अहमदाबाद : लग्नासाठी नियोजित वधूवर उत्साहाने आणि घाईगडबडीने दाखल झाले. सोबत नातेवाईकही आले होते. नटूनथटून आलेल्या अनेकांना वाटत होते की एवढा मोठा समारंभ आहे तर गर्दीही प्रचंड असणार. एवढ्या लोकांच्या उपस्थितीत आपल्या नातेवाईकाचे लग्न होतेय म्हणून उत्साहाने हे सर्वजण आलेले. पण ‘कशाचं काय आणि फाटक्यात पाय,’ अशी अवस्था वधूवरांसह नातेवाईकांचीही झाली. कारण या सामूहिक सोहळ्याचा आयोजक प्रत्येकांकडून घेतलेले पैसे घेऊन पळाला होता. जे ठिकाण सांगण्यात आले होते तेथे कुणीही नव्हते. सगळ्यांच्याच पायाखालची वाळू घसरली. (Mass wedding scam)
अहमदाबादच्या माधापर येथे ही घटना घडली. राजकोट सर्वजाती समूह लग्नसोहळा नावाने हा सामुदायिक सोहळा कथितरित्या आयोजित केला होता.
कार्यक्रम सुरळीत पार पडेल यावर विश्वास ठेवून नियोजित वधूवरांच्या कुटुंबीयांनी आयोजकाला प्रत्येकी ४०,००० रुपये दिले होते. राजकोटमध्ये ऋषिवंशी समाजाच्या नावाखाली आयोजित सर्व जातीतील २८ मुलींचा हा सामूहिक विवाह सोहळा होणार होता. आपल्या कुवतीनुसार वधूवरांच्या कुटुंबीयांनी १५ हजार ते ४० हजार रुपयांपर्यंतची रक्कम भरली होती. सर्वजण माधापरजवळील नियोजित स्थळी पोहोचले, पण तेथे समारंभाची कसलीच व्यवस्था नव्हती. (Mass wedding scam)
आयोजकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र संपर्क झाला नाही. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. एकच गोंधळ सुरू झाला. काहींचे नियोजित वर रागाने निघून जाऊ लागले, काही निघून गेलेही. त्यामुळे नियोजित वधूंच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. पोलिसांना ही घटना समजताच ते तातडीने घटनास्थळी पोहोचले. निघून गेलेल्या नियोजित काही वरांशी स्वत: संपर्क साधला. सर्वकाही व्यवस्था करून सर्वांचे लग्न सोहळे पार पाडले.
राजकोटमधील एका स्थानिक संस्थेने वऱ्हाडींची परिस्थिती लक्षात घेऊन सर्वांसाठी जेवणा-खाण्याची व्यवस्था केली. त्यामुळे पहाटेपासून आलेल्या वऱ्हाडींना दिलासा मिळाला.
राजकोटच्या विठ्ठलभाईंच्या मुलाचे लग्नही याच सोहळ्यात होणार होते. त्यांनी फसवणुकीबद्दल संताप व्यक्त केला.
‘‘सामूहिक विवाहाच्या नावाखाली झालेला हा प्रकार संताप आणणारा आहे, असा प्रसंग कधी कुणाच्याही वाट्याला येऊ नये,’’ अशी उद्विगनता त्यांनी व्यक्त केली. आयोजकांनी आमच्याकडून ४०,००० रुपये घेतले आणि गायब झाले, लोकांना अडकवून ठेवले. त्यामुळे त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. (Mass wedding scam)
शिल्पाबेन बगथरिया यांचीही कथा अशीच. त्या आपल्या मेहुण्याच्या मुलीच्या लग्नासाठी आल्या होत्या. आयोजकांनी सकाळी सहालाच सगळी तयारी होईल असे आम्हाला सांगितले होते. आमच्या दोन्ही कुटुंबाकडून प्रत्येकी १५ हजार रूपये घेतले होते. आम्ही आलो तर येथे कुणीच नव्हते.
या सोहळ्याचा आयोजक पैसे घेऊन गायब झाल्याने गोंधळ उडाला. त्यामुळे पोलिसांनी विवाहसोहळ्यांची जबाबदारी घेतली, असे सांगून राजकोट शहर एसीपी राधिका भराई यांनी संबंधित आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल. त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
हेही वाचा :
अधिकारी भावंडांसह आईचा मृतदेह आढळला
निर्माणाधीन बोगद्यात सहा कामगार अडकले