्या फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्समध्ये इन्व्हेस्ट करतात. एएमसी सामान्यपणे चार प्रकारच्या गुंतवणूकदारांकडून निधी संकलित करते – रिटेल (वैयक्तिक) गुंतवणूकदार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII), HNI गुंतवणूकदार आणि भारतीय सरकारी संस्था, कॉर्पोरेट हाऊस (DII). एक तज्ञ फंड मॅनेजर पैशाचे व्यवस्थापन करतो. जर तुम्हाला इक्विटीमध्ये गुंतवणूक करायची आहे, तर फंड मॅनेजर फंडाचा मोठा भाग स्टॉकमध्ये गुंतवेल. जर तुम्हाला डेट फंडात गुंतवणूक करायची असेल, तर निधीचा महत्त्वपूर्ण भाग बाँडमध्ये गुंतवला जाईल. जमा झालेला निधी हाताळण्यासाठी व त्याची गुंतवणूक करण्यासाठी फंड मॅनेजर जबाबदार आहे. अशा पद्धतीने म्युचुअल फंड कंपनी काम करते.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00