Home » Blog » मराठी-बंगालीः समान धागे सख्याचे…

मराठी-बंगालीः समान धागे सख्याचे…

मराठी-बंगालीः समान धागे सख्याचे...

by प्रतिनिधी
0 comments
Marathi-Bengali file photo

-संजय थाडे  

बंगाली व महाराष्ट्रीयन  लोक हे त्यांच्या संगीत, साहित्य, नाटक, कविता, सिनेमा, वाचन, लोकसंगीत,  शिक्षण, लेखन या क्षेत्रांविषयीचे प्रेम व प्रभुत्व यांसाठी नावाजले जातात. बंगाली आणि महाराष्ट्रीयन यांच्या शारिरिक गुणसूत्र आणि मानसिक जडणघडणीतही लक्षवेधी साम्य आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. या दोन्ही राज्यांची सामाजिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी समान भासत असली तरीदेखील   यापलीकडे जाऊन पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र यांचा परस्परांशी प्रत्यक्ष संबंध हा अन्य राज्यांच्या तुलनेत कमी येत असल्याचे माझे निरीक्षण आहे.

(उत्तरार्ध)

अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात पश्चिम बंगालमधील शिक्षणव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडून आले. पारंपारिक शैक्षणिक अभ्यासक्रमातील बंगाली,  प्राकृत, फारसी, अरेबिक  या भाषांसोबतच बंगाली लोककथा, वीरगाथा व हस्तलिखिते यांच्या अभ्यासक्रमाचाही सामावेश करण्यात आला. युरोपच्या शिक्षण व शिक्षण घेण्यासंदर्भातील कल्पनांना मूर्त स्वरूप देण्याचे कार्य पश्चिम बंगालमध्ये या काळात स्थापन  करण्यात आलेल्या विविध शैक्षणिक संस्थांद्वारे पार पडले. एशियाटिक सोसायटी (१७८४), फोर्ट विल्यम कॉलेज (१८००), सेरामपूर कॉलेज (१८१७) व हिंदू महाविद्यालय (१८१७), बिशप महाविद्यालय, संस्कृत महाविद्यालय या प्रमुख शिक्षणसंस्था पश्चिम बंगालमध्ये स्थापन करण्यात आल्या. या शिक्षणसंस्थामध्ये शिक्षण घेणारा  भद्रलोक हा नवीन वर्ग उदयास आला जो भारतातील प्रचलित समाजव्यवस्थेला पाश्चिमात्य शिक्षणाच्या तर्कशुद्ध भिंगातून पाहण्यास प्राधान्य देत होता. या वस्तुनिष्ठ दृष्टिकोनामुळे  भारतीय प्रबोधन चळवळीतील एकंदरीत सर्वच सामाजिक सुधारणांवर प्रभाव पडल्याचे दिसून येते. महाराष्ट्रातदेखील एल्फिन्स्टन महाविद्यालय (१८३५), डेक्कन कॉलेज, पुणे (१८५१), न्यू इंग्लिश स्कूल (१८८०), डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे(१८८५), फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे(१८९४) या शिक्षण संस्थांच्या स्थापनेनंतर इंग्रजी भाषेच्या अभ्यासामुळे पाश्चिमात्य मूल्यं आणि नैतिकता यांच्याशी ओळख होऊन आपल्या समाजातील प्रथांचे मूल्यमापन करण्यास सुरुवात झाली.

साहित्याचा कला आणि सांस्कृतिक क्षेत्रावरील प्रभाव

रवींद्रनाथ टागोरांपासून प्रेरणा घेतलेले मराठी साहित्यातील प्रसिद्ध लेखक पु.ल.देशपांडे यांनी शांतिनिकेतनला भेट दिली होती. पु.लंच्या वंगचित्रे या पुस्तकात त्यांनी शांतिनिकेतन, तेथील लोक, त्यांचे जगणे, रवींद्रनाथ टागोरांचे कार्य, त्यांची तत्त्व व सर्वात महत्त्वाचे म्हणजे शांतिनिकेतनमुळे त्यांच्या जगण्याला व आयुष्य जगण्याच्या तत्वज्ञानाला मिळालेली कलाटणी यांचे खूप अचूक वर्णन केले आहे. महाराष्ट्रातील आधुनिक साहित्यिकांनी ऐतिहासिक, दंतकथांना छेद देऊन सामाजिक विषयांकडे लक्ष वळवण्याचे काम केले. १९६० ते १९७० च्या दशकात मराठी रंगभूमीदेखील अनेक दिग्गज रंगकर्मींमुळे समृद्ध होत गेली. वसंत कानेटकर, प्र.के.अत्रे, रत्नाकर मतकरी, राम गणेश गडकरी व विजय तेंडुलकर यांनी रसिकांना विचार करावयास प्रवृत्त करणा-या कलाकृती समोर आणल्या.

पश्चिम बंगालमध्ये १९व्या शतकातील काही विशिष्ट कालावधी वगळता साहित्य क्षेत्रात इतक्या मोठ्या संख्येने साहित्यिकांची मांदियाळी पाहावयास मिळत नाही. राजा राममोहन रॉय,  ईश्वरचंद्र विद्यासागर, ईश्र्वरचंद्र गुप्ता, अक्षय कुमार दत्त, मधुसूदन दत्त, बंकिमचंद्र चटोपाध्याय, हेमचंद्र बॅनर्जी, दीनबंधू मित्रा इत्यादी काही निवडक साहित्यिकांची नावे आढळून येतात. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या तर मायकेल मधुसूदन दत्त यांनी बंगाली भाषेत सुनीत व निर्यमक काव्याची निर्मिती केली. बंगाली साहित्याचा पाश्चिमात्य जगतासमोर ख-या अर्थाने साक्षात्कार रवींद्रनाथ टागोर यांनी घडवून आणला. नोबल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितांचा संग्रह संचयिता हा सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह मानला जातो व या काव्यसंग्रहात महान पराक्रमी श्री छत्रपती शिवाजी महाराजांवर शिवाजी उत्सव या शीर्षकाखाली कविता समाविष्ट आहे. या कवितेत शिवाजी महाराजांवरील श्रद्धा व त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत मुघलांना केलेला प्रतिकार यांबद्दलचे वर्णन हे स्वातंत्र्यलढ्यात लढणा-यांसाठी स्फुल्लिंग होते. बंगाली साहित्यामध्ये स्वातंत्र्य चळवळीच्या काळात देशप्रेम, राष्ट्रभक्ती, स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्यासाठी प्रेरणा ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रामुख्याने ऐतिहासिक नाटक आणि कथांची निर्मिती केली गेली.

चित्रपटजगतः

सिनेमा किंवा चित्रपट ह्या आधुनिक कलाविष्काराला नवनवीन‌ प्रयोगाद्वारे एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवण्याचे श्रेय बंगाली व महाराष्ट्रातील सिनेसृष्टीला जाते. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाणारे‌ दादासाहेब फाळके हे पहिल्या भारतीय चलतचित्रपट राजा हरिश्चंद्राचे निर्माते होते. बंगाली भाषेत १९३१ साली जमाइ षष्ठी हा चित्रपट प्रदर्शित झाला. भारतीय सिनेमाला लेखन,  दिग्दर्शन, संगीत, पार्श्वगायन, कलादिग्दर्शन, तंत्रज्ञान या सर्वच प्रकारांमध्ये जागतिक स्तरावर गौरव‌ प्राप्त करुन देणारी अनेक व्यक्तिमत्त्वे महाराष्ट्र आणि बंगालच्या भूमीत जन्मली आहेत. प्रथमेश बरुआ, के. एल.सैगल, के.सी.डे , मन्ना डे, एस डी बर्मन, हृषिकेश मुखर्जी, सलील चौधरी, अनिल बिस्वास, हेमंत कुमार, गीता दत्त, किशोर कुमार, सत्यजित रे, बिमल रॉय, सुचित्रा सेन, अपर्णा सेन, ऋत्विक घटक, अशोक कुमार, सुजित सरकार, शर्मिला टागोर या बंगाली सिनेजगतातील दिग्गजांनी नेहमीच या माध्यमामध्ये प्रभावी प्रयोग केले.

महाराष्ट्र हे हिंदी चित्रपटसृष्टीचे माहेरघर मानले जाते. दादासाहेब फाळके, बाबूराव पेंटर, व्ही. शांताराम यांची धडपड ही भारतीय चित्रपटसृष्टीच्या नांदीस कारणीभूत ठरली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. व्ही शांताराम यांनी प्रभात स्टुडिओची स्थापना त्या काळात केली. महाराष्ट्राने लता मंगेशकर, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, सुमन कल्याणपूर, वसंत देसाई, सुधीर फडके, अजय अतुल यांच्यासारखे महान गायक व संगीतकार भारतीय चित्रपटसृष्टीला दिले.

लोककलांचा व रंगभूमीचा वारसा

महाराष्ट्राला संगीत नाटक आणि तमाशा यांचा समृद्ध वारसा लाभला आहे, तर पश्चिम बंगालमध्ये यात्रा व रंगभूमी यांची महान‌ परंपरा आहे. प्रोसेनिअम रंगमंचाची दोन्ही राज्यांमध्ये लोकप्रिय असलेली संकल्पना अशीच उदयास आली. स्वातंत्र्योत्तर कालखंडात महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांनी नाट्यक्षेत्र व रंगभूमीवर अनोखे शोध लावले. विजय तेंडुलकर, गिरीश कार्नाड, महेश एलकुंचवार, सतीश आळेकर यांच्या नाटकांची रूपांतरे बंगाली रंगभूमीवर मोठ्या प्रमाणात केली गेली. विजय तेंडुलकर यांची गिधाडे, सखाराम बाईंडर, घाशीराम कोतवाल ही नाटके आजही बंगाली रंगभूमीला ऊर्जा पुरवतात. सोहाग सेन यांच्या एनसेम्बल या  रंगभूमीवर काम करणा-या गटाने महेश एलकुंचवार यांच्या उत्तराधिकारी, पार्टी, उत्तर पुरुष या नाटकांचे व सतीश‌ आळेकर यांच्या सोनाटा या नाटकांचे रुपांतर व प्रयोग बंगाली रंगमंचावर केले. त्याचप्रमाणे बंगाली रंगभूमीवरील प्रसिद्ध नाटकांचे रुपांतरही मराठी रंगभूमीवर यशस्वीरीत्या करण्यात आले. बादल सरकार यांच्या `एवम इंद्रजीत` या नाटकाचे गिरीश कार्नाड यांनी, तर‌ `पगला घोडा`चे अमोल पालेकर यांनी रुपांतर केले. मनोज मित्रा यांच्या `राजदर्शन`चे हबीब तन्वीर यांनी हाऊसफुल्ल प्रयोग मराठी रंगभूमीवर केले. 

महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांनी स्वातंत्र्यपूर्व कालखंड व स्वातंत्र्योत्तर काळातही सामाजिक, धार्मिक व‌ सांस्कृतिक संक्रमणामध्ये खूप मोठे योगदान दिले आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात निर्माण झालेल्या महत्त्वपूर्ण धार्मिक सुधारणा संस्थांपैकी २० संस्था या महाराष्ट्र व पश्चिम बंगालमधील होत्या. या दोन्ही राज्यांनी धार्मिक उत्सवांना समाजामध्ये जागृती निर्माण करण्याचे माध्यम बनवले. महाराष्ट्रात गणपती उत्सव व पश्चिम बंगालमध्ये दुर्गा उत्सवांमध्ये देखाव्यांद्वारे प्रबोधन करावयाचा व स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्याची प्रेरणा निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला.

आजघडीला महाराष्ट्र व‌ पश्चिम बंगालमधील सर्वसाधारण कुटुंबांतील कौटुंबिक मूल्य व कला, वाचन ,संगीत जपण्याची आवड यांना लहानपणापासूनच प्रयत्नपूर्वक प्रोत्साहन दिले जाते, असे दिसून येते. नैसर्गिक संसाधने स्त्रोतांची मुबलकता, सुंदरबन, ताडोबा व्याघ्रप्रकल्प, राधानगरी पार्क, पर्यटनस्थळे, सागरी किनारा उपलब्धता या सर्व घटकांच्या बाबतीत निसर्गाने देखील समान‌ माप या दोन्ही राज्यांच्या पदरात पाडले‌ आहे. सांस्कृतिक, प्राकृतिक, भौगोलिक, राजकीय, सामाजिक , साहित्य, शैक्षणिक या सर्वच बाबतीत खोलवर दडलेल्या साम्यामुळे जणू काही एकमेकांची भावंडं भासणा-या महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये असलेल्या देवाणघेवाणीच्या मर्यादा भविष्यात दूर होऊन ही राज्ये एकमेकांशी अधिक जोडली जाणे, हे देशाच्या सर्वसामावेशकतेसाठी  आणि विकासासाठी निश्चितच फलदायी ठरणार आहे.

 (लेखक पश्चिम बंगालमधील निवृत्त आयएएस अधिकारी आहेत.)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00