बँकॉक : किदाम्बी श्रीकांत, शंकर सुब्रमण्यम या भारताच्या बॅडमिंटनपटूंनी बुधवारी थाडलंड मास्टर्स स्पर्धेच्या पुरुष एकेरीमध्ये विजयी सलामी दिली. महिला एकेरीमध्ये रक्षिता रामराजने पहिल्या फेरीत विजय नोंदवला. (Kidambi Srikanth)
सलामीच्या सामन्यात शंकर सुब्रमण्यमने सिंगापूरच्या जून वेई तेमचा १५-२१, २१-१५, २१-१९ असा पराभव केला. पुढच्या फेरीत त्याचा सामना इंडोनेशियाच्या चिको वॉरदोयोशी होणार आहे. किदाम्बी श्रीकांतने पहिल्या फेरीत इस्रायलच्या डॅनिल डुबोव्हेंकोला २१-१३, २१-१८ असे नमवले. पुढच्या फेरीत तो हाँगकाँगच्या जेसन गुनावानशी होईल. भारताच्या आयुष शेट्टी, सतीश कुमार या खेळाडूंना मात्र एकेरीच्या पहिल्या फेरीतच पराभवाचे तोंड पाहावे लागले. सिंगापूरच्या जिंग हाँग कोकने आयुषवर २१-१५, २१-१७ अशी मात केली. इंडोनेशियाच्या अल्वी फरहानने सतीश कुमारला २१-१५, २१-१४ असे पराभूत केले. (Kidambi Srikanth)
महिला एकेरीच्या पहिल्या फेरीमध्ये रक्षिताने चीनच्या वू लुओ यूचा २१-१९, २१-१६ असा पराभव केला. पुढील फेरीत तिची लढत चायनीज तैपेईच्या सिओयू-ताँग तुंग हिच्याशी होईल. भारताच्या श्रियांशी वालिशेट्टी, तारा शाह, तान्या हेमंत या खेळाडू मात्र सलामीलाच पराभूत झाल्या. महिला दुहेरीमध्ये कविप्रिया सेल्वम-सिमरन सांघी ही भारतीय जोडी पहिल्या फेरीत पराभूत झाली. सिंगापूरच्या झिन यी आँग-कॅरमन तिंग या जोडीने कविप्रिया-सिमरन जोडीचा २१-१७, २१-१४ असा पराभव केला. (Kidambi Srikanth)
पुरुष दुहेरीमध्ये हरिहरन अंसाकरुणन-रुबन कुमार या जोडीने सलामीच्या सामन्यात थायलंडच्या पॅनावट जॅम्तुब्तिन-रॅचापॉल माक्कासासिथॉर्न या जोडीला २१-१८, २१-१२ असे नमवले. पुढील फेरीत भारतीय जोडीची लढत दक्षिण कोरियाच्या मिन ह्यूक कांग-वोन हो किम या जोडीशी होईल. भारताच्या पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय-साई प्रतीक या जोडीने सिंगापूरच्या वेस्ली को-जूनसूक कुबो या जोडीला १६-२१, २१-१३, २१-१३ असे नमवले. पुढील फेरीत त्यांची लढत थायलंडच्या जोडीशी होईल. (Kidambi Srikanth)
हेही वाचा :
शिवाजी विद्यापीठाचे फुटबॉल खेळाडू रेल्वेतून पळाले