विजयनगर : विदर्भ संघाचा कर्णधार करुण नायरने शुक्रवारी विजय हजारे करंडक वन-डे स्पर्धेत खेळताना ‘लिस्ट ए’ क्रिकेटमधील विश्वविक्रम नोंदवला. उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यात करुणने सलग तिसरे आणि स्पर्धेतील एकूण चौथे शतक झळकावले. त्याचप्रमाणे, सलग चार सामने नाबाद राहिल्यानंतर शुक्रवारी तो स्पर्धेत प्रथमच बाद झाला. त्यामुळे ‘लिस्ट ए’ क्रिकेटमध्ये बाद होण्यापूर्वी सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमावर त्याने नाव कोरले. (Karun Nair)
शुक्रवारी करुणने १०१ चेंडूंमध्ये ११ चौकार व २ षटकारांसह ११२ धावांची खेळी केली. त्याने यश राठोडसोबत २२८ धावांची भागीदारीही रचली. राठोडने १४० चेंडूंमध्ये १५ चौकार व एका षटकारासह नाबाद १३८ धावा फटकावल्या. या दोघांच्या शतकाच्या जोरावर विदर्भाने ४७.२ षटकांत २ बाद ३१३ धावा करून उत्तर प्रदेशवर ८ विकेटनी मात केली. उत्तर प्रदेशने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद ३०७ धावा केल्या होत्या. विदर्भाचा हा स्पर्धेतील सलग पाचवा विजय असून अद्याप विदर्भाचा संघ अपराजित आहे. ग्रुप डीच्या गुणतक्त्यामध्ये विदर्भाचा संघ २० गुणांसह अग्रस्थानी आहे. (Karun Nair)
करुणने आतापर्यंतच्या पाच सामन्यांमध्ये जम्मू आणि काश्मीरविरुद्ध नाबाद ११२, छत्तीसगडविरुद्ध नाबाद ४४, चंदिगडविरुद्ध नाबाद १६३, तमिळनाडूविरुद्ध नाबाद १११ आणि उत्तर प्रदेशविरुद्ध ११२ अशा धावा केल्या आहेत. त्याने बाद होण्यापूर्वी पाच सामन्यांत मिळून ५४२ धावा केल्या. त्याने ‘लिस्ट ए’मध्ये बाद होण्यापूर्वी सर्वाधिक धावा करण्याचा न्यूझीलंडच्या जेम्स फ्रँकलिनचा विश्वविक्रम मोडला. फ्रँकलिनने २०१० मध्ये ‘लिस्ट ए’मध्ये ५२७ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर, करुण ‘लिस्ट ए’मध्ये बाद न होता ५०० धावा करणारा पहिलाच भारतीय फलंदाज आहे. ११ वर्षे कर्नाटककड़ून खेळल्यानंतर मागील वर्षी करुण विदर्भ संघामध्ये रुजू झाला होता. विजय हजारे करंडक स्पर्धेसाठी विदर्भाने करुणकडे कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय घेतला. (Karun Nair)
हेही वाचा :