Home » Blog » Modi Trump visit : भारत-अमेरिका ‘मेगा पार्टनरशिप’!

Modi Trump visit : भारत-अमेरिका ‘मेगा पार्टनरशिप’!

ट्रम्प यांच्यासोबत व्यापार, कर, २६/११च्या आरोपीचे प्रत्यार्पण, चीनसोबतच्या सीमावादाची चर्चा

by प्रतिनिधी
0 comments
Modi Trump visit

वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी अमेरिकेच्या दोन दिवसीय दौऱ्याची सांगता केली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी व्यापार, आयात शुल्क, २६/११चा आरोपी तहवूर राणाचे प्रत्यार्पण, रशिया-युक्रेन युद्ध, एफ-३५ लढाऊ विमानांची खरेदी आणि चीनसोबतचा भारताचा सीमावाद यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांत चर्चा झाली. (Modi Trump visit)

‘अमेरिकेतील नागरिकांना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ (मागा) हे ब्रीद चांगलेच ठाऊक आहे. तसेच भारताचे मेक इंडिया ग्रेट अगेन (मिगा) उद्दिष्ट आहे. साहजिकच ‘समृद्धीसाठी मेगा भागीदारी’ बनते. हीच उदात्त भावना आमच्या उद्दिष्टांना नवा आयाम आणि वाव देते. आज, आम्ही आमचा द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. परस्पर फायदेशीर व्यापार कराराचे हे उद्दिष्ट लवकरच ५०० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल,’ असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलून दाखवला. (Modi Trump visit)

मोदींनी आर्थिक विकास आणि जागतिक नेतृत्वासाठी भारत आणि अमेरिकेच्या सामायिक वचनबद्धतेवर प्रकाश टाकला.

२०३० पर्यंत पाचशे अब्ज द्विपक्षीय व्यापाराचे लक्ष्य

संयुक्त विकास, संयुक्त उत्पादन आणि तंत्रज्ञानाचे हस्तांतरण सुनिश्चित करण्याचा प्रयत्नाचा भाग म्हणून भारत आणि अमेरिकेने २०३० पर्यंत पाचशे अब्ज डॉलरच्या द्विपक्षीय व्यापाराचे लक्ष्य ठेवले आहे. कराराच्या अटींवर लवकरच निर्णय घेतला जाईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

भारतातील लोक सुद्धा वारसा आणि विकासावर लक्ष केंद्रित करत आहेत. कारण ते वेगाने आणि विकसित भारत २०४७ च्या उद्दिष्टाकडे दृढ संकल्पाने पुढे जात आहेत, असे मोदी म्हणाले.

अमेरिका भारताला देणार एफ-३५ विमाने

संरक्षण सहकार्याला महत्त्वपूर्ण चालना देत, डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की अमेरिका भारताला एफ-३५ स्टेल्थ लढाऊ विमाने विकेल. भारत त्यामुळे प्रगत विमाने चालविणाऱ्या मोठ्या देशाच्या गटात आणेल. ‘या वर्षापासून, आम्ही भारताला अनेक अब्ज डॉलर्सची लष्करी विक्री वाढवणार आहोत. आम्ही भारताला F-35 स्टेल्थ फायटर प्रदान करण्याचा मार्गही मोकळा करत आहोत,’ ट्रम्प म्हणाले. (Modi Trump visit)

लॉकहीड मार्टिन F-35 लाइटनिंग II हे पाचव्या जनरेशनमधील लढाऊ विमान आहे. या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या ‘एरो इंडिया’ या आशियातील सर्वांत मोठ्या एरोस्पेस आणि संरक्षण प्रदर्शनात ते सहभागी झाले होते.

भारत २५ अब्ज डॉलरपर्यंतची ऊर्जा खरेदी करणार

ऊर्जा क्षेत्राला चालना देण्यासाठी भारत नजीकच्या काळात जवळपास २५ अब्ज डॉलरची यूएस ऊर्जा खरेदी करणार आहे. ‘गेल्या वर्षी आम्ही सुमारे १५ अब्ज डॉलर्सची यूएस ऊर्जा उत्पादने खरेदी केली होती. नजीकच्या भविष्यात हा आकडा २५ अब्ज डॉलर्सपर्यंत जाण्याची शक्यता आहे,’ असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एका प्रेस नोटमध्ये म्हटले आहे.

भारत आणि युनायटेड स्टेट्समधील व्यापार तूट संतुलित करण्यात ऊर्जा खरेदी महत्त्वाची भूमिका बजावू शकते. ही खरेदी वाढविण्यावरही दोन्ही नेत्यांमधील चर्चेत लक्ष केंद्रित करण्यात आले. अधिकाऱ्यांनी सूचित केले की विस्तारित ऊर्जा व्यापार ही एक मोठी शक्यता आहे. (Modi Trump visit)

चीन सीमावादावर मध्यस्थीची अमेरिकेची तयारी

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-चीन सीमा वादात मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली. दोन्ही देशांदरम्यानचा तणाव कमी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. ‘मला सीमेवरील चकमकी दिसत आहेत. अद्यापही त्या सुरूच आहेत. यामध्ये मला मदत करायला आवडेल, कारण हे प्रकार थांबवले पाहिजे,’ असे ट्रम्प म्हणाले.

स्थलांतरितांना ‘अमानवी वागणुकीवर’ मौन

पंतप्रधान मोदी यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांच्या मुद्द्यावर बोलताना अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या नागरिकांना परत घेण्याची भारताची तयारी दर्शवली. तथापि, खोटी आश्वासने देऊन लोकांची दिशाभूल करणाऱ्या मानवी तस्करांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. हा मुद्दा हद्दपारीच्या पलीकडे विस्तारला आहे यावर त्यांनी भर दिला.

नुकत्याच निर्वासितांना प्रतिबंधित करून त्यांना देशात परत पाठवताना त्यांना देण्यात आलेल्या ‘अमानवी वागणुकीबद्दल’ कोणतीही प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली नाही.

‘जे लोक बेकायदेशीरपणे इतर देशांमध्ये राहतात त्यांना तेथे राहण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. आम्ही नेहमीच असे म्हटले आहे की ज्यांची पडताळणी झाली आहे आणि ते खरोखरच भारताचे नागरिक आहेत. ते बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहत असतील, तर भारत त्यांना परत घेण्यास तयार आहे,’ असे मोदी म्हणाले. (Modi Trump visit)

२६/११ हल्ल्यातील आरोपीच्या प्रत्यार्पणाला मंजुरी

या भेटीतील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अमेरिकेने २६/११ चा आरोपी तहव्वूर राणा याच्या भारताकडे प्रत्यार्पणाला मान्यता दिली. “आज मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, माझ्या प्रशासनाने जगातील एक कट्टर आणि अत्यंत दुष्ट आरोपी, मुंबईच्या भीषण दहशतवादी हल्ल्याशी संबंधित असलेल्या आरोपीच्या प्रत्यार्पणाला मान्यता दिली आहे, असे ट्रम्प म्हणाले.

विशेष जानेवारी महिन्यात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने प्रत्यार्पणाबद्दलची राणाची पुनर्विलोकन याचिका फेटाळून लावली होती.

 

हेही वाचा :

बेकायदेशीर स्थलांतरित स्वर्गातून जमिनीवर
‘वक्फ जेपीसी’वरुन विरोधकांचा सभात्याग

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00