पुणे : केरळचा संघ रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेमध्ये बुधवारी नाट्यमयरीत्या उपांत्य फेरीत पोहोचला. उपांत्यपूर्व फेरीत केरळने जम्मू आणि काश्मीरविरुद्ध अखेरच्या दिवशी यशस्वीपणे फलंदाजी करून सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले. परिणामी, पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर केरळचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित झाला. विशेष म्हणजे, केरळला पहिल्या डावात अवघ्या एका धावेची आघाडी घेता आली होती. (Kerala)
जम्मू आणि काश्मीरने विजयासाठी ३९९ धावांचे लक्ष्य ठेवल्यानंतर केरळने चौथ्या दिवसअखेर दुसऱ्या डावामध्ये २ बाद १०० धावा केल्या होत्या. अखेरच्या दिवशी विजयासाठी त्यांना २९९ धावांची आवश्यकता होती, तर जम्मू आणि काश्मीरला ८ विकेट हव्या होत्या. तथापि, अक्षय चंद्रन, कर्णधार सचिन बेबी, सलमान निझार आणि महंमद अझरुद्दीन यांनी टिच्चून फलंदाजी करत बुधवारची ९० षटके खेळून काढली. अक्षय आणि सचिन यांनी प्रत्येकी ४८ धावा काढताना अनुक्रमे १८३ आणि १६२ चेंडू खेळले. सलमान आणि अझरुद्दीन यांनी सातव्या विकेटसाठी नाबाद ११५ धावांची भागीदारी करताना ४३ षटके फलंदाजी केली. (Kerala)
सलमानने १६२ चेंडूंमध्ये ८ चौकारांसह नाबाद ४४, तर अझरुद्दीनने ११८ चेंडूंमध्ये ९ चौकार व २ षटकारांसह नाबाद ६७ धावा केल्या. पहिल्या डावात जम्मू आणि काश्मीरच्या २८० धावांना प्रत्युत्तर देताना केरळने २८१ धावा केल्या होत्या. ही एका धावेची आघाडी अखेर निर्णायक ठरली. उपांत्य फेरीत केरळचा सामना गुजरातशी होईल. केरळला केवळ दुसऱ्यांदा रणजी स्पर्धेमध्ये उपांत्य फेरी गाठण्यात यश आले आहे. यापूर्वी, केरळचा संघ २०१८-१९ च्या मोसमात उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता. (Kerala)
संक्षिप्त धावफलक : जम्मू आणि काश्मीर – पहिला डाव २८० आणि दुसरा डाव ९ बाद ३९९ (घोषित) अनिर्णित विरुद्ध केरळ – पहिला डाव २८१ आणि दुसरा डाव ६ बाद २९५ (महंमद अझरुद्दीन नाबाद ६७, सलमान निझार नाबाद ४४, सचिन बेबी ४८, अक्षय चंद्रन ४८, साहिल लोत्रा २-५०, अबिद मुश्ताक २-५६).
हेही वाचा :