कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात माजी आमदार मालोजीराजे आणि मधुरिमाराजे यांनी पुन्हा प्रचारात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला. न्यू पॅलेस नर्सरी बागेत मालोजीराजे गटाच्या कार्यकत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून तडकाफडकी माघार घेतल्यानंतर काँग्रेसने राजेश लाटकर यांना पुरस्कृत केले आहे. माघारीनंतर मालोजीराजे आणि मधुरिमाराजे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून राजेश लाटकर यांच्या प्रचार सभेत सक्रिय होण्याचा निर्णय घेतला. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मालोजीराजे म्हणाले, खासदार शाहू छत्रपती सुरवातीपासून सामान्य घरातल्या कार्यकत्यांला संधी मिळाली पाहिजे या निर्णयावर ठाम होते, मात्र कार्यकत्यांच्या तीव्र भावना असल्याने मधुरिमाराजे यांचा काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरला होता. त्यानंतर झालेल्या अनेक घडामोडीनंतर उमेदवारी अर्ज मागे घेऊन सर्वसामान्य कार्यकत्यांच्या पाठीशी उभे राहून राजेश लाटकर यांना आमदार करण्याची भावना श्रीमंत खासदार शाहू महाराज यांनी व्यक्त केली. त्यानंतर आम्ही उमेदवारी अर्ज मागे घेतला. खासदार शाहू छत्रपती यांच्या आदेशानुसार मालोजीराजे गट व काँग्रेसचे कार्यकर्ते जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघांत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी आजपासून सक्रिय होतील, अशी घोषणा केली.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघात महाविकास आघाडी पुरस्कृत राजेश लाटकर यांना निवडून आणण्यासाठी मधुरिमाराजे यांच्यासह मी आणि माझे सर्व कार्यकर्ते ताकदीने प्रचारात उतरणार असल्याचे मालोजीराजे यांनी यावेळी सांगितले. काँग्रेस पक्षाने काढलेला जाहीरनामा घरोघरी पोचवा, असे आवाहन सतेज पाटील यांनी कार्यकत्यांना केले. माजी नगरसेवकांनी आपल्या प्रभागात सूक्ष्म नियोजन करून प्रचार यंत्रणा सक्रिय करण्याची सूचना केली. बैठकीला माजी नगरसेवकांसह मालोजीराजे यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.