कोल्हापूर : प्रतिनिधी : बलाढ्य खंडोबा तालीम मंडळाला संयुक्त जुना बुधवार पेठ फुटबॉल संघाने १-१ असे बरोबरीत रोखले. तर झुंजार क्लबने पाटाकडील तालीम मंडळ ब संघाला सडन डेथवर १-० अशा फरकाने पराभूत केले. पूर्णवेळेत सामना २-२ असा बरोबरीत राहिला. कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन आयोजित केएसए अ गट वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धा शाहू स्टेडियमवर खेळवली जात आहे. (KSA Football)
खंडोबा आणि जुना बुधवार पेठ यांच्यातील सामना चुरशीचा झाला. पूर्वार्धात खंडोबाच्या दिग्विजय आसनेकरने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी मध्यंतरापर्यंत टिकली. उत्तरार्धात गोल फेडण्यासाठी जुना बुधवार संघाने जोरदार चढाया केल्या. त्यांच्या भवानी जैस्वालने गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला. पूर्णवेळेत दोन्ही संघ आघाडी घेऊ न शकल्याने सामना बरोबरीत राहिला. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला.(KSA Football)
दुपारच्या सत्रातील पाटाकडील ब आणि झुंजार क्लब यांच्यातील पहिला सामना अत्यंत चुरशीचा झाला. सामन्याच्या १७ व्या मिनिटाला सुजीत राजगोपालने गोल करत झुंजारला आघाडी मिळवून दिली. ३८ व्या मिनिटाला श्रवण शिंदेने गोल करत झुंजारची आघाडी वाढवली. मध्यंत्तरापूर्वी जादा वेळेत पाटाकडीलच्या यश मुळीकने जोरदार मुसंडी मारत गोल केला. मध्यंत्तरापूर्वी झुंजार क्लब २-१ असा आघाडीवर होता.
उत्तरार्धात परतफेड करण्यासाठी पाटाकडीलने वेगवान चढाया केल्या. यश मुळीकने वैयक्तिक आणि संघाचा दुसरा गोल करत सामना २-२ असा बरोबरीत आणला. हीच स्थिती पूर्णवेळेत राहिल्याने मुख्य पंचांनी टायब्रेकरचा अवलंब केला. टायब्रेकरमध्ये सामना ३-३ बरोबरीत राहिल्यावर सडनडेथचा अवलंब करण्यात आला. त्यामध्ये झुंजार क्लबने बाजी मारली. झुंजार क्लबने तीन गुणांची कमाई केली.
गुरुवारचे सामने
- पहिला सामना : उत्तरेश्वर पेठ प्रासादिक वाघाची तालीम मंडळ वि. वेताळमाळ तालीम मंडळ, दुपारी २.०० वा.
- दुसरा सामना : बालगोपाल तालीम मंडळ वि. सम्राटनगर स्पोर्टस् क्लब, दुपारी ४.०० वा.
हेही वाचा :