नवी दिल्ली : प्रचंड उष्म्याने लाही लाही होत असताना भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) मंगळवारी (१५ एप्रिल) मान्सूनसंदर्भात गुड न्यूज दिली आहे. या वर्षीच्या मान्सून हंगामात भारतात सामान्यापेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.( Monsoon Prediction)
आयएमडीचे प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी पत्रकार परिषदेत संपूर्ण हंगामात एल निनो परिस्थितीची शक्यता नाकारली. ते म्हणाले, ‘‘मान्सून हंगामात चार महिन्यांत (जून ते सप्टेंबर) भारतात सामान्यापेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. ८७ सेमी या एकत्रित दीर्घकालीन सरासरीच्या १०५ टक्के इतका पाऊस पडेल.’’ ( Monsoon Prediction)
‘‘एल निनोचा प्रभाव असतो त्यावेळी पाऊस कमी पडतो. यंदा मात्र एल निनोचा प्रभाव असणार नाही, भारतात तो यावेळी विकसित होण्याची शक्यता नाही,’’ असे ते म्हणाले.
देशाच्या बहुतांश भागांत तीव्र उन्हाळा आहे. प्रचंड उकाडा जाणवत आहे. अंगाची लाही लाही होत आहे, या पार्श्वभूमीवर हा अंदाज सुखावणारा ठरला आहे.
कृषी क्षेत्राला मोठा दिलासा
भारताच्या कृषी क्षेत्रासाठी मान्सून महत्त्वाचा आहे. आजही जवळपास ४२.३ टक्के लोकसंख्या मान्सूनवरच अवलंबून आहे. देशाच्या जीडीपीमध्ये मान्सूनवर आधारीत असलेले कृषी क्षेत्राचे योगदान १८.२ टक्के आहे. ( Monsoon Prediction)
प्राथमिक पर्जन्य प्रणालीवर बावन्न टक्के निव्वळ लागवडीखालील क्षेत्र अवलंबून आहे. देशभरातील वीज निर्मितीव्यतिरिक्त पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक असलेल्या जलाशयांच्या पुनर्भरणासाठी मान्सून महत्त्वाचा आहे.
तथापि, अलीकडे देशभरात सामान्य संचयी पाऊस पडत नाही. हवामान बदलामुळे पर्जन्य प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. त्याचा परिणाम कृषीक्षेत्रावर होतो.
मुसळधार पावसाच्या घटना वाढल्या…
हवामान शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, अलीकडे पावसाळ्याच्या दिवसांची संख्या कमी होत आहे. उलट मुसळधार पावसाच्या घटना (थोड्या कालावधीत जास्त पाऊस) वाढत आहेत. त्यामुळे वारंवार दुष्काळ आणि पूर अशी संकटे निर्माण होतात. ( Monsoon Prediction)
भारतात मान्सून साधारणपणे १ जूनच्या सुमारास केरळच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर येतो आणि सप्टेंबरच्या मध्यात त्याच्या परतीचा प्रवास सुरू होतो.
भारतीय हवामान विभागाने सरासरी किंवा सामान्य पाऊस चार महिन्यांच्या हंगामासाठी ८७ सेमी (३५ इंच) या ५० वर्षांच्या सरासरीच्या ९६% ते १०४% दरम्यान असल्याचे परिभाषित केले आहे.
हेही वाचा :
पाच लुटेरे…
‘ईडी’कडून मनी लॉड्रिंग प्रकरणी रॉबर्ट वड्रांची चौकशी