कोल्हापूर : प्रतिनिधी : विकासासाठी कोल्हापूर, शहराची हद्दवाढ होणे आवश्यक असून हद्दवाढ झाल्यास अनेक मार्गाने अधिकचा निधी शासनाकडून आणता येईल. पुणे शहराने २७ वेळा हद्दवाढ केली आपण मात्र १९७२पासून एकदाही हद्दवाढ केली नाही. स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ यांना विश्वासात घेवून शहराची हद्दवाढ करण्याची प्रक्रिया राबवावी लागेल, असे मत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केले. ‘कोल्हापूर फर्स्ट’ या उपक्रमात ते बोलत होते. खासदार शाहू छत्रपती अध्यक्षस्थानी होते. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष तथा मित्र संस्थेचे उपाध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, आमदार राहूल आवाडे, आमदार शिवाजीराव पाटील, आमदार अशोकराव माने, अतिरिक्त जिलहाधिकारी संजय शिंदे, कार्यक्रमाचे समन्वयक सुरेंद्र जैन, ॲड.सर्जेराव खोत यांच्यासह जिल्हयातील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. (Kolhapur Fitst)
‘कोल्हापूर फर्स्ट’ या उपक्रमांतर्गत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, उद्योजक, संघटना, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासनाच्या उपस्थितीत व्यापक विचारमंथन करण्यात आले. जिल्ह्यातील विविध १४ नामांकित संघटना एकत्र येत केलेल्या विचारमंथनामध्ये विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, उद्योजक, संघटना, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासनाने विकासासाठी समन्वयाने काम करण्याचा निर्धार करण्यात आला. (Kolhapur Fitst)
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मेडिकल हब, मेडिकल टुरीझम यावर बोलताना त्यांनी चेन्नई शहराचे उदाहरण देत कोल्हापूरमध्येही ती क्षमता असल्याचे सांगितले. जिल्हयात मी आणि मंत्री हसन मुश्रीफ आरोग्य विषयक महत्त्वाचे दोन विषय हाताळत आहे. यातून निश्चितच आरोग्य क्षेत्राला जिल्हयात गती दिली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. जिल्हयातील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात वाव असून राधानगरी अभयारण्यामध्ये ताडोबापेक्षा जास्त क्षमता आहे. त्याठिकाणी पहिल्या टप्प्यात रिसॉर्टसह सर्वांना राहता येईल अशा निवासाची व्यवस्था करावी लागेल. कोल्हापूर विमानतळ, कोल्हापूर खंडपीठ, अद्ययावत क्रीडा संकुल यासह कोल्ड स्टोरेज याविषयावरही त्यांनी विचार मांडले. (Kolhapur Fitst)
अध्यक्षस्थानावर बोलताना खासदार शाहू छत्रपती म्हणाले, ‘कोल्हापूर फर्स्ट’ उपक्रमाचा मुख्य उद्देश कोल्हापूरचा विकास पर्यावरणपूरक आणि दीर्घकालीन दृष्टीकोनातून करणे हा आहे. वाढत्या शहरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी तज्ज्ञांनी आपल्या सूचनांचा प्रगतीपथ निश्चित करावा. यामध्ये प्रदूषण नियंत्रण, हरित क्षेत्रांचे संवर्धन आणि स्वच्छतेसाठी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावर भर देण्यात यावा असे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांचाही सहभाग यात करण्याच्या सूचना केल्या. जनतेच्या हितासाठी आणि विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले. (Kolhapur Fitst)
मित्र संस्थेचे उपाध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, कोल्हापूरची क्षमता ओळखून राज्यातील पहिली शाश्वत विकास परिषद येथे घेतली. २५२ कोटी रूपयांचे कन्व्हेंशन सेंटर मंजुर झाले यातील ५० कोटी रूपये बजेटमध्ये दिले असून लवकरच काम सुरू होईल. एमआरडीपी मधून ३२०० कोटी रूपयांच्या कामाला सुरुवात झाली आहे. उद्योगधंदे आणि विकासात वाढ होण्यासाठी शक्तिपीठ महत्त्वाचा घटक असल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर त्यांनी हद्दवाढ, आयटी पार्क, रिंगरोड याबाबत विचार मांडले. (Kolhapur Fitst)
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, कोल्हापूर वैभववाडी या रेल्वे मार्गाचे पुर्वीचे ३२०० कोटी रूपयांचे अंदाजपत्रक आता सहा हजार कोटींवर गेले असून येत्या अधिवेशनात जिल्ह्यातील तीनही खासदार याविषयी प्रयत्न करू. बास्केट ब्रीज, शहरातील उड्डानपुल, विमानतळ विस्तार, ईबस या सुविधांसाठी प्रयत्न सुरू आहेत. (Kolhapur Fitst)
ॲड.सर्जेराव खोत यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगून उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाचे समन्वयक सुरेंद्र जैन यांनी कोल्हापूर फर्स्ट उपक्रमाचा उद्देश सांगून संकल्पना मांडली. (Kolhapur Fitst)
हेही वाचा :
शक्तीपीठ महामार्ग समर्थक आमदारांची नावे जाहीर करा
मुंबई पालिकेच्या ९० हजार कोटींच्या ठेवीवर मोदींचा डोळा