इम्फाळ : मणिपूरच्या कांगपोक्पी जिल्ह्यात कुकी निदर्शक आणि सुरक्षा दलांत उफाळलेल्या संघर्षात एका निदर्शकाचा मृत्यू झाला. या हिंसाचारात काही महिलांसह किमान २५ जण जखमी झाले आहेत. शनिवारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्ववत करण्याचा प्रयत्न शनिवारी (८ मार्च) करण्यात आला. मात्र त्याला विरोधक करत कुकी निदर्शकांनी ठिकठिकाणी तीव्र निदर्शने केली.(Manipur)
या निदर्शनादरम्यान सुरक्षा दलाशी झालेल्या झटापटीत एकाचा मृत्यू झाला. लालगौथांग सिंगसिट असे मृताचे नाव आहे. कीथेलमन्बी येथे झालेल्या संघर्षात त्याला गोळी लागली. रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. जखमी निदर्शकांना जवळच्या सार्वजनिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. निदर्शनादरम्यान मृत्यू झाल्याचे समजताच गामगीफाई, मोटबंग आणि कीथेलमन्बीमध्ये मोठ्या प्रमाणात दंगल पसरली.
शनिवारी सकाळी आंतरजिल्हा बस सेवा पुन्हा सुरू होताच, गमगीफाई परिसरात जमावाने सेनापतीकडे जाणाऱ्या प्रवासी बसवर दगडफेक करून हल्ला केला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रत्युत्तरादाखल, सुरक्षा दलांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराचा वापर केला. तसेच लाठीमारही केला. त्यात काही निदर्शक जखमी झाले. (Manipur)
राज्यातील परिस्थिती सामान्य रहावी, यासाठी शस्त्रे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार सुमारे ११४ शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. बंदी घातलेल्या संघटनांमधील सात सदस्यांना अटक करण्यात आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्देशानुसार शनिवारी ‘मुक्त हालचाली’चा निर्णय घेण्यात आला. त्यांनी अलिकडेच सुरक्षा दलांना ८ मार्चपासून वांशिक दंगलग्रस्त या राज्यातील सर्व मार्गांवर दळणवळण पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे निर्देश दिले होते. तसेच यात अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. (Manipur)
सकाळी १० वाजण्याच्या सुमारास, चुराचांदपूर आणि सेनापती या डोंगराळ जिल्ह्यांच्या दिशेने जाणाऱ्या बसेस रिकाम्याच धावत होत्या. या बसेसना केंद्रीय दलांच्या मोठ्या ताफ्याने सुरक्षा पुरवली. यात लष्कराचे जवानही होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. चुराचांदपूरला जाणारी बस कोणत्याही बिष्णुपूर जिल्ह्यातून प्रवास करत सुरक्षितपणे कांगवईला पोहोचली. दरम्यान, कांगपोक्पी मार्गावरून सेनापतीला जाणाऱ्या बसला इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील कांगलाटोंगबीपर्यंत कोणताही अडथळा किंवा नाकेबंदीचा सामना करावा लागला नाही.
हेही वाचा :
हम्पीमध्ये परदेशी पर्यटक महिलेवर अत्याचार