नवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांना सापत्नभावाची वागणूक दिली जात आहे. त्यांच्यावर अश्रूधुरांचा मारा केला जात आहे. शंभू सीमेवर शेतकरी शांततेत आंदोलन करत असताना त्यांना रोखले जात आहे. ही पाकिस्तानची सीमा आहे का, असा सवाल काँग्रेसचे नेते, कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी भाजप सरकारला केला. (Punia slams BJP)
पुनिया यांनी शेतकरी आंदोलनस्थळी भेट दिली. त्यावेळी त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला. सरकारने आंदोलक शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करावीत, असे आवाहन करून पुनिया म्हणाले, एकीकडे सरकार आम्ही शेतकऱ्यांना रोखत नाही असे सांगत आहे आणि दुसरीकडे मात्र त्यांच्यावर अश्रूधुराचा वापर केला जात आहे. ते जणू काय पाकिस्तान सीमेवर असल्यासारखी वागणूक दिली जात आहे. राजकीय नेते जेव्हा दिल्ली आंदोलन करायला जातात तेव्हा त्यांनी परवानगी घेतलेली असते का? असा सवालही पुनिया यांनी केला.(Punia slams BJP)
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला किमान आधारभूत किंमत हवी आहे. त्यांच्या या मागणीला तसेच शेतकऱ्यांच्या पाठिशी आम्ही कायमपणे उभे राहू, असे स्पष्ट आश्वासन पुनिया यांनी दिले. सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळली पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.
मोर्चा स्थगित
दरम्यान, शनिवारी शंभू सीमेवर पोलिसांसोबत झालेल्या चकमकीनंतर शेतकऱ्यांचा मोर्चा पुन्हा स्थगित करण्यात आला. शेतकरी नेते सर्वनसिंग पंढेर यांनी तशी घोषणा केली.
दोन्ही मंचांनी आज ‘जथ्था’ मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांबरोबर झालेल्या झटापटीत १७-१८ लोक जखमी झाले आहेत. आम्ही काही वेळानंतर पत्रकार परिषद घेऊन पुढील कारवाईची माहिती देऊ, असे पंढेर म्हणाले.(Punia slams BJP)
पोलीस जनतेची दिशाभूल करीत आहेत. आंदोलक शेतकऱ्यांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न कसा काय निर्माण होतो, मोर्चामध्ये शंभर शेतकरी पायी सहभागी झाले आहेत. ते देशासाठी धोकादायक कसे? गेल्या १० महिन्यांपासून सीमेवर नाकेबंदी का केली आहे? तुम्ही तुमच्या देशातील जनतेचा छळ का करता? अशा प्रश्नांची सरबत्ती पंढेर यांनी पोलिसांवर केली.
तणावपूर्ण स्थिती
शंभू सीमेवरून दिल्लीकडे निघालेल्या १०१ शेतकऱ्यांचा ‘जथ्था’ शनिवारी पोलिसांनी पुन्हा रोखला. त्यामुळे तणावर निर्माण झाला. केंद्रातील अधिकाऱ्यांच्या ‘परवानगीशिवाय’ पुढे जाता येणार नाही, असे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. त्यावर शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच करण्याचा निर्धार बोलून दाखवला. आमचे आंदोलन शांततेत सुरू आहे. या लोखंडी अडथळ्यांनी आमचा आवाज दडपला जाऊ शकत नाही. आमचा आवाज दाबायचा प्रयत्न करू नका, असा इशारा यावेळी एका शेतकऱ्याने दिला.
हेही वाचा :
भाजपकडून तरुणांना एकलव्यासारखी वागणूक
खेळपट्टी खराब करण्याचा संसदीय खेळ