गडहिंग्लज; प्रतिनिधी : आताची निवडणूक दोन व्यक्ती किंवा दलांची नाही तर प्रवृत्तींची आहे. स्वार्थासाठी दल बदलणारे गद्दार आणि स्वाभिमानी जनता यांची ही लढत आहे. निष्ठेची प्रतारणा करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. सूर्या हॉल येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्यावतीने आयोजित शिवसन्मान यात्रेत ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अध्यक्षस्थानी होते. (Amol Kolhe)
डॉ. कोल्हे म्हणाले, आपले स्थानिक विरोधक विकासकामांचे पुस्तक लिहिणार आहेत असे समजले. त्यांनी खुशाल लिहावे, पण त्या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर शरद पवार यांचा संदर्भ घ्यावाच लागेल. हीच त्यांची अगतिकता असेल. स्वार्थासाठी त्यांनी बाप बदलला आता त्यांची खैर नाही. पक्ष चिन्ह गेले तरी ८४ वर्षांच्या योद्ध्याने पुन्हा संघटना जोमाने उभी केली. गद्दारांना गाडण्यासाठी तुमची मोलाची साथ हवी, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, समरजित यापूर्वीही तुम्ही निवडणुका लढविल्या. अपयश आले पण यावेळी यशाचा मंत्र देणारे महागुरू आणि पूर्ण महाविकास आघाडी तुमच्या पाठीशी आहे. गडहिंग्लजमधील उद्योग, बेरोजगारी आदी अनेक स्थानिक प्रश्न अजून शिल्लक आहेत. त्यांच्या सोडवणुकीसाठी महाविकास आघाडीला विजयी करून गद्दारांना धडा शिकवा असे आवाहनही त्यांनी केले. (Amol Kolhe)
समरजित घाटगे म्हणाले, यावेळची लढत निष्ठा विरुद्ध निष्ठेचे सौदागर अशी आहे. विकासकामांवर बोलायला काही नाही म्हणून चुकीच्या शब्दांचा वापर सुरू आहे.
सभेला डॉ. नंदाताई कुपेकर-बाभूळकर, जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार, मेहबूब शेख, अमर चव्हाण, मुकुंद देसाई आदी उपस्थित होते. शिवानंद माळी यांनी स्वागत केले. युवराज बरगे यांनी आभार मानले. प्रा. सुभाष कोरे यांनी सूत्रसंचालन केले.
- साखरेचा किमान विक्री दर वाढायला हवा : वैभवकाका नायकवडी
- कोल्हापूर जिल्ह्यात पारंपरिक लढतीकडे कल
- सांगली : व्यापारी पेठेत स्वच्छतागृहांच्या उभारणीसाठी काँग्रेसचे आंदोलन