Home » Blog » महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांनी लाजा गुंडाळून ठेवल्या आहेत का?

महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांनी लाजा गुंडाळून ठेवल्या आहेत का?

प्रचंड बहुमताने सत्ता मिळाली आहे, त्यामुळे सरकारमधल्या सगळ्यांनीच लाजा गुंडाळून ठेवल्या आहेत.

by विजय चोरमारे
0 comments
World Economic Forum

प्रचंड बहुमताने सत्ता मिळाली आहे, त्यामुळे सरकारमधल्या सगळ्यांनीच लाजा गुंडाळून ठेवल्या आहेत. (Maharashtra Politics)

मंत्र्यांच्या निगराणीखाली गुन्हेगारी फोफावली आहे. गुन्हेगारांना संरक्षण दिले जात आहे. सत्ताधारी पक्षाच्या कारभाऱ्याला नाईलाजाने अटक करावी लागल्यानंतर तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात आहे. आणि संबंधित मंत्रीच वर आपल्यावर अन्याय होत असल्याचा कांगावा करीत आहेत.

सरकारचे प्रमुख आणि संबंधित मंत्र्यांच्या पक्षाचे प्रमुख एकमेकांकडे चेंडू टोलवत महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख बनवत आहेत. ज्याची हकालपट्टी करायची त्याच्यापुढे हतबल असल्यासारखे वागत आहेत. अनैतिक कृत्यांचे विक्रम नावावर असलेल्या मंत्र्यांच्या कोर्टात नैतिकतेचा चेंडू टाकून नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. (Maharashtra Politics)

एवढे प्रचंड बहुमत मिळवलेल्या या सरकारने सत्तेवर आल्यापासून एक दिवसही महाराष्ट्रातील जनतेला शांतता लाभू दिलेली नाही.

गुन्हे तर एकामागून एक घडत आहेत. लाडकी बहीण योजनेची दीड हजारांची दक्षिणा घेऊन आपण आपल्या सुरक्षिततेशी तर सौदा केला नाही ना, असा प्रश्न महिलांना पडू लागला आहे. निवडणुकीत मते लुटल्यानंतर लाखो महिलांना योजनेतून हुसकावून लावले आहे, ते वेगळेच.  

आणि एरव्ही घशाच्या शिरा ताणून टीव्हीवर कोकलणारी भाजपची वाचाळ मंडळी तोंड बंद करून गायब आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समुद्रात पूजन केलेल्या छत्रपतींच्या स्मारकाचे काय झाले, इंदू मिलच्या जागी उभ्या राहणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काय झाले, हे सरकारमधल्या कुणालाच ठाऊक असण्याचे कारण नाही. कारण निवडणुका होऊन गेल्यात. आता पाच वर्षे चिंता नाही. (Maharashtra Politics)

सिंधुदुर्गमधील छत्रपतींच्या पुतळ्यात दाबून भ्रष्टाचार केला. पुतळा पडला. त्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांना विरोध करायला राणे कंपनी धावली. छत्रपतींच्या अवमानाचेही त्यांना काही वाटले नाही. म्हणे आमच्या जिल्ह्यात बाहेरच्या कुणी यायचे नाही.

सत्ताधाऱ्यांनी एक नवी योजना सुरू केली आहे. छत्रपतींचा अपमान करा आणि पोलीस संरक्षण मिळवा. राहुल सोलापूरकर नावाचा सुमार नट जाहीरपणे म्हणतो की, छत्रपती शिवाजी महाराजांनी लाच देऊन आग्र्याहून सुटका करून घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्यासंदर्भात आक्षेपार्ह बोलतो. सत्तेच्या सावलीत तो सुखरूप असतो.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रशांत कोरटकर नामक निकटवर्ती पत्रकार इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना शिविगाळ करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा, जिजाऊ मासाहेबांचा अवमान करतो. आणि पोलीस संरक्षणात फरारी होतो. सत्तेसोबत राहून त्याने केलेले एकेक कारनामे बाहेर येऊ लागलेत.

सोलापूरकर, कोरटकर वगैरे मंडळींना संरक्षण देऊन आपण अशा प्रवृत्तींना प्रोत्साहन देत आहोत, हे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात येत नाही असे दिसते. किंवा ही मंडळी जे काही बोलताहेत ते त्यांना आक्षेपार्ह वाटत नसावे.

आता सरकारमधल्या एकेका मंत्र्यांची विधाने बघा.

बीडमधल्या गुन्हेगारीचं वास्तव समोर येऊ लागलं तेव्हा बीडचा बिहार झाल्याची टीका होऊ लागली. तेव्हा धनंजय मुंडे म्हणाले की, ‘‘असा महाराष्ट्रातला जिल्हा आहे का, जिथे खून, हत्या, चोरी किडनॅपिंग झाली नाही. राज्यात, देशात सगळीकडे अशा घटना घडत असतात. मग बीडचा बिहार झाला असं का म्हणता?’’

पुण्यातील स्वारगेट परिसरातील बलात्काराच्या घटनेनंतर गृहराज्यमंत्री योगेश रामदास कदम म्हणाले की, अत्याचार होत होते त्यावेळी त्या तरुणीने आरडाओरड केला नाही. विरोधही केला नाही. त्यामुळे आरोपीला गुन्हा करता आला.

याच प्रश्नासंदर्भात राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे म्हणाले, एखादी घटना घडली म्हणून महिला सुरक्षित नाही, असं म्हणता येत नाही. देशात म्हणाल तर घटना घडत असतात, कारवाई सातत्यानं चालू राहते.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी अलीकडेच शेतकऱ्यांना भिकारी संबोधले होते.

नितेश राणे रोज वादग्रस्त विधाने करीत आहेत. कुठल्याही घटकाबाबत द्वेषभावनेने वागणार नाही, पक्षपात करणार नाही, अशी शपथ घेतली असताना ते अल्पसंख्य समाजाविरोधात जाहीरपणे विषारी वक्तव्ये करीत आहेत. विरोधी पक्षाची सत्ता असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी मिळणार नाही असे म्हणताहेत. आणि देवेंद्र फडणवीस सगळे ऐकून घेताहेत.

ही सगळी मंडळी मंत्रिमंडळातून हाकलून देण्याच्या लायकीची आहेत. परंतु देवेंद्र फडणवीस या सगळ्यांना संरक्षण देत आहेत. २०१४ ते २०१९ या काळात फडणवीस यांना क्लीनचिटा वाटण्याचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे चुकीच्या गोष्टींचे संरक्षण करण्यात त्यांचा हात कुणी धरू शकत नाही. आता तर २३२ सदस्यांचे भक्कम पाठबळ आहे. शिवाय केंद्रातही त्यांचेच सरकार आहे. त्यामुळे कसेही वागले तरी कुणी काही वाकडे करू शकत नाही, किंवा आपले काही बिघडत नाही असा एक अहंकार निर्माण होणे स्वाभाविक आहे.

त्यांना एका गोष्टीची आठवण करुन द्यावीशी वाटते.

२००९ साली मुंबईवरील हल्ल्यानंत तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी, `इतने बडे शहर में एखादा हादसा हो जाता है…` असे विधान केले होते. आणि त्यावरून त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

या न्यायाने वर उल्लेख केलेल्या मंत्र्यांची तातडीने हकालपट्टी करायला पाहिजे होती. पण ती होणार नाही. कारण आपले कुणी काही बिघडू शकत नाही, याची सत्ताधाऱ्यांना पक्की खात्री आहे.

हेही वाचा :

सावंत थोड्या दिवसाचा पाहुणा…

‘शक्तीपीठ’वरून मुश्रीफ-क्षीरसागर आमने सामने

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00