Home » Blog » Kuldeep : ‘मला आता लय सापडतेय’

Kuldeep : ‘मला आता लय सापडतेय’

अधिक खेळल्याने कामगिरी सुधाण्याचा कुलदीपला विश्वास

by प्रतिनिधी
0 comments
Kuldeep

दुबई : मला आता चांगली लय सापडली असून प्रत्येक सामन्यागणिक माझी कामगिरी सुधारत असल्याचे भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने सांगितले. चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कुलदीपने तीन विकेट घेऊन आपली उपयुक्तता सिद्ध केली होती. (Kuldeep)
डावखुरा फिरकीपटू असणाऱ्या तीस वर्षीय कुलदीपवर मागील वर्षी हर्नियाची शस्त्रक्रिया करण्यात आल्यामुळे त्याला चार महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागले होते. “या दुखापतीतून पूर्णत: सावरण्यासाठी मला सहा महिने लागले. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी मी इंग्लंडविरुद्ध दोन सामने खेळलो होतो. त्या सामन्यांपासून मला लय सापडली. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांगलादेशविरुद्धच्या सलामीच्या सामन्यातही माझ्या गोलंदाजीची लय चांगली होती. परंतु, त्या सामन्यात मला विकेट मिळाली नव्हती. पाकविरुद्ध पहिले षटक टाकताच चांगली लय गवसल्याचे माझ्या लक्षात आले,” असे कुलदीप म्हणाला. (Kuldeep)
“पुढील सामन्यात मी आणखी चांगली गोलंदाजी करू शकतो. मी ३-४ सामने खेळलो आहे. अधिक सामने खेळण्याबरोबरच माझ्या कामगिरीत सुधारणा होईल,” असेही कुलदीपने सांगितले. कुलदीपने पाक संघातील सलमान आघा, शाहीन शाह आफ्रिदी आणि नसीम शाह यांच्या विकेट घेतल्या. त्यापैकी, सलमान आणि शाहीन यांच्या विकेट लागोपाठच्या चेंडूंवर घेतल्यामुळे त्याला हॅट्ट्रिकचीही संधी होती. गोलंदाजीच्या नियोजनाविषयी बोलताना कुलदीप म्हणाला, “पहिल्या स्पेलमध्ये मी बरेचसे चायनामन चेंडू टाकले. त्यामुळे, ‘राँग वन’ चेंडू हा फलंदाजांना चकवणारा ठरला. राँग वन चेंडूवर मला टॉपस्पिनही मिळत होता.” (Kuldeep)
प्रत्येक सामन्यागणिक गोलंदाजीमध्ये अधिकाधिक अचूकता येत आहे. जेव्हा तुम्ही अधिक सामने खेळता, तेव्हा तुम्ही गोलंदाजीच्या वेगामध्येही बदल करू शकता. अखेरच्या दहा षटकांमध्ये गोलंदाजी करण्यासाठी मी कर्णधाराच्या पसंतीचा पर्याय ठरलो. विविधता असल्यास फिरकी गोलंदाजीवर फटके खेळणे कठीण जाते. दुबईची खेळपट्टी संथ होती. त्यामुळे मी वेग आणि फिरकी यांचा मेळ साधून गोलंदाजीत विविधता आणण्याचा प्रयत्न केला, असेही त्याने नमूद केले. (Kuldeep)

हेही वाचा :

भारताने पाकला नमवले

भारतीय महिलांची जर्मनीवर मात

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00