Home » Blog » Koratkar Case : पोलिसांच्या सल्ल्याने कोरटकरकडून डेटा डिलिट

Koratkar Case : पोलिसांच्या सल्ल्याने कोरटकरकडून डेटा डिलिट

ॲड. असीम सरोदे यांचा युक्तिवाद

by प्रतिनिधी
0 comments
Koratkar Case

कोल्हापूर : प्रतिनिधी : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकरने नागपूर आणि कोल्हापुरातील काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या  सल्ल्यानेच मोबाइलमधील डेटा डिलिट केला, अशी धक्कादायक माहिती फिर्यादी सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी न्यायालयात दिली. कोरटकर याचे काही आयपीएस अधिकाऱ्यांची ओळख आहे असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत संशयित आरोपी कोरटकरच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली. मंगळवारी (१८ मार्च) जामिनावर अंतिम निर्णय होणार आहे. (Koratkar Case)

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकावल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरवर कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कोरटकरचा जामीन अर्ज रद्द करावा, अशी मागणी सरकारी वकील विवेक शुक्ल आणि फिर्यादीचे वकील असीम सरोदे यांनी न्यायालयात केली तर  कोरटकरच्या वकिलांनी जामीन अर्ज मंजूर करण्याची विनंती केली. ॲड. शुक्ल यांनी काही खटल्यांचे संदर्भ दिले. पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनीही न्यायालयात बाजू मांडत कोरटकरच्या अटकेची गरज व्यक्त केली. यावेळी फिर्यादी इंद्रजीत सावंत यांच्यासह हर्षल सुर्वे, दिलीप देसाई, आदी शिवप्रेमी उपस्थित होते. सुनावणीसाठी वकिलांनीही मोठी गर्दी केली होती. (Koratkar Case)

महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना सरंक्षण देताहात का?

सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी प्रशांत कोरटकरचा अंतरिम जामीन रद्द करावा अशी मागणी केली. विवेक शुक्ल म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलण्याचा अधिकार कोरटकरला आहे का? कोरटकरने शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला आपण सरंक्षण देत आहात का? असा प्रश्न केला. कोरटकरने पोलिसांकडे मोबाईल जमा करताना फॉरमॅट करुन दिला आहे. त्यांनी केरळमधील केसचा संदर्भ देत कोरटकरचा अंतरिम जामीन रद्द करावा अशी मागणी केली. कोरटकर असा गुन्हा परत करणार नाही याची शाश्वती कोण देणार? संशयिताने जी धमकी दिली आहे ती प्रत्यक्षात आणली तर काय होईल याकडे त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. ही केस किती गंभीर आहे पोलिसांना ठरवू द्या. अशा प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानेही हस्तक्षेप केला आहे. तपासात सहकार्य करणार असे सांगत कोरटकरने जामीन मंजूर करावा अशी न्यायालयाला विनंती केली आहे. मात्र माझा आवाज नाही अशी म्हणणारी व्यक्ती गुन्हा दाखल झाल्यावर पसार झाली आहे. मोबाईल जमा करताना तोही फॉरमॅट करुन दिला आहे. फक्त ऑडिओ क्लिप महत्त्वाची नाही तर त्याच्या इन्स्टा पेजवरही काही आक्षेपार्ह लिखाण केले आहे. अजून तपास पूर्ण झालेला नाही. तपासाची सुरुवात आता झाली आहे. त्यामुळे आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर करावा, अशी मागणी सरकारी ॲड. शुक्ल यांनी केली. (Koratkar Case)

ॲड. सरोदे यांचा जोरदार युक्तीवाद

ॲड. असीम सरोदे युक्तिवाद करताना म्हणाले, ‘कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे चारित्र्यहनन करून दोन समुदायात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. इंद्रजीत सावंत यांना असभ्य भाषा वापरली, शिव्या घातल्या. गुन्हे दाखल होताच त्याने नागपूर आणि कोल्हापुरातील काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने पुरावे नष्ट करण्यासाठी मोबाइलमधील डेटा डिलिट केला. याबाबतचे कलम गुन्ह्यात वाढवण्याची गरज आहे. सावंत यांना धमकावण्यापूर्वी त्याचे कोणाशी बोलणे झाले? काय बोलणे झाले? त्याचे कोणासोबत फोटो होते? याची माहिती मोबाइलमधून मिळाली असती. त्याच्या चौकशीसाठी अटक गरजेची आहे. मोबाईलमधील पुरावा नष्ट केल्याने त्यांच्यावर पोलिसांनी २४१ कलम लावले पाहिजे. (Koratkar Case)

….. हे ब्राह्मणांचे सरकार आहे

असीम सरोदे म्हणाले, कोरटकर म्हणाले होते की हे ब्राह्म्णांचे सरकार आहे, पण कोणताच ब्राह्म्ण म्हणत नाही की हे ब्राह्मणाचे सरकार आहे. कोरटकरांना इंद्रजीत सावंत यांच्याबद्दल कोणत्या वाक्याविषयी राग आला. त्यांनी रात्री बारा वाजता इंद्रजीत सावंत यांना फोन केला आहे. कोरटकर काय म्हणाले हे सरोदे यांनी वादग्रस्त शब्द वगळून कोर्टात वाचून दाखवले. ब्राह्मणाबद्दल काय बोलले हे समजले पाहिजे. त्यासाठी प्रशांत कोरटकर न्यायालयात समोर हजर राहण्यासाठी आले पाहिजे. जर इंद्रजीत सावंत ब्राह्मणांबद्दल बोलले असतील तर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे. (Koratkar Case)

डाटा डिलीट केलेला नाही

कोरटकरने मोबाईलमधील डाटा डिलीट केलेला नाही. जो आयफोन वापरला जात होता तो आधीच जमा केला आहे. कोरटकरना अटक झाली नाही तर दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे पोलिस कसे म्हणून शकतात असा प्रश्न बचाव पक्षाचे वकील सौरभ घाग यांनी न्यायालयात केला. ते म्हणाले, फिर्यादींनी फोन झाल्यानंतर पोलिस ठाण्यात न जाता आधी अर्धवट ऑडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. त्यानंतर सायंकाळी पावणेसहा वाजता पोलिस ठाण्यात तक्रार दिली. फिर्यादींनी अगोदर पोलिसांकडे जायला पाहिजे होते. आम्ही तपासकामी मदत केली आहे. मोबाईलही जमा केला आहे. जी कलमे लावली आहेत त्यांना सात वर्षांखालील शिक्षेची तरतूद आहे. तसेच कोरटकर आवाजाचा नमुना देण्यास तयार आहेत. मात्र कायदा व सुव्यवस्था आणि माध्यमामुळे मला अडचणी निर्माण होऊ शकतात. मी तपासात पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे असे कोरटकरांनी सांगितले आहे. पोलिसांकडून जाती जातीत तेढ निर्माण करण्याचे कलम लावले आहे. जामीन अर्ज रद्द करण्यासाठी पोलिसांकडून सांगण्यात आलेली कारणे खूप गंभीर आहेत, याकडे त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. (Koratkar Case)

कोरटकरच्या मोबाईलवरुन कॉल

इंद्रजीत सावंत यांना कोरटकर यांच्या मोबाईलवर कॉल आला होता असे जुना राजवाडा पोलिसांनी कोर्टात सांगितले. आपला फोन हॅक झाल्याचे त्यांनी सांगितलेले नाही. कोरटकरने शासनाबाबतीत देखील वक्तव्य केले आहे. त्यांनी शासनाचा अपमान केला आहे, असेही पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. (Koratkar Case)

हेही वाचा :
औरंगजेबाचे महिमामंडन करणाऱ्यांवर कठोर कारवाई
विधानपरिषदेसाठी शिंदे, पवार गटाचे उमेदवार ठरले
गोडसेचा गौरव करणाऱ्याला बढती कशी मिळते?

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00