कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवात यंदा सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शन, स्पर्धा असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. घटस्थापना ते विजयादशमीदरम्यान म्हणजेच ३ ते १२ ऑक्टोबरदरम्यान हा महोत्सव होणार आहे. महोत्सवाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांच्या हस्ताक्षरातील दुर्मिळ पत्रसंग्रहाच्या उद्घाटनाने होणार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. (Kolhapur Shahi Dasra)
गुरुवारी, तीन ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता मेन राजाराम हायस्कूल येथे ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. ग्रंथ प्रदर्शनाबरोबरच विक्रीही होणार आहे. शुक्रवारी (४ ऑक्टोबर) जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि निमसरकारी कार्यालये, शाळा-महाविद्यालयात पारंपरिक वेशभूषा दिवस साजरा केला जाणार आहे. (Kolhapur Shahi Dasra)
शनिवारी (५ ऑक्टोबर) रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे. रविवारी (६ ऑक्टोबर) रोजी सायंकाळी पाच वाजता भवानी मंडपात ‘महाराष्ट्राची शक्तिपीठे’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. सोमवारी (७ ऑक्टोबर) रोजी सकाळी आठ वाजता महिलांची बाईक रॅली होणार आहे. दसरा चौक, बिंदू चौक, शिवाजी पुतळा, भवानी मंडप, टेंबलाई मंदिर, कावळा नाका परत दसरा चौक असा रॅलीचा मार्ग आहे. सायंकाळी पाच वाजता ‘गौरव माय मराठीचा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम भवानी मंडपात होणार आहे.
मंगळवारी (८ ऑक्टोबर) साडेपाच वाजता युद्धकला प्रात्यक्षिक सादर करण्यात येणार आहे. भवानी मंडपात जिल्ह्यातील नामवंत दहा पथके प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. बुधवारी (९ ऑक्टोबर), सायंकाळी साडेपाच वाजता बँड वादन स्पर्धा होणार आहे. पोलिस, मिलिटरी आणि जिल्ह्यातील नामवंत शाळांची बँड पथके यात सहभागी होणार आहेत. गुरुवारी निबंध स्पर्धा तर शुक्रवारी (११ ऑक्टोबर) नगर प्रदर्शन मार्गावर रांगोळी स्पर्धा होणार आहे.
१२ ऑक्टोबरला शाही स्वारी
शनिवारी, १२ ऑक्टोबर रोजी विजयादशमीचा मुख्य दिवस असून भवानी मंडप ते दसरा चौक या मार्गावर शाही स्वारी काढण्यात येणार आहे. या स्वारीत ढोल पथक, लेझीम पथक, मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके होतील. तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी होणार आहेत. छत्रपती घराण्यातील सदस्यांच्या रॅलीत १५० बुलेटस्वार सहभागी होणार आहेत.
हेही वाचा :
- Govinda Bullet Injury : रिव्हॉलव्हरमधून चुकून गोळी उडाली; अभिनेता गोविंदा जखमी
- रोहित सेनेचा डंका; कानपूर कसोटीत ७ विकेट राखून विजय
- कोल्हापुरी फेटा, धोतर…शिक्षण आणि महोत्सव !