Home » Blog » Mixed badminton : भारताची मकाऊवर एकतर्फी मात

Mixed badminton : भारताची मकाऊवर एकतर्फी मात

आशियाई मिश्र सांघिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये विजयी सलामी

by प्रतिनिधी
0 comments
Mixed badminton

सिंगताओ : भारताने आशियाई मिश्र सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेमध्ये बुधवारी मकाऊविवर ५-० अशी एकतर्फी मात करून विजयी सलामी दिली. या स्पर्धेच्या ‘ग्रुप डी’मध्ये असणाऱ्या भारताची पुढील लढत दक्षिण कोरियाशी होईल. (Mixed badminton)

दोन वर्षांच्या अंतराने खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेचा भारत गतब्राँझपदक विजेता आहे. २०२३ मध्ये भारताने या स्पर्धेत ब्राँझपदक जिंकले होते. यंदाच्या स्पर्धेत भारतीय संघ प्रमुख खेळाडू पीव्ही सिंधूच्या अनुपस्थितीत सहभागी झाला आहे. सिंधूने मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे या स्पर्धेतून माघार घेतली होती. मकाऊविरुद्ध मिश्र दुहेरीत भारताच्या सतीशकुमार करुणाकरन-आद्या वारियाथ यांनी इओक चाँग लेआँग-वेंग ची एनजी जोडीला २१-१०, २१-९ असे पराभूत केले. त्यानंतर, पुरुष एकेरीचा सामना भारताच्या लक्ष्य सेनने पँग फाँग पुईविरुद्ध अवघ्या ४० मिनिटांमध्ये २१-१६, २१-१२ असा जिंकला. (Mixed badminton)

मालविका बनसोडने महिला एकेरीत मकाऊच्या हाओ वाई चान हिचा ३३ मिनिटांमध्ये २१-१५, २१-९ असा पराभव केला. पुरुष दुहेरीमध्ये सात्विकसाईराज रंकीरेड्डी खांद्याच्या दुखापतीने त्रस्त असल्यामुळे चिराग शेट्टीसोबत एम. आर. अर्जुन खेळत आहे. अर्जुन-चिराग जोडीने मकाऊच्या ची चॉन पुई-कॉक वेंग वाँग यांना अवघ्या २५ मिनिटांत २१-१५, २१-९ असे नमवले. महिला दुहेरीमध्ये ट्रिसा जॉली-गायत्री गोपिचंद यांनी २७ मिनिटांत वेंग ची एनजी-ची वा पुई या जोडीवर २१-१०, २१-५ अशी मात केली. मकाऊचा हा स्पर्धेतील सलग दुसरा पराभव असून यापूर्वी कोरियानेही त्यांना ०-५ असे पराभूत केले होते. (Mixed badminton)

बुधवारी झालेल्या अन्य लढतींत, ग्रुप बीमध्ये हाँगकाँगने मलेशियाचा ३-२ असा पराभव केला. ग्रुप सीमध्ये थायलंडने कझाखस्तानचा ५-० असा धुव्वा उडवला. ‘ग्रुप ए’मध्ये चायनीज तैपेई आणि सिंगापूर यांच्यामध्ये चुरशीची लढत सुरू असून त्यामध्ये तैपेईने २-१ अशी आघाडी घेतली आहे. (Mixed badminton)

हेही वाचा :

बुमराह ‘आउट’, चक्रवर्ती ‘इन’
डी. गुकेशचे आव्हान संपुष्टात

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00