कोल्हापूरच्या राजकारणात नेमके काय चालले आहे याचा अंदाज खुद्द त्या राजकारणाच्या आखाड्यातील लोकांना येत नव्हता इतके या राजकारणाने गोंधळात टाकले. कोल्हापूरचे राजकारण राज्याच्या पातळीवर इतके चर्चेत कधीच आले नव्हते. त्याअर्थाने कोल्हापूर शहराशी संबंधित मतदारसंघ हा राज्याच्या राजकारणातला तसा दुर्लक्षित मतदारसंघ म्हणावा लागेल. पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेचे फारसे अस्तित्व नसताना कोल्हापूर शहरातून शिवसेनेचा उमेदवार अनेकदा निवडून आला. त्याच्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा व्हायच्या. त्यांच्या भाषणांच्या निमित्ताने जी काही चर्च व्हायची तेवढीच. जिल्हांतर्गत चर्चा नेहमीच जोरात असते. जिल्हांतर्गत राजकारण सतत खदखदत असले तरी राज्याच्या पातळीवर त्याला फारसे महत्त्व नसायचे. परंतु मध्यंतरी झालेल्या कोल्हापूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राज्याच्या राजकीय क्षितिजावर कोल्हापूर पहिल्यांदा ठळकपणे आले. कारण ती पोटनिवडणूक तत्कालीन सत्तेतील महाविकास आघाडी आणि विरोधी महायुतीने प्रतिष्ठेची बनवली होती. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढवलेल्या त्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा पराभव केला होता. नंतर लोकसभा निवडणुकीत दस्तुरखुद्द श्रीमंत शाहू छत्रपती शाहू महाराज यांच्या उमेदवारीमुळे कोल्हापूर मतदारसंघ राज्यात चर्चेला आला होता. आता विधानसभेला कोल्हापूर शहराचा भाग असलेला कोल्हापूर उत्तर मतदारसंघ चर्चेत आला आहे. आधी महायुतीतील उमेदवारीच्या रस्सीखेचीवरून आणि नंतर महाविकास आघाडीतील नाट्यामुळे कोल्हापूर सुरुवातीपासूनच चर्चेत राहिला. दररोज नाट्यमय घडामोडी घडू लागल्या, विविध माध्यमांतून त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जाऊ लागले. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचा संभ्रम वाढत चालला. चर्चा कधी महायुतीकडे तर कधी महाविकास आघाडीकडे वळू लागली. कधी राजेश क्षीरसागर तर कधी धनंजय महाडिक, कधी सतेज पाटील तर कधी शाहू महाराज अशी चर्चेची केंद्रे बदलू लागली. कोल्हापूरच्या राजकारणात नेमके काय सुरू आहे, याचा अंदाज बांधणे भल्याभल्यांना कठीण होऊन बसले. विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्जांच्या माघारीदिवशी या सगळ्या घटनाघडामोडींनी कळस गाठला आणि राज्यभरात इतक्या सगळ्या घडामोडी घडत असताना कोल्हापूरने हेडलाईनची जागा पटकावली. घडलेल्या घटना केवळ संभ्रमित करणा-या नव्हत्या तर धक्कादायक होत्या. आताआतापर्यंत सगळे चित्र स्पष्ट असताना असे कसे काय घडू शकते, असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडू लागला.
कोल्हापूर उत्तरमधील सामना महायुतीकडून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे राजेश क्षीरसागर आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या मधुरिमाराजे छत्रपती यांच्यात होणार हे निश्चित झाले. राजेश लाटकर यांनी अर्ज भरला असला तरी ते माघार घेतील आणि माघार घेतली नाही तरी लढत शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात होईल हे स्वच्छ आणि स्पष्ट होते. परंतु माघारीसाठी काही मिनिटे बाकी असताना अचानक मधुरिमाराजे छत्रपती यांनी अर्ज मागे घेतला. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याचा धक्का कोल्हापूरपुरता मर्यादित राहिला नाही, तर तो थेट मुंबई आणि दिल्लीपर्यंत पोहोचला. राष्ट्रीय पक्षाचा अधिकृत उमेदवार अचानक माघार घेतो, हे चक्रावून टाकणारे होते आणि सुरुवातीची काही मिनिटे काय घडतेय हे कुणालाच कळत नसल्यासारखी स्थिती बनली होती. मधुरिमाराजे यांचा अर्ज मागे घेण्यासाठी काँग्रेसचे खासदार असलेल्या शाहू छत्रपती महाराज यांचा पुढाकार होता आणि काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते सतेज पाटील यांच्या इच्छेविरुद्ध हे सगळे घडत होते. त्यावरून संघर्षाचे एक नवेच चित्र दिसत होते. प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी असल्याचे शाहू महाराज यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनावरून स्पष्ट झाले आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्याविरोधात नाराजी, उमेदवार बदलल्यानंतर पुन्हा वेगळी नाराजी आणि अखेर अधिकृत उमेदवाराचीच माघार इतक्या नाट्यमय घटना अलीकडच्या काळात बघायला मिळाल्या नव्हत्या. अखेरीस बंडखोर उमेदवार राजेश लाटकर यांना पुरस्कृत करून काँग्रेस आणि महाविकास आघाडीने मार्ग काढला. परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये काँग्रेस पक्षाची पुरती नाचक्की झाली. या संपूर्ण प्रक्रियेत काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते सतेज पाटील यांना अग्निपरीक्षेतून जावे लागले. परंतु शेवटी अशा कसोटीच्या प्रसंगांमधूनच नेतृत्वाचा कस लागत असतो. सतेज पाटील आणि खासदार शाहू महाराज या दोघांनीही अत्यंत कौशल्याने आपत्ती व्यवस्थापन करून महाविकास आघाडीचे निवडणूक रिंगणातील आव्हान कायम ठेवले. अन्यथा कोल्हापूर उत्तरची निवडणूक केवळ औपचारिकता उरली असती!