Home » Blog » औरंगजेबाला सात वर्षे झुंजवून महाराष्ट्राच्या मातीत गाडणारी महाराणी

औरंगजेबाला सात वर्षे झुंजवून महाराष्ट्राच्या मातीत गाडणारी महाराणी

ताराबाईंनी बलाढ्य अशा अशियाई सत्ताधीश औरंगजेबाशी सलग सात वर्षे युध्द करून या सार्वभौम सत्तेचे रक्षण केले. आणि पुढे स्वत:च्या अस्तित्वसिध्दतेची कसोटी लागल्यावर नवीन करवीर राज्याची स्थापना केली. स्मृतीदिनानिमित्त ताराराणींच्या कर्तृत्वाला उजाळा.

by प्रतिनिधी
0 comments
  • डॅा. मंजुश्री पवार

भारतीय स्त्री इतिहासात गुणात्मक भर टाकणारा कालखंड म्हणजे मध्ययुगीन महाराष्ट्रातील मराठा राज्यकर्त्या स्त्रियांच्या कर्तृत्वाचा कालखंड. आणि त्यातील कर्तेपणाचा एक धगधगता निखारा म्हणजे महाराणी ताराबाईंचा इतिहास. महाराणी ताराबाई या शिवछत्रपतींच्या स्नुषा आणि शिवपुत्र राजाराम महाराजांच्या पत्नी. त्यांची एवढीच ओळख नाही. मराठ्यांचं राज्य धुळीला मिळवण्याचं स्वप्न उराशी बाळगून आलेल्या औरंगजेबाला आव्हान देणारी आणि त्याला महाराष्ट्रात स्वत:ला गाडून घ्यायला लावणारी मराठ्यांची २४ वर्षाची तडफदार राणी म्हणजे महाराणी ताराबाई. भारतीय इतिहासातील स्त्री शक्तीचा एक युयुत्सु अविष्कार म्हणजे महाराणी ताराबाई. जिने शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य सलग सात वर्षे संघर्ष करून औरंगजेबाच्या तावडीतून वाचवलं आणि पुढे स्वतंत्र राज्याची स्थापना केली. (Maharani Tararani)

ताराबाईंनी केवळ पती निधनानंतर राज्यकारभार सांभाळला नाही तर शिवछत्रपतींनी स्थापन केलेले ऐत्तद्देशीयांचं एकमेव सार्वभौम असं मराठ्यांचे राज्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले असताना हातात तलवार व राज्यसूत्रे घेऊन या उद्ध्वस्त झालेल्या मराठ्यांच्या राज्याचे मराठ्यांच्या साम्राज्यात रूपांतर केले. आणि बलाढ्य अशा अशियाई सत्ताधीश औरंगजेबाशी सलग सात वर्षे युध्द करून या सार्वभौम सत्तेचे रक्षण केले. आणि पुढे स्वत:च्या अस्तित्वसिध्दतेची कसोटी लागल्यावर नवीन करवीर राज्याची स्थापना केली. (Maharani Tarabai)

तळबीडच्या मोहिते घराण्यात जन्म

ताराबाईंचा जन्म १६७५ साली तळबीडच्या मोहित्यांच्या घराण्यात झाला. शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहित्यांच्या त्या कन्या. शिवदिग्विजय बखरकार म्हणतो की, हंबीरराव मोहित्यांची ही कन्या ‘सुलक्षणी’ आणि ‘सौंदर्याकरून नक्षत्र तारातव्दत होती. ’ तिचे माहेरचे नाव सीताबाई होते. संभाजी महाराजांनी आपले बंधू राजाराम महाराज यांच्याशी त्यांचा विवाह घडवून आणला. सासरी तिचे नाव ‘ताराबाई’ असे ठेवण्यात आले. विवाहाच्या वेळी ताराबाई आठ वर्षाच्या तर राजाराम महाराज तेरा वर्षांचे होते.

स्वराज्याच्या सरसेनापतीची कन्या असल्यामुळे राजकारण व युद्धकौशल्य ताराबाईंच्या रक्तातच होते. पण भोसल्यांच्या घराण्यात सून म्हणून आल्यावर त्यांचे सगळे आयुष्य हे लढाया, वेढे, पाठलाग, सुटका, या किल्ल्यावरून त्या किल्ल्यावर धावपळ यामुळे पूर्ण बदलूनच गेले. त्या जात्याच बुद्धिमान व तडफदार असल्यामुळे स्वराज्यातील परिस्थितीचा अंदाज यायला त्यांना वेळ लागला नाही. राजकारणातील शत्रू-मित्रांची जाणीव, डावपेच, दगाफटका, दरबाऱ्यांचे राजकारण यातून त्या घडत गेल्या.

संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji) मृत्युनंतरच्या १९ वर्षाच्या कालखंडात तर मराठ्यांनी ‘न भूतो न भविष्यती’ असा लढा दिला. स्वराज्याची राजधानी रायगड, महाराणी येसूबाई व राजपुत्र शाहूराजे आणि जवळजवळ सर्व गडकोट औरंगजेबाच्या ताब्यात गेले. राजा नाही, राज्य नाही, खजिना नाही अशा बिकट परिस्थितीत मराठयांनी स्वराज्यरक्षणाचे कर्तव्य बजावत राजाराम महाराजांना छत्रपती बनविले. पण औरंगजेबाच्या वादळी आक्रमणामुळे त्यांनाही आपला जीव वाचवण्यासाठी कर्नाटकातील जिंजीस पलायन करावे लागले. कारण तो काळच असा आणीबाणीचा होता की, स्वराज्याच्या छत्रपतींचे प्राण वाचवणे ही त्या काळाची गरज होती.

कर्नाटकात जाण्यापूर्वी राजाराम महाराजांनी महाराष्ट्राचा कारभार पाहाण्यासाठी ताराबाईंच्या नेतृत्वाखाली पन्हाळगडावर एका राजमंडळाची स्थापना केली. त्या राजमंडळात रामचंद्रपंत अमात्य, संताजी घोरपडे, धनाजी जाधव असे अनेक प्रमुख प्रधान व सरदार होते. ही ताराबाईंसाठी एक अपूर्व संधी होती. अनेक मातब्बर मुत्सद्द्यांच्या व सेनानींच्या सहवासात त्यांना जणू राज्यकाराभाराचे व रणनीतीचे प्रशिक्षणच मिळत होते.

वैधव्याची कुऱ्हाड

राजाराम महाराजांनी आपल्या राजनैतिक चातुर्याने जिंजीला ७/८ वर्षे वेढा घालून बसलेल्या जुल्फिकारखानाशी अंतस्थ सूत जमवले होते. आणि ज्यावेळी जिंजी सोडण्याचा प्रसंग आला त्यावेळी मराठ्यांचा राजा व त्याचा कबिला किल्ल्यातून निसटून सुखरूपपणे महाराष्ट्रात दाखल झाला. जिंजीच्या भक्कम वेढयातून आपला शत्रू बायकामुलांसह निसटल्यामुळे औरंगजेब बादशहा चरफडू लागला.
जिंजीहून परतल्यानंतर राजाराम महाराज व ताराबाई यांची पन्हाळ-विशाळगड- वसंतगड-सज्जनगड-सातारा अशा अनेक किल्ल्यांच्या आसमंतात सतत घौडदौड सुरू होती. राजाराम महाराज स्वराज्यात आल्यामुळे पुन्हा मराठ्यांवर जोरदार हल्ला करण्याच्या तयारीत औरंगजेब बादशहा होता आणि गेली ७/८ वर्षे राजाराम महाराज महाराष्ट्रात नसल्यामुळे त्यांना गडकोटांची व्यवस्था प्रत्यक्ष पाहणे गरजेचे होते. म्हणूनच आपल्या महत्त्वाच्या गडकोटांची संरक्षण व्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि औरंगजेबाशी प्रतिकाराची योजना आखण्यासाठी त्यांची ही घोडदौड चालू होती. इकडे स्वराज्याची पूर्वीची राजधानी रायगड अगोदरच मोगलांच्या ताब्यात गेली होती. आता कर्नाटकातील दुसरी राजधानीही जुल्फिकार खानाने घेतली. त्यामुळे राजाराम महाराजांनी साताऱ्याच्या किल्ल्यावर आपली नवी राजधानी स्थापन केली. या नव्या राजधानीतच ताराबाई व राज परिवार यांचे वास्तव्य होऊ लागले.
राजाराम महाराज मोगली फौजांच्या हातावर तुरी देऊन महाराष्ट्रात निसटल्यामुळे औरंगजेबाची ७/८ वर्षाची मेहनत धुळीला मिळाली होती. म्हणून त्याने इरेला पेटून मराठ्यांचे किल्ले घेण्याची एक प्रचंड मोहीमच उघडली आणि प्रचंड सैन्यानिशी तो स्वत: स्वराज्यावर चालून आला. औरंगजेबाने पहिल्या धडाक्यातच वसंतगड घेतला. मग मराठ्यांची नवी राजधानी सातारा किल्ल्याला वेढा दिला. तत्पूर्वीच ताराबाई आपल्या पुत्रासह विशाळगडाकडे रवाना झाल्या होत्या. इकडे मराठे सातारा मोठ्या जिद्दीने लढवत होते. त्याचवेळी राजाराम महाराज मोगली मुलुखांवर सातत्याने मोहिमा काढत होते. या मोहिमांतील दगदगींमुळे सिंहगडावर त्यांचा (२ मार्च १७००) मृत्यू झाला. त्यावेळी त्यांचे वय ३० होते आणि वैधव्याची कु-हाड कोसळलेल्या ताराबाईंचे वय होते अवघे २५ वर्षे.

मराठ्यांना ताराबाईंचे नेतृत्व

मराठ्यांच्या दृष्टीने संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मराठी राज्याला बसलेला हा दुसरा प्रलयकारी धक्का होता. कारण आता मराठ्यांचा राजा जिवंत नव्हता आणि मागे राहिलेल्या त्याच्या विधवा राण्या आणि त्यांची दोन लहान मुले आपल्याशी काय लढणार; असे औरंगजेब बादशहालाच नव्हे तर मोगली गोटातील सामान्य शिपायालाही वाटत होते. मराठ्यांशी चालू असलेले युद्ध आता संपलेच, आता लवकरच मराठी राज्य धुळीला मिळवून आपण उत्तरेकडे परतू असे वाटून बादशाही छावणीत सर्वत्र आनंद पसरला. बादशहाला वाटले की, त्याने ज्याप्रमाणे एकेका वर्षात आदिलशाही व कुतुबशाही या शाह्या घेतल्या तशी चुटकीसरशी आपण आता मराठेशाहीही घेऊ.
पण मराठ्यांच्या अवघ्या २५ वर्षाच्या विधवा राणीने आशिया खंडातील सर्वात बलाढ्य अशा ८२ वर्षाच्या औरंगजेब बादशहाशी सतत सात वर्षे संघर्ष करून आपल्या राज्याचे रक्षण केले. राज्य गिळकृंत करण्याचे औरंगजेबाचे स्वप्न धुळीस मिळवले. वैधव्याचे दु:ख बाजूला ठेवून ताराबाईंनी आपला पुत्र शिवाजीराजे याला मराठ्यांच्या गादीवर बसवले आणि राज्यकारभारापासून ते लष्करी मोहिमांपर्यंतची कारभाराची सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली.

ताराबाईंची रणनीती

औरंगजेब बादशहाशी ७/८ वर्षाचा लष्करी संघर्ष ताराबाईंनी खुद्द आपल्या नेतृत्वाखाली केला. मराठयांच्या स्वराज्याविषयी व त्यावर कोसळलेल्या संकटांविषयी जेव्हा विचार मनात येतो तेव्हा पं. नेहंरूनी १९३८ साली लखनौत भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या संदर्भात काढलेल्या एका उद्गाराची आठवण होते- “Freedom is in Peril, defend it with all your might”

ताराबाईंच्या नेतृत्वाच्या काळात असेच स्वातंत्र्य धोक्यात आले होते. म्हणून सर्वशक्तीनिशी त्याचे संरक्षण करायला त्या उभ्या ठाकल्या. त्यासाठी त्यांनी शिवछत्रपतींची रणनीती अवलंबली.

शिवाजी महाराज एकदा आपल्या गडकोटांबद्दल अभिमानाने म्हणाले होते, “दिल्लीसारखा शत्रू उरावर आहे. तो आला तरी नवे-जुने मिळून ३६० किल्ले हजरीस आहेत. एक-एक किल्ला वर्ष-वर्ष जरी लढला तरी औरंगजेबाला स्वराज्य घ्यायला ३६० वर्षे लागतील!” ताराबाईंनी शिवछत्रपतींचं हे वाक्य तंतोतंत खरे करून दाखवले. काय होती त्यांची रणनीती? औरंगजेबाने वेढा घातलेला किल्ला शक्य तितका लढवायचा. बादशहास जास्तीत जास्त काळ एकाच किल्ल्याच्या वेढ्यात गुंतवून ठेवायचे. किल्ल्यावरील रसद संपत आली आणि पावसाळा तोंडावर आला की मग वाटाघाटी करून बादशहाकडून भरपूर द्रव्य घेऊन तो त्याला विकत द्यायचा. औरंगजेबाचे सरदारही मराठ्यांना भरपूर पैसा द्यायला तयार व्हायचे कारण तो किल्ला घेणे. दुसरे असे की औरंगजेबही सरदारांना मोबदला देत असे. हा बादशहाच्या इज्जतीचा प्रश्न असायचा.

अशा प्रकारे मराठे किल्ल्यातून सुखरूप बाहेर पडले की मोकळा किल्ला बादशहाच्या हातात पडायचा. हाती आलेल्या किल्ल्याची व्यवस्था लावून तो ऐन पावसाळ्यात त्या किल्ल्यापासून परतीच्या प्रवासाला लागायचा. परतताना सह्याद्रीच्या मुसळधार पावसाने त्याच्या सैन्याची दैना उडायची. पाऊस, दलदल, वाहून गेलेले रस्ते, सोसाट्याचा वारा यात त्याच्या सैन्याची हैराणगत होत असतानाच ताराबाईंच्या फौजा त्याची लांडगेतोड करायच्या आणि इकडे बादशहाची पाठ वळताच ताराबाई आपला किल्ला पुन्हा काबीज करायच्या. त्यामुळे औरंगजेबाची जवळजवळ वर्षभराची मेहनत वाया जायची. ही झाली ताराबाईंच्या लष्करी धोरणाची एक बाजू.

दुसऱ्या बाजूवर, जेव्हा औरंगजेब इकडे सह्याद्रीच्या बेलाग दुर्गांवर धडका मारत होता तेव्हा त्याचे नीतिधैर्य खचवण्यासाठी ताराबाई मोगली सुभ्यात आपल्या सरदारांच्या नेतृत्वाखाली फौजा घुसवत होत्या. मराठी फौजा वऱ्हाड, खानदेश, गुजरात, माळवा, तेलगंण व कर्नाटक या मोगली मुलखात घुसून धामधूम माजवीत होत्या. त्यांनी मोगलांची बडोदे, सुरत, सिरोज, अहमदाबाद, गोवळकोंडा अशी अनेक शहरे लुटली. त्या आता माळव्यातून दिल्लीकडे तर ओरिसातून डाक्याकडे चाल करू लागल्या. अशाप्रकारे महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेबर धुमाकूळ घालणाऱ्या ताराबाईंच्या फौजांनी औरंगजेबाची दमछाक केली होती. ताराबाईंनी मोगलांशी लढताना एकाचवेळी सरंक्षणात्मक व आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यांच्या युद्धनीतीने मराठ्यांची अस्मिता पुनरूज्जीवित झाली.

ताराबाईंचा औरंगजेबाशी लढा

२५ वर्षाच्या ताराबाईंसमोर उभा ठाकलेला औरंगजेब बादशहा हा काही सामान्य शत्रू नव्हता. काबूलपासून बंगालपर्यंत आणि काश्मीरपासून कावेरीपर्यंत त्यांचे २२ सुभ्यांचे व ३५ करोड उत्पन्नाचे महाकाय साम्राज्य पसरले होते. त्याच्या पाठीशी साम्राज्याची प्रचंड लष्करी व आर्थिक शक्ती उभी होती. अशा सामर्थ्याशाली बादशहाचा प्रतिकार करण्यासाठी महाराष्ट्राची तरूण विधवा राणी धैर्याने उभी राहिली होती.

मोगली लष्करात खुद्द बादशहा व त्याचे अनेक मातब्बर सरदार होते. प्रचंड सैन्य व दारूगोळा होता. एकदा त्याच्या तोफखान्याचा प्रमुख तरबियत खान याने किल्ल्यावर तोफा डागण्यासाठी प्रचंड उंच लाकडी मनोरा तयार केला. किल्ल्यावर तोफांचा भडिमार सुरू झाला. तरीही किल्ल्यावरील शिरबंदीला काही फरक पडेना. मग औरंगजेबाच्या सैन्याने किल्ल्याच्या तटांना दोन मोठे सुरूंग लावले. त्याच्या पहिल्या स्फोटात किल्ल्याची तटबंदी आतील मराठयांवर कोसळली तर दुसऱ्या स्फोटाने तटाची दुसरी बाजू हजारो मोगल सैनिकांवर कोसळली. तो प्रचंड लाकडी मनोराही कोसळला. सर्वत्र हाहाकार माजला. हजारो मोगल सैनिक दगडमातीच्या ढिगा-याखाली गाडले गेले. तटाला भगदाड पडले तरी त्यातून चाल करून जाण्याची हिंमत मोगल सैन्यात उरली नव्हती. शेवटी खचलेल्या मनस्थितीत बादशहाला मराठ्यांशी वाटाघाटी कराव्या लागल्या. मराठ्यांनीही अभय घेऊन किल्ला सोडून दिला. (थोडया दिवसांनी परत घेण्यासाठी)

साताऱ्याप्रमाणे परळीच्या वेढ्यातही औरंगजेबाला नामुष्कीजनक वाटाघाटी कराव्या लागल्या. तरीही नाउमेद न होता त्याने पन्हाळ्याकडे आपला मोहरा वळवला. आपला नातू बेदारबख्त व जुल्फिकारखान यांना घेऊन तो पन्हाळ्याच्या पायथ्याशी पोहोचला. या लढ्यात ताराबाई स्वत: लक्ष घालत होत्या. ज्या किल्ल्याला औरंगजेब वेढा देऊन बसे त्या किल्ल्याच्या किल्लेदाराची उमेद त्या कशी वाढवत, हे त्यांच्या पावनगडच्या किल्लेदाराला लिहिलेल्या एका पत्रावरून लक्षात येते.

हे संपूर्ण पत्रच जोशपूर्ण आहे. पण त्यातील “…. औरंगजेबास तरी ठेंचगा द्यावा अशी उमेद धरा ….याउपरी औरंगजेब आला आहे, तरी त्याचा हिसाब न धरता स्वामींची जागा जतन करणे….” हे त्यांचे उद्गार त्यांच्यातील लढाऊ बाणा दाखवून देतात.

आता, हल्ला करून पन्हाळा जिंकणे मोगल सेनेस अशक्य होते. त्यामुळे पुन्हा बादशहाने मराठ्यांशी वाटाघाटी चालू केल्या आणि पन्हाळा व पावनगड या जोड किल्ल्यासाठी त्याने मराठ्यांना ५५ हजार रूपये खंडणी दिली. बादशहाने पन्हाळा काबीज केला तरी, आशिया खंडातील एका महाबलाढ्य सम्राटाला लढून नव्हे तर वाटाघाटीने ताराबाईंचा एक किल्ला घ्यायला एक वर्ष खर्ची घालावे लागले. यात त्याचे नव्हे तर ताराबाईंचे यश होते, त्याला एकाच किल्ल्याच्या पायथ्याशी वर्षभऱ जखडून ठेवण्यात त्या यशस्वी होत होत्या आणि याचवेळी ताराबाईंच्या आदेशानुसार त्यांचे सेनापती धनाजी जाधव, राणोजी घोरपडे, निबांळकर इत्यादी सेनानी मोगली मुलखात व बादशहा छावण्यांवर हल्ले करून धामधूम माजवत होते. हीच ताराबाईंची युद्धनीती होती.

विशाळगडचा वेढा

ताराबाईंच्या आक्रमक रणनीतीचे व औरंगजेबाच्या चिवट जिद्दीचे उत्तम उदाहरण म्हणजे विशाळगडाचा वेढा. पन्हाळा घेतल्यावर पुढच्या वर्षी (इ.स.१७०२) बादशहा विशाळगडाच्या पायथ्याशी पोहोचला. वेढ्याची प्रमुख कामगिरी त्याने फत्तेउल्ला खान या अत्यंत मुरब्बी अशा सरदारावर सोपवली होती. तो जेवढ्या शौर्याने किल्ल्यावर हल्ला चढवत होता, तेवढ्याच त्वेषाने मराठे त्याचे हल्ले परतवून लावत होते.

पावसाळ्यापूर्वी विशाळगडावर हल्ला करून तो हाती लागणार नाही, हे बादशहाच्या लक्षात आल्यावर त्याने पुन्हा वाटाघाटीची नेहमीची भाषा सुरू केली. पावसाळा तोंडावर आलाच होता. त्यामुळे दोन लाख रूपये खंडणी घेऊन मराठ्यांनी किल्ला ताब्यात दिला. बादशहाला किल्ला मिळाला. पण परतीच्या प्रवासात त्याच्या सैन्याच्या हैराणगतीस सुरूवात झाली. मुसळधार पाऊस, अंगाला झोंबणारा वारा, नदी नाल्यांना आलेले अक्राळविक्राळ पूर, अन्नधान्याची अभूतपूर्व टंचाई, प्राय:ही लोकांचे बळी घेणारी रोगराई यातच मोगली लष्कारातील हजारो सैनिक मृत्यूमुखी पडले. औरंगजेबाला विशाळगड ते पन्हाळा हे ३० मैलांचे अंतर कापण्यास ३८ दिवस लागले. याचदरम्यान मराठ्यांचे हल्ले सुरूच होते. ताराबाईंच्या सरदारांनी मोगली फौजातील पाच अधिकारी पकडले. ते इतक्या महत्त्वाच्या हुददयावर होते की, औरंगजेबाला त्यांच्या सुटकेसाठी ताराबाईंना प्रत्येकी एक लाख रूपये दंड द्यावा लागला.

असे करत कसाबसा बादशहा जेव्हा पन्हाळ्याच्या पायथ्याशी पोहोचला तेव्हा त्याचे सैन्य अर्धमेले झाले होते. मराठ्यांच्या किल्ल्याभोवतीचा एकएक वेढा हा औरंगजेबाला अंतिम पराभवाकडे व नैराश्याकडे नेत होता. कारण त्याने नंतर सिंहगड, राजगड, तोरणा या किल्ल्यांनाही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, मराठ्यांची बाजू वरचढ असतानाही चिकाटीने वेढे घातले व ते जिंकण्याचा प्रयत्न केला. पण वेढा घातलेला प्रत्येक किल्ला ताराबाईंनी शौर्याने लढवला. त्यामुळे त्याला यश येत नव्हते. औरंगजेबाला चार-पाच वर्षात असे १० लहानमोठे किल्ले पैसे मोजून वाटाघाटीने घ्यावे लागले. जे त्याची पाठ वळताच वर्षभरात ताराबाईंनी पुन्हा काबीज केले. हे ताराबाईंच्या आक्रमक व मुत्सद्दी धोरणाचे यश होते.

ताराबाईंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांची भरारी

औरंगजेब बादशहाने दक्षिणेतील जो प्रदेश जिंकलेला होता, तो ताब्यात ठेवण्यासाठी त्याला दक्षिणेत राहणे गरजेचे बनले होते. आणि ताराबाईंना हे चांगले माहीत होते की, बादशहा मराठ्यांचे किल्ले काही डोक्यावर उचलून दिल्लीला घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे बादशहाचा मराठ्यांच्या एकेका किल्ल्यास वेढा घालण्याचा उद्योग चालू असताना ताराबाईंनी आपल्या मराठी फौजा बादशहाच्या मुलखात चौफेर पाठवून त्याला जेरीस आणण्याची योजना आखली. ताराबाईंनी महाराष्ट्रात विखुरलेल्या सरदारांना एकत्र आणून त्यांना स्वराज्याच्या रक्षणाच्या कार्यात आणले. त्यांच्याच प्रोत्साहनाने मराठा सरदारांनी तेलंगण, ओरिसा, बंगाल, गुजरात, माळवा अशा हिंदुस्थानातील अनेक प्रदेशात धामधूम माजवली. मराठ्यांनी मोगली मुलुखांवर चालवलेल्या हल्ल्यांच्या बातम्या महाराष्ट्रात मराठ्यांच्या किल्ल्याच्या पायथ्याशी वेढा घालून बसलेल्या औरंगजेबापर्यंत येऊन थडकत होत्या. या मराठा सरदारांचे हल्ले मोडून काढण्यासाठी तो आपल्या दूरदूरच्या सरदारांना हुकुम सोडत असे. त्याच्या हुकुमाप्रमाणे त्याचे सरदार मराठ्यांचा पाठलाग करत, पण ते तेथे पोहोचेपर्यंत मराठे तेथून पसार झालेले असत.

ताराबाईंसमोर औरंगजेब हतबल

अशाप्रकारे मराठ्यांनी ताराबाईंच्या नेतृत्वाखाली गुजरात, माळवा, तेलंगण आणि कर्नाटक अशा अनेक मोगली मुलखांत मोहिमांची धूम उठविली. औरंगजेबाची मोठमोठी शहरे लुटली. त्याच्या नामांकित सरदारांना कैद केले. त्यामुळे आता या मराठ्यांच्या आक्रमणांपासून आपल्या मुलखाचे रक्षण करणे, औरंगजेबाला अशक्य होऊ लागले. पण अशा परिस्थितीतही मराठ्यांशी लढण्याचा त्याचा इरादा यत्किंचितही कमी झाला नव्हता. कारण औरंगजेबही काही लेचापेचा सत्ताधीश नव्हता. एकेक शाही एकेक वर्षात गिळंकृत केलेला, रजपूतांसारख्या अत्यंत कडव्या व स्वाभिमानी लोकांना नमवणारा आणि आखिल हिंदूस्थानावर मोगल साम्राज्यांची घट्ट पकड ठेवलेला असा तो अत्यंत जिद्दी, चिवट व कट्टर साम्राज्यवादी असा सत्ताधीश होता. मराठ्यांच्या राणीने त्याचा डाव त्याच्यावरच उलटवल्यावरही तो डगमगला नव्हता. वयाच्या ८९ वर्षीही शरीराने थकला असला, तरी मराठ्यांशी लढा चालू ठेवून मराठेशाही संपविण्याची उमेद शेवटपर्यंत बाळगून होता. अशा इतिहासातील एका हट्टी आक्रमक सम्राटाशी आमची मराठ्यांची तरूण राणी तडफेने लढत होती.

शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या, इथल्या भूमीपुत्रांच्या स्वराज्याला समूळ नष्ट करण्याची प्रतिज्ञा घेऊन दक्षिणेत उतरलेल्या मोगल बादशहाला त्याच्या म्हातारपणी एका शूर मराठा स्त्रीकडून हार पत्करावी लागली आणि जी भूमी घेण्यासाठी तो दिल्लीहून येथे आला त्याच भूमीत त्याला स्वत:ला दफन व्हावे लागले. अत्यंत पश्चातापदग्ध व निराश अवस्थेत दिल्लीपती औरंगजेब बादशहाने २० फेब्रुवारी १७०७ रोजी आपला देह मराठ्यांच्याच भूमीवर ठेवून जगाचा निरोप घेतला! त्याला शेवटपर्यंत दिल्लीचे तख्त पुन्हा पाहता आले नाही.

भारताच्या इतिहासात जुलमी साम्राज्यशाही विरूद्ध लढणाऱ्या अनेक स्त्रिया होऊन गेल्या. त्यात अहमदनगरची चांदबीबी, गोंडवणची राणी दुर्गावती, झांशीची राणी लक्ष्मीबाई अशा अनेक शूर स्त्रिया आहेत. पण ताराबाईंच्या कर्तृत्वाचे वेगळेपण असे आहे की, ताराबाईंनी दिव्यावर पतंग उडी मारतो त्याप्रमाणे आत्मयज्ञ केला नाही. औरंगजेबाशी एकच निर्णायक लढा न देता, त्यांनी त्याच्या मृत्यूपर्यंत त्याच्याशी झुंज दिली आणि शेवटी त्याला अगतिक करून टाकले. ज्या महाराष्ट्रास गुलाम करण्यासाठी औरंगजेब सर्व शक्तीनिशी धावून आला होता, त्याच महाराष्ट्राच्या मातीत त्याला त्यांनी गाडून टाकले!

(रेखाचित्रः संजय शेलार यांचे. विजय चोरमारे संपादित कर्तृत्ववान मराठा स्त्रिया या पुस्तकातून साभार)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00