नवी दिल्ली : विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांनी भारतीय क्रिकेटपटूंमध्ये वाढत्या दुखापतींबद्दल चिंता व्यक्त केली. वर्षातून जवळजवळ १० महिने खेळाडूंना मैदानावर खेळावे लागत लागत असल्याने त्यांनी क्रिकेटच्या अतिशय व्यस्त, खेळाडूंवर ताण आणणाऱ्या वेळापत्रकाला जबाबदार धरले. बेंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी आता पुनर्वसन केंद्रासारखी झाली आहे असे सांगून कपिलदेव यांनी ही अकादमी खेळाडू प्रशिक्षणापेक्षा खेळाडूंच्या दुखापतीतून तंदुरुस्त करण्यासाठी जास्त वेळ घालवत आहेत, याकडेही लक्ष वेधले. (Kapil dev)
पाठीच्या दुखापतीतून बरा न झाल्याने भारताचा भरवश्याचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघातून बाहेर पडला. डिसेंबर आणि जानेवारीमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियातील गावसकर बॉर्डर ट्रॉफीतील सिडनी येथे झालेल्या शेवटच्या कसोटीत दुसऱ्या डावात पाठीच्या दुखण्याने बुमराह खेळू शकला नाही. त्यानंतर दुखापतीवर मात करत तंदुरुस्त होण्यासाठी झगडत आहे. (Kapil dev)
२०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सर्वाधिक २४ बळी घेतले. या स्पर्धेतील अंतिम सामन्यानंतर शमीच्या पायाला दुखापत झाली. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया आणि तंदुरुस्तीसाठी शमीला १४ महिन्याचा कालावधी लागला. तो बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधून बाहेर पडला. त्यामुळे भारताने गेल्या दशकात पहिल्यांदाच मालिका गमावली. शमीसारख्या विश्वासार्ह जोडीदाराअभावी बुमराहवर ऑस्ट्रेलिया मालिकेत गोलंदाजी करण्याची वेळ आली. त्याचा ताण बुमराहवर पडला. (Kapil dev)
कपिलदेव म्हणाले, ‘मला फक्त एकच गोष्ट काळजीची वाटते ती म्हणजे वेगवान गोलंदाज वर्षातून १० महिने खेळतात. त्यांच्या दुखापती गंभीर असतात.’ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बुमराहची उणीव भासेल का? असे विचारले असता कपिल म्हणाले, ‘संघात नसलेल्या खेळाडूंबद्दल वक्तव्य करण्यात काय हाशील? क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे. तो संघाने जिंकायचे असतो. हा खेळ बॅडमिंटन, टेनिस किंवा गोल्फ सारखा वैयक्तिक खेळ नाही. आपण चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सांघिक खेळ खेळत आहोत. आम्ही एक संघ म्हणून खेळलो तर निश्चितच जिंकू,’
भारतीय संघातील मुख्य खेळाडू जखमी व्हावेत असे कधीच वाटत नाही. पण तसे झाले तर आपण काहीच करुच शकत नाही. भारतीय संघाने चांगला खेळ करुन जिंकावे अशा शुभेच्छाही कपिलदेव यांनी दिल्या.
हेही वाचा :
श्रीलंकन फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाची दाणादाण