नागपूर : इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या मुलाने आईवडिलांचा निर्घृण हत्या केल्याची घटना नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपूर येथे उघडकीस आली. ‘अभ्यास सोडून शेती कर,’ असा तगादा आईवडील सतत देत असल्याने चिडून जाऊन त्यांचा खून केल्याची कबुली मुलाने दिली आहे. नागपूरच्या खसाळा कॅम्पसमध्ये ही घटना घडली. लीलाधर डाखोडे आणि अरुणा डाखोडे अशी मृतांची नावे आहे. उत्कर्ष डाखोडे असे आरोपीचे नाव आहे. (murder)
नागपूर पोलिसांनी खुनाच्या घटनेची माहिती दिली. लीलाधर डाखोडे कोराडी थर्मल प्लांटमध्ये तंत्रज्ञ म्हणून काम करत होते. त्यांच्या पत्नी अरुणा खाजगी शाळेत प्राथमिक शिक्षिका होत्या. त्यांचा मुलगा उत्कर्ष हा सहा वर्षांपासून अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. परीक्षेत त्याला सातत्याने अपयश येत असल्याने आईवडील अभ्यास सोडून आता शेती कर, असा तगादा लावत होते. पण उत्कर्ष अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करण्यावर ठाम होता. उत्कर्षला एमडीचे व्यसनही होते. या व्यसनामुळे त्याचे अभ्यासात मन लागत नव्हते. आईवडील सातत्याने त्याला बोलत असल्याने तो त्याच्यावर चिडून होता. त्याने आईवडीलांना संपवण्याचा निर्णय घेतला.(murder)
थंड डोक्याने रचला कट
उत्कर्षने थंड डोक्याने आईवडीलांच्या खुनाचा कट रचला. उत्कर्षने २६ डिसेंबरला सकाळी धाकटी बहीण सेजलला कॉलेजला सोडले. तो घरी पोहोचला, तिथे एकच्या सुमारास त्याने आईचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तो वडिलांची वाट पाहत थांबला. संध्याकाळी पाचच्या सुमारास वडील घरी येताच त्याने वडिलांवर धारदार शस्त्राने वार केले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. हत्येनंतर उत्कर्ष घराला कुलूप लावून वडिलांची गाडी आणि मोबाईल फोन घेऊन कोराडी येथे राहणाऱ्या मामाकडे गेला. तेथून बहिणीला फोन करून काही दिवसांसाठी ध्यान करायला बंगलोरला जात असल्याचे सांगितले. बहिणीलाही त्याने काकाकडे सोडले.(murder)
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हत्येचा उलगडा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्कर्ष मंगळवारी रात्री त्यांच्या घरी आला. त्याने जोरात दरवाजा ठोठावण्याचा बहाणा केला. त्यानंतर बुधवारी सकाळी तो पुन्हा कोराडीला काकांकडे झोपायला गेला असता, शेजाऱ्यांना उग्र वास येऊ लागल्याने त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता अरुणा आणि लीलाधर यांचे रक्ताने माखलेले मृतदेह दिसून आले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा लक्षात घेऊन उत्कर्षला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता, त्याने हत्येची कबुली दिली. पोलिसांनी उत्कर्षला अटक केली असून पोलीस घटनेचा पुढील अधिक तपास आहे.